Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३० जानेवारी २००९

विटय़ात दोन गटांत हाणामारी; नऊ जखमी
मध्यस्थी करणारे विनोद गुळवणी यांना जमावाची मारहाण
सांगली, २९ जानेवारी / प्रतिनिधी
विटा येथे किरकोळ कारणावरून दोन गटांत झालेल्या वादाचे पर्यवसान जबरी मारामारीत होऊन सुमारे नऊजण जखमी झाले. या वेळी मध्यस्थी करण्यास गेलेल्या विटा अर्बन बँकेचे कार्याध्यक्ष विनोद गुळवणी यांच्यावरही जमावाने हल्ला केल्याने शहरातील वातावरण तंग बनले. या हल्ल्यात गुळवणी हे जखमी झाल्याने या वादाला राजकीय रंगही चढला. या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर विटा शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली असून मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सांगली लोकसभेसाठी विकास महाआघाडीचे उमेदवार आता दिनकर पाटील?
सांगली, २९ जानेवारी / गणेश जोशी

आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विकास महाआघाडीच्या वतीने माजी आमदार दिनकर पाटील यांचे नाव अचानक पुढे आले आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील संभाव्य प्रबळ उमेदवार म्हणून कवठेमहांकाळचे आमदार अजित घोरपडे यांचे नाव आघाडीवर होते. तथापि, काँग्रेस हायकमांडने अजित घोरपडे यांच्यावर दबाव आणल्याने ऐनवेळी त्यांचे नाव मागे पडल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

हिंमत असेल तर सातारा लोकसभेसाठी कोणीही उभे राहावे -उदयनराजे
सातारा, २९ जानेवारी/प्रतिनिधी

हिंमत असेल तर सातारा लोकसभा मतदारसंघात आपल्याविरुद्ध कोणत्याही पक्षाच्या नेत्याने उभे राहून दाखवावे, असे आव्हान काँग्रेसचे नेते माजी महसूल राज्यमंत्री उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिले. उदयनराजे यांनी सातारा लोकसभेची आपली उमेदवारी यापूर्वीच जाहीर केली असून, बदललेल्या मतदारसंघात प्रचाराचा धुमधडाका सुरू केला आहे. आतापर्यंत प्रचाराच्या पाच फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. सातारा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा असला तरी तो काँग्रेसला सोडावा, असा आग्रह धरण्यात येत असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.

नगरपालिका कर्मचारी भरती
अनुकंपा तत्त्वावरील नेमणुकांची निम्मी पदे स्थायी करण्याचा निर्णय
इचलकरंजी, २९ जानेवारी / वार्ताहर
राज्यातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार बनलेल्या लाड समिती व अनुकंपा धोरणाबाबत नगरविकास राज्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी ५० टक्के पदे अस्थायीमधून स्थायी करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार पात्र कर्मचाऱ्यांना पदे पुनरुज्जीवित करून नेमणुका देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. याशिवाय अन्य सहा मुख्य प्रश्नांवर सकारात्मक निर्णय मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य झाल्या आहेत. इचलकरंजी येथे १८ जानेवारीस पुणे व कोकण विभागातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे विभागीय अधिवेशन झाले होते.

पतसंस्थांमुळेच पश्चिम महाराष्ट्रात शेतक्नऱ्यांच्या आत्महत्या कमी - पाटील
‘शासनाचे पतसंस्थांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ’
सांगली, २९ जानेवारी / प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्रात विदर्भ- मराठवाडय़ाच्या तुलनेत नागरी सहकारी पतसंस्थांची चळवळ अधिक कार्यक्षम असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे समाजहितासाठी ही चळवळ जिवंत राहिली पाहिजे. राज्य शासनाने या नागरी सहकारी पतसंस्थांकडे दुर्लक्ष केल्यास पतसंस्थाचालकांना आपली ताकद दाखवावी लागेल, असे प्रतिपादन माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी केले.

सासू-सासऱ्याला पती सांभाळतो म्हणून गरोदर पत्नीची आत्महत्या
सोलापूर, २९ जानेवारी/प्रतिनिधी

आई-वडिलांचा सांभाळ करणाऱ्या पतीबरोबर भांडण काढून रागाच्या भरात एका गरोदर विवाहितेने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला. रुक्मिणी शंकर लेंगरे (वय २८) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पती शंकर हा आपल्या वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करतो, हे रुक्मिणीला आवडत नव्हते. त्याने आई-वडिलांना खर्चासाठी पैसे देऊ नयेत, असा तिचा आग्रह होता. याच कारणावरून दोघा पती-पत्नीमध्ये भांडणे होत असत. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

वेतनकरारासाठी संयुक्त लढा - ताटे
सातारा, २९ जानेवारी/प्रतिनिधी

एस.टी.मधील सर्व श्रमिक संघटना व अधिकारी संघटना यांनी एकत्र येऊन वेतन करार व वेतनश्रेणी सुधारण्यासाठी लढा देण्यास सज्ज व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे व अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी केले.येथील भू-विकास बँकेच्या सभागृहात एस.टी. कामगार संघटनेचा विभागीय मेळावा पार पडला. त्यास मार्गदर्शन करताना हनुमंत ताटे व शिवाजीराव चव्हाण बोलत होते. हनुमंत ताटे म्हणाले की, कामगारांच्या वेतन कराराची मुदत ३१ मार्च २००९ पर्यंत वाढविण्यात आली होती. ती आता संपुष्टात येत आहे. यापूर्वी वेतन करार होणे गरजेचे आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू होताच त्या निर्णयाप्रमाणे वेतनश्रेणी व वेतननिश्चिती सूत्र लागू करून वेतन करार विनाविलंब झाला पाहिजे. एस.टी. कामगारांनी प्रतिकूल परिस्थितीत खर्चात काटकसर करुन उत्पन्न वाढविले व एस.टी. नफ्यात आणली. हे लक्षात घेऊन समाधानकारक वेतन करार प्रशासनाने करुन कामगारांचे मनोबल उंचावून त्यांना अधिक जोमाने एस.टी.ची सेवा करण्यास प्रोत्साहित करावे. ९ फेब्रुवारीस मुंबई येथे एस.टी.तील सर्व कामगार संघटना व अधिकारी यांची संयुक्त बैठक होणार असून, त्यामध्ये लढय़ाची पुढील दिशा निश्चित करण्यात येईल. तसेच संघटनेचे अधिवेशन येत्या २८ फेब्रुवारीस पुणे येथे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. तोपर्यंत कामगारांवरील सर्व प्रकारचा अन्याय थांबला नाही तर नियमानुसार काम आंदोलन सुरू करण्यात येईल, असे हनुमंत ताटे यांनी जाहीर केले.

राज्यातील मेडिकल कॉलेजचे चारशे अधिव्याख्याते सेवेत
सोलापूर, २९ जानेवारी/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेने वेळोवेळी केलेल्या आंदोलनामुळे राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील ४०० अधिव्याख्यात्यांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या निर्णयाचे वैद्यकीय शिक्षक संघटनेने स्वागत केले आहे.गेल्या वर्षी २ जानेवारी २००८ यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता. परंतु तांत्रिक अडचणींमुळे त्याची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिव्याख्यात्यांनी याबाबत पाठपुरावा केला. भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या पाहणीवर बहिष्कारही घातला होता. त्यामुळे या प्रक्रियेस चालना मिळून गेल्या २२ जानेवारी रोजी दोन वर्षे सेवा झालेल्या राज्यातील १३ वैद्यकीय महाविद्यालयांतील ७२० पैकी ४००अधिव्याख्यात्यांना सेवेत सामावून घेण्याच्या निर्णयास मूर्त स्वरुप आले आहे.

इंडेज कंपनीचे आयवी वाइन कॅफे सोलापुरात हॉटेल जंगली येथे सुरू
सोलापूर, २९ जानेवारी / प्रतिनिधी

देशातील वाइन उद्योगाचे जनक असलेले वाइन उत्पादक संघटनेचे अध्यक्ष श्यामराव चौगुले यांच्या इंडेन कंपनीची उपकंपनी आयवी वाइन कॅफेचे उद्घाटन हॉटेल जंगली येथे ग्रामविकास व पर्यटनमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.आंतरराष्ट्रीय दर्जाची उच्च प्रतीची वाइन त्याच दर्जाच्या व्हेज - नॉन व्हेज रुचकर डिशेस सोलापूरकरांच्या खास चोखंदळ चवीसाठी पुणे रस्त्यावरील हॉटेल जंगली आपल्या नव्या उपक्रमातून घेऊन येत असल्याची माहिती इंडेजचे व्यवस्थापकीय संचालक विक्रांत चौगुले यांनी पत्रकारांना दिली.श्री. श्यामराव चौगुले यांच्या आयवी रेस्टॉरंटचे देशातील मोठय़ा शहरामध्ये नऊ वाीन कॅफे आहेत. यात आता सोलापूरला जोडण्यात आले आहे. मुंबईच्या वरळीमध्ये २००५ मध्ये प्रथम वाइन कॅफे सुरू करण्यात आले. सोलापुरात श्री. मकरंद चिंदरकर यांच्या हॉटेल जंगलीला २२ वर्षांची परंपरा असून, राज्यातील सर्वात मोठे गार्डन रेस्टॉरंट असा त्याचा लौकिक आहे. हॉटेल जंगलीचा निसर्गरम्य परिसर भव्य चौदा एकराचा आहे.यात तीन हजार चौरस फुटांत आयवी वाइन कॅफे सुसज्ज आणि दिमाखदार वातानुकूलित दालनासह सुरू करण्यात आल्याचे श्री. चिंदरकर यांनी सांगितले. हॉटेल जंगलीच्या परिसरात ३५ हजार चौरस फुटांत मल्टिफ्लेक्स सुरू करण्याचाही विचार असल्याचे ते म्हणाले.

सुनेचा खून करणाऱ्या सावत्र सासूला जन्मठेप
सांगली, २९ जानेवारी / प्रतिनिधी

माहेरहून दहा हजार रुपये आणावेत, यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. तिचा खून केल्याप्रकरणी सावत्र सासू सीताबाई पांडुरंग लोंढे (वय ८०) हिला जन्मठेपेची शिक्षा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. मराठे यांनी बुधवारी सुनावली.तासगाव तालुक्यातील वाघापूर येथील दगडू पांडुरंग लोंढे याच्याशी सुदाम सीतव्वा डुबळे यांची मुलगी सुरेखा हिचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. या विवाहाला दहा हजार रुपये खर्च आला असून कर्ज काढून विवाहकार्य करण्यात आले आहे. त्यामुळे ही रक्कम माहेरहून आणावी, यासाठी सुरेखा हिचा नवरा दगडू, सासू राधाबाई, सावत्र सासू सीताबाई व सासरा पांडुरंग हे शारीरिक व मानसिक छळ करीत होते. दि. २३ मार्च २००८ रोजी दुपारी तीन वाजता सुरेखा ही आपल्या खोलीत विश्रांती घेत असताना सीताबाई हिने तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. याप्रकरणी नवरा, दोन्ही सासू व सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. नवरा, सासू राधाबाई व सासरा पांडुरंग यांची सबळ पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली, तर सावत्र सासू सीताबाई हिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. अरविंद देशमुख यांनी काम पाहिले.

विरोधकांनी आपला झेंडा जाहीर करावा - देशमुख
सांगोला, २९ जानेवारी/वार्ताहर

सांगोला तालुक्यातील विरोधकांनी प्रथम आपण कोणत्या झेंडय़ाखाली आहोत ते सांगावे, मगच आगामी विधानसभा निवडणुकीचे बोलू. त्यासाठी विरोधकांनी निवडणुकीच्या मैदानात यावे, असे आव्हान शेकापचे ज्येष्ठ नेते, आमदार गणपतराव देशमुख यांनी दिले.तालुक्यातील महूद येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गावचे सरपंच सुभाष कांबळे हे होते. सांगोला सहकारी साखर कारखान्याचे संचालक अ‍ॅड. मारुती ढाले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.काँग्रेसचे माजी आमदार अ‍ॅड. शहाजीबापू पाटील यांचा नामोल्लेख टाळून आमदार देशमुख म्हणाले की, तालुक्यातील जनतेने संधी देऊनही विधानसभेत तालुक्याचा एकही प्रश्न मांडला नाही, त्यांनी तालुक्याच्या विकासाच्या गप्पा मारु नयेत. आपण तालुक्यात केलेल्या विकास कामांवर आणि कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावरच बोलतो. जि. प. सदस्य बाबा करांडे यांनी तालुक्यात केलेल्या विकास कामांचा आलेख जनतेसमोर मांडणे हे शेकापचे वैशिष्ठय़ असल्याचे सांगितले. यावेळी तालुका पंचायत समितीचे सभापती संभाजी आलदर व सांगोला सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष प्रा. नानासाहेब यांची भाषणे झाली. या कार्यक्रमास जि. प. सदस्य किसन कोळेकर,महीमचे सरपंच शंकर चौगुले, शहाजहान मुलाणी, मच्छिंद्र खरात, राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.

भांडण सोडवायला गेला आणि हात गमावला
माळशिरस, २९ जानेवारी/वार्ताहर

कॉलेजमध्ये झालेली बाचाबाची मिटविण्यासाठी गेलेल्यावरच सशस्त्र हल्ला होऊन त्यामध्ये त्याला डावा हात गमवावा लागल्याचा प्रकार अकलूज येथे बुधवारी रात्री घडला. अकलूज येथील आनंद भोसले याने या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यामध्ये त्याने त्याच्या वर्गातील इरफान बागवान याच्याशी बाचाबाची झाली. त्यामध्ये विनोद लक्ष्मण सावंत हा मध्यस्थी करीत असताना इरफान बागवान, जावेद मुजावर, महादेव भिंगारदिवे, विजय महिडा व मोहसिन बागवान यांनी चाकू, कोयत्याने केलेल्या हल्ल्यात विनोद सावंत याचा डाव हात तुटून खाली पडला. उजव्या हाताची बोटेही तुटली तसेच पाठीवर, पायावर अनेक वार झाले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले पुढील तपास करीत आहेत.

सहकारमहर्षी मोहितेंच्या पुण्यतिथीनिमित्त आरोग्य शिबिर
माळशिरस, २९ जानेवारी/वार्ताहर

सहकारी महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त मधील पंचायत समिती व अकलूज ग्रामपंचायत व विविध संस्थांच्या वतीने ३ जिल्ह्य़ांतील, ८ तालुक्यांतील लोकांसाठी ९ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले असून, त्याचा सर्वानी लाभ घ्यावा, असे आवाहन पं. स. सभापती धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले.
अकलूज जि. सोलापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शिबिर होणार आहे. या मध्ये विजयप्रताप युवा मंच, संग्रामसिंह मित्र मंडळ, उपजिल्हा रुग्णालय अकलूज, रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील सोशल फाऊंडेशन महिला विकास,स्वयंसहायता संस्था, अकलूज इंडियन मेडिकल असोसिएशन व केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो. अकलूज या संस्थांचा सहभाग आहे.

धनादेश न वटल्याप्रकरणी महिला दूध संस्था अध्यक्षांना कैद
माळशिरस, २९ जानेवारी/वार्ताहर

खोटा धनादेश दिल्याचे सिद्ध झालेल्या महिला दूध संस्थेच्या महिला अध्यक्षांना ३ महिने साधी कैद व २.५ लाख नुकसानभरपाई देण्याची शिक्षा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एम. सुंदाळे यांनी सुनावली आहे. कोंडाशिरस (ता. माळशिरस) येथील सुमित्रादेवी महिला दूध संस्थेच्या अध्यक्षा संजीवनी गोरे यांनी सभासद महिलांना जर्सी गाई खरेदीसाठी रत्नप्रभादेवी पतसंस्था, शाखा, नातेपुते यांच्याकडून कर्ज घेतले होते. त्या कर्जाच्या वसुलीसाठी त्यांनी पतसंस्थेस धनादेश दिला होता. मात्र धनादेश न वटल्याने शाखाधिकारी संतोष मल्लाप्पा यांनी अ‍ॅड. दिलीप फडे व महेश फडे यांच्यामार्फत गोरे यांचे विरुद्ध खासगी फिर्याद दाखल केली होती.

यशोधरा हॉस्पिटलमध्ये उद्या कार्डियाक कॅथलॅबचे उद्घाटन
सोलापूर, २९ जानेवारी/प्रतिनिधी

येथील यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुमारे दोन कोटी खर्च करुन उभारण्यात आलेल्या अद्ययावत कार्डियाक कॅथलॅब विभागाचे उद्घाटन शनिवारी ३१ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. बसवराज कोलूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.अपारंपरिक ऊर्जामंत्री विनय कोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे. सिध्देश्वर पेठेतील या हॉस्पिटलने सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर कर्नाटकात स्वतचे स्थान निर्माण केले आहे. आता पुढचे पाऊल टाकत हॉस्पिटलने अद्ययावत उपकरणांसह कार्डियाक कॅथलॅबची सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे हृदय रुग्णांसाठी हे हॉस्पिटल आधारकेंद्र राहील, असा विश्वास डॉ.कोलूर यांनी व्यक्त केला

सहा फेब्रुवारीपासून पंढरीत माघ वारी
पंढरपूर, २९ जानेवारी/वार्ताहर

पंढरीनगरीत माघ वारी सहा फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान भरत असून, यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या वारकरी भाविक यांनी शहरात आल्यावर पुढील प्रमाणे आरोग्याबाबत काळजी घ्यावी असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी केले आहे. नासकी वा कच्ची फळे खाऊ नयेत तसेच नागरिकांनी आपली जनावरे शहरात मोकाट सोडू नयेत, शिळे अन्न खाऊ नये असे काढलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

पवार, पाटील यांना विद्यापीठ शिष्यवृत्ती
इस्लामपूर, २९ जानेवारी / वार्ताहर

येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील स्वप्नाली संजय पवार (मानसशास्त्र) व राहुल सर्जेराव पाटील (इतिहास) या विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळाली आहे.या दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा धनादेश व गुणवत्ता प्रमाणपत्र विद्यापीठाकडून प्राप्त झाले आहे. मार्च/ एप्रिल २००८ मध्ये विद्यापीठ परीक्षेतील त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आहे. गतवर्षीही या महाविद्यालयातील तीन विद्यार्थिनीना ही शिष्यवृत्ती मिळाली होती.