Leading International Marathi News Daily                                शुक्रवार, ३० जानेवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

व्यापार - उद्योग

क्रीडा

अग्रलेख

विशेष लेख

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांत


निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसची कोणाशीही युती नाही
नवी दिल्ली, २९ जानेवारी/वृत्तसंस्था
आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये जागावाटपाच्या चर्चेत काही राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांकडून येणारा प्रचंड दबाव टाळण्यासाठी काँग्रेसने आज अशी भूमिका जाहीर केली की, काँग्रेस पक्ष राष्ट्रीय स्तरावर कोणाशीही निवडणूक युती करणार नाही मात्र राज्यस्तरावर अशी युती करण्यात येईल. अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या नवी दिल्ली येथे आज पार पडलेल्या बैठकीनंतर पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय स्तरावर कोणाशीही निवडणूक युती न करण्याचे कॉँग्रेस पक्षाने ठरविले आहे. मात्र राज्यस्तरावर जागावाटपासंदर्भात युती करण्यात येईल.

आता शेतकऱ्यांना वीजबिलांमध्ये हजारो कोटींच्या सवलती
समर खडस
मुंबई, २९ जानेवारी

लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्यावर राज्यातील लोकशाही आघाडी सरकारने जनतेच्या प्रश्नांना हात घालण्याचा धडाकाच सुरू केला आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि राज्यातील विजेची टंचाई यावर रान पेटवलेले असतानाच आता राज्याच्या ऊर्जा खात्याने शेतकऱ्यांच्या थकित वीज बिलांसाठी हजारो कोटी रुपयांची सवलत योजना आखली आहे. ही योजना लवकरच मंत्रिमंडळ बैठकीसमोर आणण्यात येणार असून तिची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा आयोगाकडे!
मुंबई, २९ जानेवारी / खास प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर वातावरण तापविले जात असतानाच मराठा समाजाला शैक्षणिक व नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करता येईल का हे तपासून पाहण्यासाठी या संदर्भातील अहवाल पुन्हा न्या. सराफ आयोगाकडे पाठविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने आज घेऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभा निवडणुकीपर्यंत थंड बस्त्यात टाकला आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, असा अहवाल न्या. बापट आयोगाने दिला आहे. तरीही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दबाव वाढत आहे.

पालिका रुग्णालयांतील डॉक्टर राजीनाम्याच्या तयारीत
संदीप आचार्य
मुंबई, २९ जानेवारी

महापालिकेच्या शीव रुग्णालयातून नवजात अर्भक पळवून नेल्याप्रकरणी संबंधित डॉक्टर व परिचारिकेला निलंबित करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे तीव्र पडसाद आज पालिकेच्या सर्व रुग्णालयांत उमटले. शीव, नायर आणि केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी आज आपापल्या इस्पितळांत बैठका घेऊन प्रशासनाने डॉक्टरांना अथवा शीव इस्पितळाच्या अधिष्ठात्या डॉ. संध्या कामत यांना निलंबित केल्यास सामुहिक राजीनामा देण्याचा पवित्रा घेतला आहे.

मुतालिकचा मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंध?
चौकशीसाठी एटीएसचे पथक कर्नाटकला
मुंबई, २९ जानेवारी / प्रतिनिधी
मंगलोर येथील पबवरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला श्रीराम सेनेचा अध्यक्ष प्रमोद मुतालिक याचे नाव मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी पुढे आले असून त्याचा याप्रकरणाशी संबंध आहे का याची शहानिशा करण्यासाठी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) पथक कर्नाटक येथे रवाना झाले असल्याची माहिती पथकाचे प्रमुख के. पी. रघुवंशी यांनी आज दिली. मात्र मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपपत्रात फरारी दाखविण्यात आलेला आरोपी प्रवीण मुतालिक आणि प्रमोद मुतालिकचा काडीमात्र संबंध नसून या दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या असल्याचे रघुवंशी यांनी या वेळी स्पष्ट केले.

सुरेशदादा जैन भाजपला गुंगारा देऊन सेनेच्या गडावर
मुंबई, २९ जानेवारी/प्रतिनिधी

भाजपचे नेते व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जळगाव येथे भाजपमध्ये प्रवेश करणारे सुरेशदादा जैन आज अचानक मातोश्री या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले व त्यांनी लोकसभेची उमेदवारी शिवसेनेकडून मिळविण्याबाबत कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी खलबते केली. सुरेशदादा हे समजूतदार माणूस असून हा त्यांचा प्रॅक्टीकल सोश्ॉलिझम आहे, अशी टिप्पणी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली.

मुंबईच्या विमानतळांना सावधानतेचा इशारा
मुंबई, २९ जानेवारी/प्रतिनिधी

अमेरिकेवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याप्रमाणे मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता नसली तरीही खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय विमानतळ तसेच खाजगी धावपट्टय़ा व हेलिपॅड यांना पूर्ण सुरक्षा देण्याचे निर्देश आपण दिले आहेत, असे गृहमंत्री जयंत पाटील यांनी आज सांगितले. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यातील विमाने अतिरेक्यांच्या हातात पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे राज्याला कळविले असल्याचेही गृहमंत्री पाटील यांनी सांगितले. मुंबईवर ९/११ प्रमाणे हल्ल्याची शक्यता असल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्याच्या गृह खात्याला कळविल्याची अफवा आज काही काळ शहरात पसरली होती. मात्र याबाबत आपण कोणतेही विधान केलेले नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. एका प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीने आपल्याला ९/११ प्रमाणे मुंबईवर हल्ल्याची शक्यता असल्याची माहिती केंद्राकडून आली आहे का, असे विचारले होते. मात्र यावर आपण काहीही भाष्य करणार नाही असे स्पष्ट केले होते. मात्र त्या आधीच आपण राज्यातील सर्व धावपट्टय़ा व विमानतळ हँगर्स येथे योग्य ते संरक्षण देऊन सावधानतेचा इशारा दिला आहे, असे पाटील म्हणाले.

पदासाठी योग्यता हा एकमेव निकष नव्हे
मुंडे यांचा उद्धवना टोला
मुंबई, २९ जानेवारी/प्रतिनिधी

लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधान करण्यास शिवसेनेचा विरोध आहे, असे मला वाटत नाही. शरद पवार यांची पंतप्रधान होण्याची योग्यता असेल तर माझीही मुख्यमंत्री बनण्याची योग्यता आहे. पदे मिळविण्यासाठी योग्यता हा एकमेव निकष नाही. कोणाचे किती लोक निवडून येतात त्यावर पदे मिळतात, असा टोला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता हाणला. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना पंतप्रधान होण्याकरिता पाठिंबा देणारे अप्रत्यक्ष वक्तव्य काल महाड येथे केले. त्याकडे मुंडे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी वरील टोला लगावला. मुंडे म्हणाले की, भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून अडवाणी यांचे नाव जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा रालोआचा घटकपक्ष नाही किंवा त्यांचा आमच्याशी समझोता नाही. त्यामुळे शरद पवार हे आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार बनू शकत नाहीत.महाराष्ट्राचा कापड उत्पादनात पहिला क्रमांक होता. २००२ नंतर केंद्र सरकारने गिरण्यांची जमीन विकून काही गिरण्यांचे आधुनिकीकरण करण्याचे धोरण स्वीकारले. त्यानुसार पाच गिरण्यांची ८० एकर जमीन विकण्यात आली. त्यातून मिळालेल्या २२०० कोटी रुपयांपैकी १२४६ कोटी रुपये केंद्राने महाराष्ट्राला गिरण्यांच्या आधुनिकीकरणाकरिता दिले नाहीत. आणखी १८ कापड गिरण्यांची १९० एकर जमीन विकण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्र सरकारने या व्यवहारांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.दरम्यान, राज्यात युतीची सत्ता असताना मी पब बंद केले होते. पुन्हा सत्तेवर आलो तर पबवर बंदी घालू, असा इशारा भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिला.

अवघ्या ५०० रुपयांत छोटेखानी संगणक!
नवी दिल्ली, २९ जानेवारी/पीटीआय

देशातील प्रत्येक घरामध्ये संगणक असावा व त्याच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रसार अधिक वेगाने व्हावा या उद्देशाने अवघ्या पाचशे रुपयांमध्ये छोटेखानी खास संगणक उपलब्ध करून देण्याची योजना केंद्र सरकारने आखली असून तिची अंमलबजावणी आगामी सहा महिन्यांच्या काळात होईल. हा छोटय़ा आकाराचा खास संगणक बंगळुरू येथील आयआयएससी व चेन्नई येथील आयआयटीने विकसित केला आहे. केंद्रीय उच्च शिक्षण विभागाचे सचिव आर. पी. अग्रवाल यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, अवघ्या ५०० रुपयांमध्ये मिळणाऱ्या या संगणकाच्या अजून काही चाचण्या घेणे शिल्लक आहे. या सर्व चाचण्या यशस्वीरित्या पार पडल्यानंतरच हा छोटेखानी संगणक बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होईल. अर्थात या योजनेची अंमलबजावणी आगामी सहा महिन्यांच्या कालावधीत होईल. हा संगणक छोटेखानी असला तरी त्यात मेमरी वाढविणे, लॅन व वाय-फाय अशा सुविधा असतील. तसेच या संगणकासाठी लागणारी आज्ञावली व पूरक तंत्रज्ञान केंद्र सरकार विकसित करणार असून ते सर्वाना मोफत उपलब्ध होणार आहे.या संगणकाची किंमत ५०० रुपये (१० डॉलर) ठेवण्यात येईल. आपल्या मुलांना भेट म्हणून देण्यासाठी पालकांना हा संगणक त्याच्या कमी किमतीमुळे खरेदी करणे सहजशक्य होणार आहे. या संगणकाचा विद्यार्थ्यांना मोठा उपयोग होऊ शकेल. देशातील शिक्षणसंस्थांना हे संगणक सवलतीच्या दरात केंद्र सरकार उपलब्ध करून देणार आहे.

आर्थिक मदत योजनेला अमेरिकेची मंजुरी
वॉशिंग्टन, २९ जानेवारी/पीटीआय

जागतिक मंदीमुळे डळमळीत झालेला अमेरिकी अर्थव्यवस्थेचा डोलारा सावरण्यासाठी ८१९ अब्ज डॉलरच्या आर्थिक मदत योजनेला अमेरिकी प्रतिनिधीगृहाने आज मंजुरी दिली. मात्र या योजनेच्या बाजूने सदर सभागृहातील रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांपैकी एकानेही मतदान केले नाही. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बराक ओबामा यांना हा एक प्रकारे मिळालेला मोठा धक्का आहे. ही योजना २४४ विरुद्ध १८८ मतांनी मंजुर करण्यात आली. ही योजना मंजूर होण्यासाठी बराक ओबामा यांनी कॅपिटॉल हिल येथील कार्यालयामध्ये मंगळवारी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांबरोबर एका बैठकीत सविस्तर चर्चा केली होती. त्यानंतरही अमेरिकी प्रतिनिधीगृहामध्ये प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी विरोधात मतदान करून ओबामा यांना राजकीय धक्का दिला आहे. इतकेच नव्हे तर सदर सभागृहामध्ये अमेरिकी अर्थव्यवस्था सावरणे व पुनर्गुतवणूक यासंदर्भातील विधेयकावरील मतदानप्रसंगी ओबामा यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या ११ सदस्यांनी मतदान केले होते. आता या विधेयकावर ओबामा यांची स्वाक्षरी होऊन त्याचे कायद्यात रूपांतर होण्याच्या आधी अमेरिकी सिनेटमध्ये या विधेयकावर लवकरच मतदान होणार आहे.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८