Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसची कोणाशीही युती नाही
नवी दिल्ली, २९ जानेवारी/वृत्तसंस्था

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये जागावाटपाच्या चर्चेत काही राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांकडून येणारा प्रचंड दबाव टाळण्यासाठी काँग्रेसने आज अशी भूमिका जाहीर केली की, काँग्रेस पक्ष राष्ट्रीय स्तरावर कोणाशीही निवडणूक युती करणार नाही मात्र राज्यस्तरावर अशी युती करण्यात येईल.
अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या नवी दिल्ली येथे आज पार पडलेल्या बैठकीनंतर पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय स्तरावर कोणाशीही निवडणूक युती न करण्याचे कॉँग्रेस पक्षाने ठरविले आहे. मात्र राज्यस्तरावर जागावाटपासंदर्भात युती करण्यात येईल.
राष्ट्रवादी काँग्रेस, रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती समाजवादी पक्ष व समाजवादी पक्ष हे काँग्रेसचे मित्रपक्ष लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चेत आपल्या मूळ राज्यासह अन्य राज्यांमध्येही अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसवर प्रचंड दबाव आणण्याची शक्यता आहे. हे सर्व टाळण्यासाठी काँग्रेसने आज ही भूमिका जाहीर केली आहे.
यासंदर्भात जनार्दन द्विवेदी यांनी सांगितले की, युती हा खरेतर आकडय़ांचाच एक खेळ असतो. कोण किती जागा जिंकतो यावर हा सारा खेळ अवलंबून असतो. मात्र यासंदर्भातले खरे चित्र

 

निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल. समजा काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बुहमत मिळाले तर सारे चित्रच वेगळे असेल. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी होणारी जागावाटपाची चर्चा ही प्रत्येक राज्यातील राजकीय स्थितीनुसार अवलंबून असेल. संबंधित राज्यातील राजकीय स्थितीचे तेथील प्रदेश काँग्रेस नेतृत्व परीक्षण करेल व ज्याच्याशी युती करावयाची आहे त्या प्रादेशिक पक्षाचे बलाबलही पाहिले जाईल. त्यानंतरच त्या राज्यात युती करण्यासंदर्भात अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणी निर्णय घेईल. जिथे कोणाशीही युती करण्यात आलेली नाही अशा ठिकाणी काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढणार आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या आज पार पडलेल्या बैठकीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात आगामी लोकसभा निवडणुका व त्यासाठी काँग्रेस पक्षाने करावयाची पूर्वतयारी यासंदर्भात विवेचन केले.
सध्याच्या काळात युती करणे अपरिहार्य आहे, त्यापासून मुक्तता नाही असे प्रतिपादन खासदार राहुल गांधी कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना केले. निवडणुकीमध्ये तरुणांना उमेदवारी द्यायलाच हवी पण कोणत्याही घटकांना डावलून नव्हे. या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये एकाही नेत्याने आपल्या भाषणामध्ये युतीसंदर्भात विरोधी मत व्यक्त केले नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी काँग्रेसने प्रयत्नांची शिकस्त केली पाहिजे असे मत काही जणांनी मांडले. आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये २९ सदस्यांची भाषणे झाली.