Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

सुरेशदादा जैन भाजपला गुंगारा देऊन सेनेच्या गडावर
मुंबई, २९ जानेवारी/प्रतिनिधी

 

भाजपचे नेते व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जळगाव येथे भाजपमध्ये प्रवेश करणारे सुरेशदादा जैन आज अचानक मातोश्री या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले व त्यांनी लोकसभेची उमेदवारी शिवसेनेकडून मिळविण्याबाबत कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी खलबते केली. सुरेशदादा हे समजूतदार माणूस असून हा त्यांचा प्रॅक्टीकल सोश्ॉलिझम आहे, अशी टिप्पणी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली.
जळगाव भाजपने पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक कोटी रुपयांची थैली देण्याचा कार्यक्रम अलीकडेच आयोजित केला होता. या कार्यक्रमात सुरेशदादा जैन हे भाजपमध्ये प्रवेश करणार, असे त्या पक्षाचे नेते सांगत होते. प्रत्यक्षात दादांनी त्या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला नाही. जैन यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी हवी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या जैन यांना शिवसेना उमेदवारी देणार असेल तर ती हवी आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत त्यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र शिवसेना व भाजपने आपल्या लोकसभा उमेदवारीबाबत एकत्र बसून निर्णय घ्यावा, असे जैन यांनी ठाकरे यांना सांगितल्याचे समजते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आपली प्रथम पसंती असून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणे आवडेल, असेही दादा म्हणाल्याचे समजते. आपल्या संपर्कात सात ते आठ आमदार असून त्यांना सोबत घेऊन शिवसेनेत येण्याची तयारी जैन यांनी दर्शविली असल्याचे समजते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर व नगरसेवक पुंडलिक म्हात्रे तसेच ठाणे महापालिकेतील मनसेचे नगरसेवक रमेश कदम, गटनेते प्रकाश राऊत, नगरसेविका रुपाली कदम यांच्यासह शिक्षण मंडळ सदस्य संतोष तळशिकर, रेखा पाटील, माजी नगरसेवक अशोक ठाकूर, कल्याण-डोंबिवली (पूर्व) राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष गोविंद टावरे, फिरोज खान, पंढरीनाथ म्हात्रे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. ठाणे महापालिकेतील मनसेला खिंडार पाडण्यात शिवसेना उपनेते राजा चौगुले यांनी मोठी भूमिका बजावली.