Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

मुतालिकचा मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंध?
चौकशीसाठी एटीएसचे पथक कर्नाटकला
मुंबई, २९ जानेवारी / प्रतिनिधी

 

मंगलोर येथील पबवरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला श्रीराम सेनेचा अध्यक्ष प्रमोद मुतालिक याचे नाव मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी पुढे आले असून त्याचा याप्रकरणाशी संबंध आहे का याची शहानिशा करण्यासाठी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) पथक कर्नाटक येथे रवाना झाले असल्याची माहिती पथकाचे प्रमुख के. पी. रघुवंशी यांनी आज दिली. मात्र मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपपत्रात फरारी दाखविण्यात आलेला आरोपी प्रवीण मुतालिक आणि प्रमोद मुतालिकचा काडीमात्र संबंध नसून या दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या असल्याचे रघुवंशी यांनी या वेळी स्पष्ट केले.
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी दयानंद पांडे याच्या लॅपटॉपमधून मिळालेल्या पांडे व कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या संभाषणाच्या टेपमध्ये कर्नाटक येथील श्रीराम सेनेचा अध्यक्ष ‘मुतालिक’ याचा (पूर्ण नावाचा उल्लेख नाही) आणि त्याच्या कामाचा संदर्भ आला होता. आरोपत्रात या संदर्भाचा समावेशही करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्रमोद मुतालिक याने साध्वी प्रज्ञा सिंग हिने मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी केलेल्या कृत्याचे कौतुक करणाऱ्या कन्नड भाषणाची टेप एका वृत्त वाहिनीने प्रसिद्ध केल्यावर प्रमोद मुतालिक हाच प्रकरणातील फरारी आरोपी प्रवीण मुतालिक असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र या सर्व चर्चाना फाटा देत रघुवंशी यांनी प्रवीण आणि प्रमोद मुतालिक या दोन वेगवेगळ्या व्यक्ती असल्याचे स्पष्ट केले.
तसेच पुरोहित आणि पांडे यांच्या संभाषणात ‘मुतालिक’ नावाचा संदर्भ आल्याने संबंधित मुतालिक हा प्रमोद मुतालिक आहे का आणि त्याचा मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंध आहे का, याबाबत चौकशी करण्यासाठी आपले एक पथक कर्नाटकला रवाना होत असल्याचे रघुवंशी म्हणाले. कर्नाटक येथे बजरंग दलाचा नेता मुतालिक हा धर्मासाठी खूप चांगले काम करीत आहे. मात्र दलाचे वरिष्ठ नेते त्याच्या कामाविषयी नाराज असल्याने त्याने श्रीराम सेनेची स्थापना केली असून गरज पडल्यास आपण त्याची मदत घेऊ शकतो, असे पुरोहित पांडेला सांगत असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. त्यामुळे चौकशीसाठी पथक कर्नाटकला गेले असून प्रमोद मुतालिकचा मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंध स्पष्ट झाला तर त्यालाही अटक केली जाईल असे त्यांनी सांगितले.