Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३० जानेवारी २००९

प्रादेशिक

ठाण्यात निवडणूक आघाडीचा नवा पॅटर्न
ठाणे, २९ जानेवारी /प्रतिनिधी

आजवर धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र नसल्यानेच अनेक निवडणुकांमध्ये सत्ता गमवावी लागल्यानंतर आता पुढील काळात होणाऱ्या सर्व स्तरावरील निवडणुका एकत्र लढविण्याचा निर्णय आज झालेल्या सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांच्या बैठकीत घेण्यात आला. आजवर केवळ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश पातळीवरून आघाडी होत असे. मात्र जिल्हा परिषद, महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीचा निर्णय स्थानिक नेत्यांवर सोपवला जायचा. त्याचवेळी प्रदेश पातळीवरूनच युती होऊ नये यासाठी हालचाली केल्या जायच्या.

अनेक पोलीस पिस्तुलाच्या सरावापासून वंचित
परवडत नसल्यामुळे एके-४७चा सरावच नाही!
निशांत सरवणकर
मुंबई, २९ जानेवारी

२६ नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्यानंतर गांगरलेल्या पोलीस दलाचे नीतीधैर्य वाढविण्यासाठी प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला तच्याजवळ असलेल्या पिस्तुलाचा वा रिव्हॉल्व्हरचा सराव करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार नायगाव येथील मुख्यालयातील फायरिंग रेंजवर पोलिसांचा सराव सुरू झाला खरा. परंतु आता दोन महिने उलटल्यानंतरही अनेक पोलीस अशा पद्धतीचा सराव मिळावा म्हणून प्रतीक्षेत आहेत.

आश्रमशाळांमधील मृत्यू व बलात्कार: हायकोर्टाकडून गंभीर दखल
मुंबई, २९ जानेवारी/प्रतिनिधी

डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांमधील पाच आजारी विद्यार्थ्यांचे औषधोपचारांअभावी झालेले मृत्यू व मनोर जवळील गोवाडे आश्रमशाळेतील १५ वर्षांची एक विद्यार्थिनी तेथील अधीक्षकापासूनच गरोदर राहिल्याच्या घटनेची मुंबई उच्च न्यायालयाने आज स्वत:हून गंभीर दखल घेतली व संबंधित सरकारी अधिकाऱ्यांनी उद्या शुक्रवारी याचा खुलासा करण्यासाठी हजर राहावे असा आदेश दिला आहे.

जि.प.च्या वतीने ज्ञान महामंडळ भरती परीक्षा कसे घेऊ शकते?
मुंबई, २९ जानेवारी/प्रतिनिधी

राज्यातील जिल्हा परिषदांनी कर्मचाऱ्यांची भरती करताना निवड प्रक्रिया स्वत:च पार पाडण्याची नियमांमध्ये स्पष्ट तरतूद असूनही जिल्हा परिषदांच्या वतीने कर्मचारी भरतीसाठीच्या परीक्षा घेण्याचे काम महाराष्ट्र ज्ञान महामंडळ कसे काय करू शकते, असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. रागयड जिल्हा परिषदेने विस्तार अधिकारी (सांख्यिकी) व औषधी निर्माता यासह इतर पदांवरील भरतीसाठी गेल्या वर्षी जूनमध्ये जाहिरात दिली होती. या जाहिरातीनुसार ज्यांनी अर्ज केले त्यांची परीक्षा महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने घेतली होती.

पवारांचे दबावाचे राजकारण
जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न
मुंबई, २९ जानेवारी / खास प्रतिनिधी
लोकसभेच्या ७० जागा लढविण्याचे जाहीर करून राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसवर दबाव आणतानाच जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचे राजकारण सुरू केल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रातही जास्त जागा मिळाव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होण्याचे ठरविले आहे.
जागावाटपाकरिता काँग्रेसने सहा सदस्यीस समिती नेमली आहे. राष्ट्रवादीने केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली सात सदस्यीय समिती जागावाटपाकरिता नेमली आहे.

सुखीसमाधानी देश
यादीत डेन्मार्क अव्वल तर भारत १२५ व्या क्रमांकावर
मुंबई, २९ जानेवारी/वृत्तसंस्था
सुख, आनंद व समाधान हे मानण्यात आहे असे म्हटले जाते. आज जागतिक आर्थिक मंदीच्या पाश्र्वभूमीवरही काही देशांतील लोक कमालीचे आनंदी व समाधानी असल्याचे एका अभ्यास पाहणीत आढळून आले आहे. तुम्ही उदासवाण्या चेहऱ्याने बसले असाल तर ब्रिटनच्या लेसिस्टर विद्यापीठातील संशोधकांच्या मते तुम्ही योग्य देशात नाही. लेसिस्टर विद्यापीठातील सामाजिक मानसशास्त्रज्ञ अ‍ॅड्रियन व्हाईट यांनी सुखसमाधानासंबंधीचा जागतिक नकाशाच सर्वप्रथम तयार केला असून डेन्मार्क हा जगातील सर्वात सुखी समाधानी देश असल्याचे त्यांचे मत आहे.

ठाण्यातील साडेचारशे शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या पदांना बेकायदा मान्यता
शिक्षणाधिकाऱ्यांचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात
तुषार खरात
मुंबई, २९ जानेवारी

कोणत्याही शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांना ‘वैयक्तिक मान्यता’ देण्यापूर्वी त्या शाळेमध्ये पदे भरण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून ‘संच मान्यता’ मिळणे अनिवार्य आहे. मात्र, ठाणे जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी संच मान्यता नसलेल्या तब्बल ४४४ शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांना नियमबाह्यपणे मंजूरी दिल्याचे उघडकीस आले आहे. शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीमध्ये ही गंभीर बाब उघडकीस आली आहे.

शालेय स्तरावर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती योजना
भालचंद्र मुणगेकर यांची माहिती
मुंबई, २९ जानेवारी/प्रतिनिधी

महाविद्यालयीन स्तरावर अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या धर्तीवर आता शालेय स्तरावरही (पूर्वमॅट्रिक) शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय नियोजन आयोग व केंद्र सरकारचा सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने ही योजना तयार करण्यात आली असून लवकरच त्याबाबतची अधिकृत घोषणा होईल, अशी माहिती केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

वैशाली माडेचा संगीतप्रवास येत्या रविवारी ‘झी’ मराठीवर
मुंबई, २९ जानेवारी / प्रतिनिधी

झी मराठीवरील ‘सारेगमप स्वप्न स्वरांचे’ या लोकप्रिय कार्यक्रमातील महागायिका आणि हिंदूी सारेगमपमधील विजेती ठरलेली विश्वगायिका वैशाली माडे हिच्या संगीत प्रवासावर ‘महागायिका ते विश्वगायिका’ हा विशेष कार्यक्रम येत्या १ फेब्रुवारी रोजी झी मराठीवर सादर होणार आहे. सायंकाळी सहा वाजता प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात वैशालीचा आजपर्यंतचा संगीत प्रवास, तिची मेहनत, संगीत प्रवासातील काही आठवणी आदी या कार्यक्रमात रसिकांना पाहायला मिळणार आहे. एका छोटय़ाशा गावातून आलेल्या वैशालीची सारेगमपच्या पहिल्या पर्वासाठी निवड झाली नाही. मात्र निराश न होता तिने पुढच्या पर्वात पुन्हा परीक्षा देऊन मेहनतीने मिळवलेले महागायिका हे पद आणि त्यानंतर हिंदी सारेगमपमध्ये मिळवलेला थेट प्रवेश व त्या स्पर्धेतही तिने घडवलेला इतिहास या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.

सर्व दहशतवाद्यांना इस्लाममधून बहिष्कृत करा
धर्म रक्षा मंचच्या सभेतील मागणी
मुंबई, २९ जानेवारी / प्रतिनिधी

भारतातील दहशतवाद पूर्णपणे निपटून काढायचा असेल तर सर्व दहशतवाद्यांना मुस्लिम संघटनांनी इस्लाम मधून बहिष्कृत करावे, अशी मागणी आज मुंबईत झालेल्या संतांच्या संकल्प सभेत करण्यात आली. धर्म रक्षा मंचातर्फे आज शीव येथील सोमय्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेत ही मागणी करण्यात आली. देशातील दहशतवाद जोपर्यंत पूर्ण नष्ट होत नाही तोपर्यंत देशातील संत स्वस्थ बसणार नाहीत. संतातर्फे देशव्यापी जनजागृती आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला. संत आसाराम बापू या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर वारकरी संप्रदायाचे तनपुरे महाराज, साध्वी ऋतंबरा, विश्व हिंदूू परिषदेचे प्रवीण तोगडिया, अशोक सिंघल, जैनमुनी विमलजी प्रसाद तसेच विविध आखाडय़ांचे प्रमुख, अनेक धर्माचार्य उपस्थित होते. मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला म्हणजे भारताच्या अस्मितेला दिलेले आव्हान होते. या देशाच्या षंढ शासनाने दहशतवाग नाहीसा करण्यासाठी काहीही केले नाही. त्यामुळे आता नागरिकानीच एकत्र येऊन हिंदूना आपली ताकद दाखवावी लागेल आणि तरच दहशतवादावर विजय मिळवता येईल, असे या वेळी उपस्थित वक्त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. व्यासपीठावरील मान्यवरांनी आपले विचार या वेळी व्यक्त केले.

जिल्ह्यात पाणी कपातीचा एमआयडीसीचा निर्णय
ठाणे, २९ जानेवारी/प्रतिनिधी

उल्हासनदीत पाणी साठा कमी असल्याने यापुढे प्रत्येक शुक्रवारी १८ तास पाणी कपात करण्याचा निर्णय औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) घेतला आहे. त्यामुळे ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, भिवंडी आदी शहरांना याचा फटका बसणार आहे.मागील वर्षांच्या तुलनेत उल्हासनदीतील पाणी साठा सात टक्के कमी आहे. त्यामुळे जांभूळ व शहाड जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा दर शुक्रवारी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. परिणामी ठाणे, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, भिवंडी, नवी मुंबई या शहरांना पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे लोकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन एमआयडीसीने केले आहे.

आता अबकारी कर, जकात आणि टोल इलेक्ट्रॉनिक यंत्राने भरता येणार
मुंबई, २९ जानेवारी / प्रतिनिधी

राज्यातील ३० विविध तपासणी नाक्यांचे आधुनिकीकरण व जोडणी करण्याच्या प्रस्तावावर आज राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा उपसमितीने आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले.
यामुळे त्या सर्व तपासणी नाक्यांवर अत्याधुनिक कॅमेरे व स्कॅनिंग यंत्रे बसविण्यात येणार आहेत. यात ट्रक त्या तपासणी नाक्यावर आल्यावर त्याचे छायाचित्र घेतले जाईल व त्याचा गाडी क्रमांक नोंद होईल. त्यानंतर आतमधील मालाची तपासणी स्कॅनिंग यंत्राद्वारे करण्यात येईल. तसेच त्या एकाच तपासणी नाक्यावर अबकारी कर, जकात व टोल हा इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे भरून घेतला जाईल, अशी यंत्रणा आता कार्यान्वित करण्यात येणार आहे.

हेरॉईनप्रकरणी जम्मू-काश्मीरचे दोघे हवालदार एटीएसच्या ताब्यात
मुंबई, २९ जानेवारी / प्रतिनिधी

हेरॉईनच्या तस्करीप्रकरणी सध्या अटकेत असलेला आयपीएस अधिकारी साजी मोहन याला मदत केल्याप्रकरणी जम्मू-कश्मीर येथील दोन पोलीस हवालदारांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून उद्या त्यांना मुंबईत आणले जाणार असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख के. पी. रघुवंशी यांनी दिली. नवीनकुमार आणि देवेंद्र पाल अशी या हवालदारांची नावे असून ते साजी हा जम्मू-काश्मीर येथे सेवेत असताना त्याचे अंगरक्षक म्हणून काम पाहत होते. त्यामुळे त्यांना साजीच्या सर्व बेकायदेशीर कारवायांसंदर्भात माहिती असण्याची शक्यता असून त्यांच्याकडून आणखी महत्त्वाची माहिती मिळू शकेल, असा दावा रघुवंशी यांनी केला. मोहन चंदीगढ येथे अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाचा प्रमुख असताना त्याचा कनिष्ठ म्हणून काम पाहणाऱ्या पोलीस अधीक्षक बलविंदर सिंगचीही पथकाकडून सध्या चौकशी सुरू आहे. याप्रकरणी आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत आहे का, या दिशेनेही आपण तपास करीत असल्याचे रघुवंशी यांनी या वेळी सांगितले. तसेच याप्रकरणी आणखी हेरॉईनचा साठा मिळण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.

अंधेरीत तरुणाकडून चार गावठी कट्टे, पिस्तूल हस्तगत
मुंबई, २९ जानेवारी / प्रतिनिधी

एका २१ वर्षे वयाच्या तरुणाकडून अंधेरी पोलिसांनी चार गावठी कट्टे, एक पिस्तूल तसेच १२ जिवंत काडतुसे असा साठा आज जप्त केला. हा शस्त्रसाठा आपण विक्रीसाठी आणला होता, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली आहे.अंधेरू पूर्वेतील पारसी पंचायत रोडवरील वृंदावन हॉटेलजवळ एक संशयित शस्त्रसाठा घेऊन येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, उपनिरीक्षक आनंद भोईर यांनी सापळा रचला असता सदर तरुण तेथे आला. त्याची झडती घेतली असता काळ्या रंगाच्या बॅगेमध्ये चार गावठी कट्टे, एक पिस्तूल आणि १२ जिवंत काडतुसे आढळून आली. अधिक चौकशीसाठी त्याला अटक करण्यात आल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.

नालासोपाऱ्यात आरपीआयच्या युवक अध्यक्षांवर गोळीबार
नालासोपारा, २९ जानेवारी /वार्ताहर

येथील आचोळेगाव तलावासमोर वसई तालुका आरपीआय (आठवले) युवक अध्यक्ष प्रवीण धुळे (३२) यांच्यावर येथील सिकंदर शेख उर्फ सिक्का याने व त्याच्या साथीदारांनी पूर्ववैमनस्यावरून गोळ्या झाडल्याने त्यात ते जबर जखमी झाले. त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भात नालासोपारा पोलिसांनी अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर धुळे याच्या कार्यकर्त्यांनी दुकाने बंद करण्यासाठी दुकानांची मोडतोड करून, दादागिरी करून दुकाने बंद करायला लावल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
प्राथमिक माहितीत प्रविण धुळे व सिकंदर यांच्यात पूर्ववैमनस्य होते. धुळे याने २००५ मध्ये सिकंदर शेख यास जिवे मारण्याता प्रयत्न केला होता. या दोघांविरुद्ध नालासोपारा पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, गर्दी मारामारी अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. गुन्हा घडल्यानंतर तेथील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नालासोपाऱ्यात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. आरोपींना दोन दिवसांत अटक न केल्यास तालुका बंद करण्याचा इशारा धुळे याच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.