Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

आता सर्वसामान्यांसाठी रेल्वेची ‘डेक्कन ओडिसी’!
दक्षिण भारत दर्शन पॅकेज टूर अवघ्या ५६७० रुपयांत
प्रतिनिधी

 

देशांतर्गत पर्यटन वाढीसाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (आयआरसीटीसी)गेल्या महिन्यापासून चालविण्यात येणाऱ्या ‘भारत दर्शन पर्यटन विशेष ट्रेन’ला पर्यटकांची चांगलीच पसंती लाभली आहे. मध्यमवर्गीयांची ‘डेक्कन ओडिसी’ म्हणून नावारुपाला येत असलेल्या या ट्रेनमधून पॅकेज टूरला जाण्यासाठी पर्यटकांची मोठी झुंबड उडत आहे. पुढील महिन्यात ८ फेब्रुवारी रोजी ही ट्रेन मुंबईतून दक्षिण भारतासाठी रवाना होणार आहे. दहा दिवसांच्या या टूरचे शुल्क पाच हजार ६७० रुपये असल्याचे आयआरसीटीसीकडून सांगण्यात आले.
दक्षिण भारत दर्शन टूरअंर्तगत पर्यटकांना मडगाव, एर्नाकुलम, कन्याकुमारी, रामेश्वर, मदुराई, चेंगलपेट, रेणिगुंठा, तिरुमला आदी ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटनदृष्टय़ा महत्त्वाच्या स्थळांना भेट देता येईल. सात डब्यांच्या या ट्रेनमधून एकावेळी सुमारे ५०० पर्यटक टूरमध्ये सहभागी होऊ शकतील. टूरसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये जेवणाचा, राहण्याचा, बसेसमधून पर्यटनस्थळांना भेट देण्याच्या खर्चाचा अंतर्भाव आहे. याखेरीज पर्यटकांच्या सोयीसाठी ट्रेनच्या प्रत्येक डब्यात प्रशिक्षित रेल्वे कर्मचाऱ्यांखेरीज एक सुरक्षा रक्षक असेल, अशी माहिती आयआरसीटीसीच्या अतिरिक्त महाव्यवस्थापक बेला मीना यांनी दिली.
रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी २००४ च्या अर्थसंकल्पात ‘व्हीलेज ऑन व्हील्स’ सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र फारसा प्रतिसाद न लाभल्याने आयआरसीटीसीने त्याऐवजी आता सर्वसामान्यांसाठी कमीतकमी खर्चात भारत दर्शन स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २००८ पासून तीन ट्रेनच्या मदतीने देशाच्या विविध भागांत १०-१५ दिवसांच्या पॅकेज टूरचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे आणि भोपाळ येथून निघालेल्या अनुक्रमे पश्चिम व दक्षिण भारत दर्शनाच्या टूरला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभला. त्यामुळे प्रवाशांच्या आग्रहास्तव मुंबईत दक्षिण भारताच्या आणखी एका टूरचे आयोजन करण्यात आल्याचे आयआरसीटीसीचे महाव्यवस्थापक आर. डी. शर्मा यांनी सांगितले.
सीएसटी येथील आयआरसीटीसीच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या टूरमधून आयआरसीटीसीला नफा होत असल्याचे स्पष्ट करून, येत्या मार्च महिन्यात चारधाम, जम्मू-काश्मीर, दक्षिण भारत, पूर्व भारत आणि बौद्ध धर्मियांच्या पवित्र स्थळांच्या टूर आयोजित करण्यात येणार असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.