Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

फरहान, झोया व जावेद अख्तर एकाच व्यासपीठावर
प्रतिनिधी

 

इंडियन आयडॉलच्या सेटवर नेहमीच काहीतरी नवीन घडत असते. या स्पर्धेतील स्पर्धक बराच काळ आपल्या घरापासून दूर राहतात. त्यामुळे या मुलांची व त्यांच्या पालकांची अचानक भेट घडवून आणून इंडियन आयडॉलने या वेळी खास ‘फॅमिली स्पेशल’ भाग आयोजित केला. या विशेष भागात ‘लक बाय चान्स’ या सिनेमाची दिग्दर्शिका झोया अख्तर, ‘रॉक ऑन’ मुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला व सध्या ‘लक बाय चान्स’ सिनेमात अभिनेता असलेला फरहान अख्तर व सिनेमाचे गीतकार जावेद अख्तर अशा या बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध कुटुंबाला खास आमंत्रित केले होते.
या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करतानाचे अनुभव सांगताना जावेद अख्तर म्हणाले की, फरहान व झोया माझी मुले असली तरी काम करताना आमचे नाते मात्र वेगळे असते. ज्या प्रमाणे इतर तरुण दिग्दर्शकांबरोबर मी वागतो त्याचप्रमाणे माझी वागणूक माझ्या मुलांबरोबरही असते.
आपल्या भावाबरोबर काम करताना काय अनुभव आला याबद्दल बोलताना झोया अख्तर म्हणाली की, फरहान एक चांगला अभिनेता आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करतानाचा अनुभव खूपच चांगला होता. त्याचबरोबर जावेद अख्तर यांनी या सिनेमाला संगीत दिले असल्याने मला ज्याप्रकारचे संगीत हवे आहे तसेच मिळणार याची पूर्ण खात्री होती, असेही ती यावेळी म्हणाली.
या कुटुंबाबरोबरच स्पर्धकांचे आई-वडील या भागासाठी उपस्थित असल्याने स्पर्धकांनाही प्रोत्साहन मिळत होते. राजदीप, भाव्या, सौरभी आणि रेमो यांनी परिक्षकांकडून वाहवा मिळवली. रेमो आता ‘डार्क हॉर्स’ ठरतो की काय असे सर्वांना वाटू लागले आहे. तोर्षांचे गाणे यावेळी अनु मलिकला आवडले नाही तर कपीलचे गाणे सोनालीला भावले नाही.
दरम्यान, इंडियन आयडॉलच्या या विशेष भागाच्या चित्रीकरणादरम्यान झोया व फरहान यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हल्ली चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ‘रिअॅलिटी शो’ चे व्यासपीठ वापरले जाते याबद्दल बोलताना फरहान अख्तर म्हणाला की, रिअॅलिटी शो व सिनेमा या दोघांना या गोष्टीचा फायदा होतो. कारण लोकांना नवीन काही पहायला मिळतं व सिनेमाच्या प्रसिद्धीसाठीही त्याचा फायदा होतो. सिनेमात काम करताना आलेल्या अनुभवाबद्दल बोलताना तो म्हणाला की, या सिनेमात हृतीक रोशनसुद्धा काम करीत आहे. तो एक उत्कृष्ट नर्तक असल्यामुळे त्याच्याबरोबर नाच करताना मला खूप मेहेनत घ्यावी लागली.
‘स्लम डॉग मिलेनियर’ मध्ये भारतातील गरीबी दाखवल्याबद्दल अनेकांनी आक्षेप घेतला आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते या प्रश्नाला उत्तर देताना, आपल्या देशात गरीबी आहे त्याबद्दल कोणी काही बोलत नाही. तर मग हीच बाब सिनेमात दाखविल्याबद्दल आक्षेप असण्याचे काहीच कारण नसल्याचे मत दोघांनीही व्यक्त केले. त्याचबरोबर सिनेमात सिगारेटची दृश्ये दाखवू नयेत या मताला देखील दोघांनीही आक्षेप घेतला. जर खाजगी आयुष्यात लोक सिगारेट ओढतात तर मग सिनेमातील दृश्यांना आक्षेप का घेतला जातो, असे मत त्यांनी व्यक्त केले. हा उत्कंठावर्धक भाग शुक्रवारी रात्री ९.०० वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हीजनवर बघायला मिळेल.