Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

स्मरणिकेतून उलगडल्या ‘मॅजेस्टिक गप्पां’च्या आठवणी!

 

मराठी साहित्य आणि सांस्कृतिक विश्वात मॅजेस्टिक प्रकाशनच्या ‘मॅजेस्टिक गप्पा’ नी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. गेली २५ वर्षे अव्याहतपणे या गप्पा सुरू असून या गप्पा म्हणजे गेल्या २५ वर्षांतील मराठी संस्कृतीचा आरसा आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त मॅजेस्टिकतर्फे एक स्मरणिका प्रकाशित करण्यात आली असून त्यातून गप्पांच्या आठवणी उलगडल्या गेल्या आहेत.
१९८४ मध्ये विलेपार्ले येथे ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार विजय तेंडुलकर यांच्या प्रकट मुलाखतीने या गप्पांना सुरुवात झाली. विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. त्यानंतर आजपर्यंत या गप्पा संघाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात होऊ लागल्या. या गप्पाच्या जोडीला मैदानात ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात येते. गप्पांप्रमाणेच या ग्रंथ प्रदर्शनालाही रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतो. ‘मॅजेस्टिक गप्पा पंचविशी’ या स्मरणिकेचे संपादन केशव परांजपे व शुभांगी पांगे यांनी केले असून शकुंतला मुळ्ये यांनी विशेष सहाय्य केले आहे. या स्मरणिकेत लेख, मुलाखत आणि श्रोत्यांच्या प्रतिक्रिया असे वर्गीकरण करण्यात आले असून पहिल्या व्याख्यानमालेपासून ते गेल्या वर्षीपर्यंतच्या (२००८)सर्व व्याख्यानमालांचा संक्षिप्त वृत्तान्तही देण्यात आला आहे. ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांचा ‘नेहमीच हिट’ हा लेख स्मरणिकेच्या सुरुवातीलाच देण्यात आला आहे. मॅजेस्टिक गप्पा या केवळ टाईमपास म्हणजे विरंगुळा वा शिळोप्याच्या गप्पा राहिल्या नाहीत. लवकरच त्यांचे स्वरूप हे अनेक साहित्यिक-सामाजिक विषयांवरील प्रकट चिंतन असे झाले. आज मागे वळून पाहताना असे नक्की वाटते की मॅजेस्टिक गप्पांमुळेच महाराष्ट्राचे साहित्यिक-सांस्कृतिक आणि सामाजिक-वैचारिक जीवन चांगलेच समृद्ध झाले असल्याचे केतकर यांनी आपल्या या लेखात म्हटले आहे. या खेरीज पद्माकर नागपूरकर (साहित्य सेवेचे अविरत पर्व), मनोहर काळे (रसिकांकरिता केलेला एक वाग्यज्ञ), वीणा देव (मॅजेस्टिक गप्पांमुळे माझ्या मनातल्या आवडीला एक दिशा मिळाली), मुकुंद टाकसाळे (सकारात्मक स्पंदनांची पंचवीस वर्षे), शोभा बोंद्रे (असंही एक साहित्य (संस्कृती) संमेलन-मॅजेस्टिक गप्पा), रवींद्र पांचाळ (कोठावळ्यांचा गोतावळा) तसेच नीला रवींद्र, येशू पाटील यांचे लेख आहेत. दिवंगत केशवराव कोठावळे यांचा वारसा समर्थपणे चालवणारे आणि ‘मॅजेस्टिक गप्पां’चे पडद्यामागचे सूत्रधार अशोक कोठावळे यांची सविस्तर मुलाखत, श्रोत्यांच्या प्रतिक्रियाही (रवींद्र लागू, सीमा देवस्थळी, निवेदिता लागू, मनोहर जोगळेकर) या स्मरणिकेत आहेत. मॅजेस्टिक गप्पांची आजपर्यंतची छायाचित्रे रसिकांना जुन्या काळात घेऊन जाणारी आहेत.
प्रतिनिधी