Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

डोंगरात हरवली वाट

 

गेल्या आठवडय़ात एका वृत्तवाहिनीवर कोयनेच्या जंगलात काही ट्रेकर्स हरविल्याची बातमी झळकली आणि एका-पाठोपाठ एक डोंगरात वाट हरविल्याच्या अनेक घटना झरकन डोळ्यासमोरून गेल्या. ट्रेकिंगला बाहेर पडल्यावर वाट हरविणे हे काही वेळा हमखास घडतं, पण कोयनेच्या या घटनेने १०-१२ तासांच्या अवधीत मोठं स्वरूप धारण केलं होतं. खरं तर सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांत कोणीही कितीही हरविला तरी त्याला फार काळ धडपडावं लागत नाही, पण सोबतचं पाणी, खाण्याचे पदार्थ आणि इतर सहकारी यांचं पाठबळ किती त्यानुसार बऱ्याच वेळा गंभीर परिस्थिती ओढवू शकते.
परवाच्या घटनाक्रमाकडे पाहिले असता दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतात. एक म्हणजे हे सर्व ट्रेकर्स नवोदित होते. (सर्व १८ ते २९ वयोगटातील व तीन परदेशीपण) तसेच त्यांनी ट्रेकसाठी जो रुट घेतला होता त्या संपूर्ण प्रदेशात वन खात्याची पूर्वपरवानगी असेल तरच जाता येतं. पण या मंडळींनी नेमके ज्या भागात वन खात्याची चौकी नाही तेथूनच ट्रेकला सुरुवात केली होती. दुसरे असे की, हा कालावधी मोठय़ा सुट्टीचा असल्यामुळे या भागात बरेच ट्रेकर्स ग्रुप होते, तरीही हा प्रसंग घडला होता. मुख्यत: ही मंडळी एका डोंगरसोंडेवर आल्यावर नेमकी वाट न सापडल्यामुळे भांबावली होती, पण प्रसंगावधान राखून त्यांनी विविध ठिकाणी फोनाफोनी केल्यामुळे बरीच सूत्रं हलली आणि दुसऱ्या दिवशी स्थानिक ग्रामस्थांच्या व वन खात्याच्या साहाय्याने ती मंडळी सुखरूप परतली.
या सर्व घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर डोंगरातली ही घटना तशी छोटीशी असली तरी त्या सर्वाचे वेगवेगळ्या माध्यमांतून, आजूबाजूच्या गावांतून व संपूर्ण डोंगरवेडय़ांच्या क्षेत्रात बरेच पडसाद उमटले. हरविण्याची घटना मोबाईलमुळे त्वरित यंत्रणापर्यंत पोहोचली. प्रसिद्धी माध्यमामुळे बातमीपण पसरली, ट्रेकर्स डोंगरात हरवले ही खरं तर फार मोठी बातमीपण नाही, तरीही हा प्रकार असा काही पसरला की त्या संध्याकाळी मुंबई-पुण्यातील ट्रेकर्स मंडळींत फोनची देवाणघेवाण जोरदार होती. पण अशा घटना तर आजपर्यंत बऱ्याच झाल्या आहेत; किंबहुना स्वत:देखील असे अनुभव घेतले आहेत. २००८ च्या डिसेंबरमध्ये अशीच काही कल्याणची भटकी मंडळी हरिश्चंद्रच्या नळीच्या वाटेने जाताना हरवली. वेळ सायंकाळची असल्यामुळे पुढे जाणेपण शक्य नव्हते. सुदैवाने मोबाइलची रेंज मिळाल्यामुळे मुंबईत ही माहिती ते कळवू शकले आणि आश्चर्याची बाब म्हणजे ताबडतोब फोनाफोनी झाली आणि कल्याणमध्ये एक टीम यांच्यासाठी तयारदेखील झाली. वाट हरवलेल्या मंडळींना फोनवरून मार्गदर्शन करण्यात आले. तेथेच थांबण्यास सांगितले गेले. सुदैवाने सकाळी या हरविलेल्या ट्रेकर्सनी आपली वाट शोधली आणि सुखरूप पायथा गाठला. पण त्यांच्याजवळील पाण्याचा साठा कमी असल्यामुळे डी हायड्रेशनचा त्रास झाला. खाण्याचे पदार्थपण कमी होते आणि ही मंडळीपण नवखी होती.
या दोन घटनांचा विचार केला असता लक्षात येते की, एके ठिकाणीचे नवोदित सरळ पोलीस व इतर पर्यायांकडे (हेलिकॉप्टर वगैरे) जातात, अर्थात त्यांच्यामधील परदेशी ट्रेकर्सचा तो परिणाम असावा, तर दुसरीकडे ही मंडळी आपल्याच डोंगरवेडय़ांकडे हाक देतात आणि पूर्णपणे अनोळखी असणाऱ्यांसाठी एक मदत पथक त्वरित तयार होते, पण या दोन्ही केसमध्ये गिर्यारोहकांच्या अशा मध्यवर्ती पथकाचा अभाव जाणवतो. दोन्ही परिस्थितींतून बाहेर येण्यासाठी योग्य मार्गदर्शन, मदत मोबाइलच्या सुविधेमुळे शक्य झाली.
सर्वजण सुखरूप आले पण, कोयनेच्या प्रसंगाचा गाजावाजाच इतका झाला की, पायथ्याच्या गावात मुंबईतल्याच आणखीन एक न हरविलेल्या ग्रुपकडेपण गावकरी हेच का ते म्हणून पाहात होते.
तसं पाहिलं तर वाट हरविण्याची बाब जितकी छोटीशी तेवढीच गंभीरदेखील आहे. मुख्य म्हणजे डोंगरात भटकणाऱ्यांनी काही मूलभूत नियम पाळले, उदा. पुरेसे पाणी, योग्य नकाशे, खाद्यसामग्री, प्रथमोपचार वगैरे, तर वाट हरविण्यातदेखील साहसी अनुभव घेता येऊ शकतो. पण आजकाल ट्रेकिंग ही पण एक फॅशन बनू पाहात आहे. त्यातूनच मग अपुरी माहिती, अपुरी साधनसामग्री आणि अपुरी दूरदृष्टी घेऊन डोंगरात गर्दी वाढत आहे. खरं तर वाट हरविल्यावर शांतपणे जेथे आहोत तेथेच थांबून आपल्याकडील वस्तूंचा व सहकाऱ्यांचा विचार करून निर्णय घेणे महत्त्वाचे असते. बहुतांश वेळा तसेच होते, फारच गंभीर बाब असेल अथवा अगदीच नवखे असतील तर मग उपरोक्त प्रसंग घडतात. त्यातूनच कधी कधी अनावश्यक बाबींना महत्त्व येते.
पण यात कदाचित गिर्यारोहण क्षेत्राची वेगळीच विचित्र प्रतिमा होऊ शकते. त्यामुळेच अशा घटनांच्या वेळेस होणारा विस्कळीतपणा सुरळीत करायचा असेल एका संघटित बचाव पथकाची रचना होणे गरजेचे आहे.