Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

एचआयव्ही/एड्सविरोधी लढय़ात उतरले सेलिब्रिटी
प्रतिनिधी

 

‘पुढाकार घ्या.. एड्सविरोधात आपला आवाज बुलंद करा’ अशी घोषवाक्ये असलेले हजारो रंगीबेरंगी पतंग आकाशात उडवून गोरेगावच्या आझाद मैदानात ‘बदव रे बदव’ पतंगोत्सव मोठय़ा उत्साहात पार पडला. एचआयव्ही/एड्स विरोधी जनजागृती अभियानासाठी मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या अधिपत्याखाली माध्यम या सेवाभावी संस्थेने आणि शाखा क्र. ४९ चे शाखाप्रमुख सुशिल चव्हाण यांनी या पतंगोत्सवाचे आयोजन केले होते. एचआयव्ही/एड्सविरोधी या लढय़ात राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि हजारो नागरिक सहभागी झाले होते.
डीजे विपिनच्या तालावर सुरू झालेल्या या पतंगोत्सवाचे उद्घाटन शिवसेनेचे आमदार आणिा नेते सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी प्रभाग समितीचे अध्यक्ष नगरसेवक दिलीप िशदे ,मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ. एस. एस. कुडाळकर , उपसंचालक विजय अजनीकर आणि सेन्ट अॅन्जेलो कॉम्प्युटर्सचे संचालक राजेश अथायडे उपस्थित होते. एचआयव्ही/एड्स विरोधी जनजागृतीपर घोषवाक्ये असलेली खास हजारो पतंग यावेळी उपस्थित पतंग शौकिनांना देण्यात आली. त्यानंतर सुरू झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात अभिजित कोसंबी, मंगेश बोरगावकर, विजय गटलेवार, डॉ. नेहा राजपाल, लिटिल चॅम्प सागर फडके आणि राधिका चांदे यांनी धमाल उडवली. एकापेक्षा एकचे विजेते कोरियोग्राफर नंदू आणि नितीन या जोडगळीने आणि नृत्यदिग्दर्शक गौतम पवार यांच्या तेजोमय डान्स अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अनोखा नृत्याविष्कार सादर केला.
आकाशात पतंग उंच उडवून इतरांचे पतंग कापण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे तारुण्याचा जोशही उन्मादाच्या वेगात चुकीचे पाऊल उचलत असतो. त्याला आळा घालणे हे आपले कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य निभावण्यासाठी सध्या मानवजातीला एचआयव्ही/ एड्सचा जो शाप भोगावा लागतोय त्यापासून मुक्ती मिळण्यासाठी एचआयव्ही/ एड्स काय आहे हे समजून घेतले पाहिजे आणि त्यासाठी एचआयव्ही/एड्सविरोधी जनजागृती अभियानात आपण सगळ्यांनी सहभागी होणे गरजेचे आहे, असे उद्गार यावेळी डॉ. कुडाळकर यांनी काढले.