Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

आयुर्वेद लोकाभिमुख होतोय..

 

केंद्र सरकारचा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा ‘आयुष’ विभाग आणि फिकी (फेडरेशन ऑफ इंडियन कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री) यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जी ब्लॉकवर ‘आरोग्य २००९’ हा आयुर्वेद विषयक भव्य कार्यक्रम ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख..
केंद्र सरकारच्या आयुष विभागाने पुढाकार घेऊन मुंबईमध्ये आरोग्य २००९ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे ही स्वागतार्ह बाब आहे. आयुर्वेदाला आवश्यक असणारा राजाश्रय मिळत असल्याचेच हे द्योतक मानायला हवे. ‘आयुष’ हा आरोग्य मंत्रालयाचा स्वतंत्र विभाग सुमारे १६ वर्षांपूर्वी श्री नरसिंहराव यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत कार्यान्वित झाला. आयुर्वेद, युनानी, सिद्ध ही भारतीय वैद्यकशास्त्रे आणि होमिओपॅथी या शास्त्रांचा सरकारी पातळीवर स्वतंत्र विचार करण्यासाठी या विभागाची स्थापना झाली. या विभागाच्या स्थापनेच्या वेळी याचे नांव डिपार्टमेंट ऑफ इंडियन सिस्टीम्स ऑफ मेडिसीन अ‍ॅण्ड होमिओपॅथी असे होते. परंतु नंतर श्रीमती सुषमा स्वराज केंद्रीय आरोग्यमंत्री असताना त्यांनी या विभागाचे नाव डिपार्टमेंट ऑफ ‘आयुष’ असे केले. (आयुषमध्ये अ८४२ँ मध्ये अ - आयुर्वेद, ८ - योग , ४ - युनानी, २ - सिद्ध, - होमिओपॅथी) आयुर्वेद, युनानी, सिद्ध, योग या भारतीय शास्त्रांचा आणि होमिओपॅथीचा विकास व्हावा यासाठी स्वतंत्रपणे विचार व व्यवस्थापन करणारी यंत्रणा हवी या उद्देशाने या विभागाची सुरूवात १९९२ साली झाली. त्याचा सुपरिणाम म्हणून या भारतीय शास्त्रांच्या बाबतीत अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारने स्वातंत्र्यानंतर प्रथमच स्वतंत्र धोरण (नॅशनल पॉलिसी फॉर इंडियन सिस्टीम्स ऑफ मेडिसीन) तयार केले ते २००२ झाली. यामुळे आरोग्य सेवांमध्ये ‘आयुष’ चे स्वतंत्र स्थान निर्माण झाले. आता तर जिल्हा रुग्णालयांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही आयुर्वेद विभाग कार्यान्वित करण्याच्या स्तुत्य हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेतही आयुष आधारित बऱ्याच विषयांना उजाळा मिळालेला दिसतो आहे.
डिसेंबर २००८ मध्ये १६ ते २१ डिसेंबर दरम्यान जयपूर (राजस्थान) येथे तीसरी जागतिक आयुर्वेद परिषद संपन्न झाली. त्यामध्येही ‘आयुष’ चा सहयोग सक्रीय होता. त्यापूर्वी दोन वर्षांपूर्वी पुण्यात आणि २००३ साली केरळात कोची येथेही झालेल्या जागतिक परिषदांत आयुष विभागाने आयुर्वेदाच्या प्रचार प्रसारार्थ आपली सार्थ भूमिका निभावली. दिल्लीमध्येही अशा प्रकारच्या आरोग्य मेळाव्याचे प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन आयुषच्या वतीने करण्यात येते. मुंबईच्या महापौर वैद्य शुभा राऊळ या स्वत: आयुर्वेदीय पदवीधर असल्याकारणाने त्यांच्या नेतृत्वाखालील मुंबई महानगरपालिकेने ‘आरोग्य २००९’ च्या आयोजनाचे यजमानपद भूषविले आहे हे फारच चांगले झाले. अशा कार्यक्रमांमुळे शास्त्राबद्दलचे अनेक गैरसमज दूर होण्यास मदत होते, आयुर्वेदाच्या अनेक वैशिष्टय़ांचा परिचय सर्वसामान्य जनतेला होतो. आयुर्वेद शास्त्र लोकाभिमुख होताना दिसते आहे. आपल्या देशातील जनतेच्या आरोग्यासाठी मूळ भारतीय असलेले आयुर्वेद शास्त्र अधिक उपयुक्त असूनही त्याची उपेक्षाच झाली. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतही आयुर्वेदाच्या सिद्धांतांचा योग्य समतोल करणे सामाजिक आरोग्यासाठी हिताचे ठरणार आहे.
मुंबईतील चार दिवस चालणाऱ्या ‘आरोग्य २००९’ या भव्य कार्यक्रमात सर्वसामान्य जनता, आयुर्वेदाचे विद्यार्थी-वैद्य यांच्यासाठी तसेच औषधी उत्पादकांसाठी २५ च्यावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यामधील आहार, सौंदर्य, स्थूलपणा, मानसिक ताणतणाव, स्त्रियांचे आरोग्य, संधिवात या विषयांवर जनसामान्यांसाठी आयुर्वेदीय तज्ज्ञांची व्याख्याने होणार आहेत. तर या दरम्यान जनतेसाठी विविध विकारांसाठी नि:शुल्क आरोग्य तपासणीचेही आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आयुर्वेदाच्या विद्यार्थी व वैद्यांसाठी वमन, नस्य, स्नेहनस्वेदन, रक्तफेक्षा, बालरोग इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर तसेच युनानी आणि होमिओपॅथी यासंबंधीही व्याख्याने यात होणार आहेत. याचबरोबर आयुर्वेदीय औषधी उत्पादकांसाठी एक स्वतंत्र चर्चासत्राचे आयोजनही या कार्यक्रमात करण्यात आले असून त्यामध्ये आयुर्वेदीय औषधी निर्माणासंबंधी विविधांगी विचार होणार आहे. या कार्यक्रमात वैद्य विनय वेलणकर (डोंबिवली), वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक), वैद्य रजनी गोखले (नाशिक), वैद्य सुचित्रा कुलकर्णी (ठाणे), वैद्य मुकुंद सबनीस (औरंगाबाद), वैद्य राजगोपाल तापडिया - वैद्य अतुल निरगुडे (लातूर), वैद्य लवेकर (दिल्ली), वैद्य आशुतोष यार्दी, वैद्य विद्वांत जाधव (नाशिक), वैद्य चरखा (बीड), वैद्य अनंत धर्माधिकारी, वैद्य स. प्र. समदेशमुख, वैद्य विनीता देशमुख (पुणे), वैद्य अंकलेश्वरकर, वैद्य अभय कुलकर्णी (औरंगाबाद), वैद्य मीरा औरंगाबादकर, वैद्य रं. वि. जोशी (नागपूर), वैद्य ज्ञानेश निकम (नाशिक), वैद्य गिरीश डागा (औरंगाबाद), वैद्य अचला जहागीरदार (जळगाव), वैद्य श. म. साठेय (पुणे), वैद्य मनोज देशपांडे (पुणे), वैद्य धनराज गदूकर (नागपूर), वैद्य रोहिणी काचोळे आदींची व्याख्याने यामध्ये होणार आहेत.
वैद्य विजय कुलकर्णी, नाशिक