Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘लोकसत्ता- यशस्वी भव’चे मार्गदर्शक सुदाम कुंभार यांना राज्य शिक्षक पुरस्कार
प्रतिनिधी

 

महाराष्ट्रातील ९३ शिक्षकांची निवड २००८-०९ च्या राज्य शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये ‘लोकसत्ता’च्या यशस्वी भव मालिकेत मार्गदर्शन करणारे सुदाम गणपत कुंभार यांचीही निवड करण्यात आली आहे.
दहीसर पूर्व येथील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालयात सहाय्यक शिक्षक असलेले सुदाम कुंभार यांना माध्यमिक शिक्षक म्हणून राज्य पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी होणाऱ्या समारंभात या सर्व पुरस्कार विजेत्या शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
समाजाची निस्वार्थ भावनेने व निष्ठेने सेवा करणाऱ्या व ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या कामासाठी प्रोत्साहन म्हणून हे पुरस्कार राज्य शासनाकडून देण्यात येतात.उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत १९६२-६३ पासून हे पुरस्कार देण्यात येत असून पुरस्कार म्हणून ७ हजार ५०० रुपये व पुरस्कार जाहीर झाल्यापासून दोन आगाऊ वेतनवाढीही या पुरस्कारार्थी शिक्षकांना देण्यत येतात. प्राथमिक, माध्यमिक, आदीवासी विभागातील प्राथमिक, कला-क्रीडा विभागातील विशेष शिक्षक, आणि अपंग शिक्षक, व अपंगांसाठी असलेल्या शाळांमधील शिक्षक अशा वर्गवारीमधील एकंदर ९३ शिक्षकांना या वर्षांसाठी हे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.