Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३० जानेवारी २००९

‘लोकसत्ता’ आणि मुंबई विद्यापीठाचा बहि:शाल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कान्हेरी लेण्यांमधील ‘सिटी वॉक’ला ‘लोकसत्ता’च्या वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. वाचकांना कान्हेरी लेण्यांच्या सौंदर्याप्रमाणेच त्यामागील इतिहासाची माहितीही या ‘सिटी वॉक’मध्ये मिळाली. पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. सूरज पंडित यांनी वाचकांच्या प्रत्येक प्रश्नाचे आणि शंकांचे निरसन करत मुंबईचा इतिहास उलगडून दाखविला.

‘लोकसत्ता- यशस्वी भव’चे मार्गदर्शक सुदाम कुंभार यांना राज्य शिक्षक पुरस्कार
प्रतिनिधी
: महाराष्ट्रातील ९३ शिक्षकांची निवड २००८-०९ च्या राज्य शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये ‘लोकसत्ता’च्या यशस्वी भव मालिकेत मार्गदर्शन करणारे सुदाम गणपत कुंभार यांचीही निवड करण्यात आली आहे. दहीसर पूर्व येथील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालयात सहाय्यक शिक्षक असलेले सुदाम कुंभार यांना माध्यमिक शिक्षक म्हणून राज्य पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.

आता सर्वसामान्यांसाठी रेल्वेची ‘डेक्कन ओडिसी’!
दक्षिण भारत दर्शन पॅकेज टूर अवघ्या ५६७० रुपयांत

प्रतिनिधी

देशांतर्गत पर्यटन वाढीसाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनकडून आयआरसीटीसी)गेल्या महिन्यापासून चालविण्यात येणाऱ्या ‘भारत दर्शन पर्यटन विशेष ट्रेन’ला पर्यटकांची चांगलीच पसंती लाभली आहे. मध्यमवर्गीयांची ‘डेक्कन ओडिसी’ म्हणून नावारुपाला येत असलेल्या या ट्रेनमधून पॅकेज टूरला जाण्यासाठी पर्यटकांची मोठी झुंबड उडत आहे. पुढील महिन्यात ८ फेब्रुवारी रोजी ही ट्रेन मुंबईतून दक्षिण भारतासाठी रवाना होणार आहे. दहा दिवसांच्या या टूरचे शुल्क पाच हजार ६७० रुपये असल्याचे आयआरसीटीसीकडून सांगण्यात आले.

फरहान, झोया व जावेद अख्तर एकाच व्यासपीठावर
प्रतिनिधी
: इंडियन आयडॉलच्या सेटवर नेहमीच काहीतरी नवीन घडत असते. या स्पर्धेतील स्पर्धक बराच काळ आपल्या घरापासून दूर राहतात. त्यामुळे या मुलांची व त्यांच्या पालकांची अचानक भेट घडवून आणून इंडियन आयडॉलने या वेळी खास ‘फॅमिली स्पेशल’ भाग आयोजित केला. या विशेष भागात ‘लक बाय चान्स’ या सिनेमाची दिग्दर्शिका झोया अख्तर, ‘रॉक ऑन’ मुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला व सध्या ‘लक बाय चान्स’ सिनेमात अभिनेता असलेला फरहान अख्तर व सिनेमाचे गीतकार जावेद अख्तर अशा या बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध कुटुंबाला खास आमंत्रित केले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करतानाचे अनुभव सांगताना जावेद अख्तर म्हणाले की, फरहान व झोया माझी मुले असली तरी काम करताना आमचे नाते मात्र वेगळे असते. ज्या प्रमाणे इतर तरुण दिग्दर्शकांबरोबर मी वागतो त्याचप्रमाणे माझी वागणूक माझ्या मुलांबरोबरही असते.

स्मरणिकेतून उलगडल्या ‘मॅजेस्टिक गप्पां’च्या आठवणी!
मराठी साहित्य आणि सांस्कृतिक विश्वात मॅजेस्टिक प्रकाशनच्या ‘मॅजेस्टिक गप्पा’ नी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. गेली २५ वर्षे अव्याहतपणे या गप्पा सुरू असून या गप्पा म्हणजे गेल्या २५ वर्षांतील मराठी संस्कृतीचा आरसा आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त मॅजेस्टिकतर्फे एक स्मरणिका प्रकाशित करण्यात आली असून त्यातून गप्पांच्या आठवणी उलगडल्या गेल्या आहेत. १९८४ मध्ये विलेपार्ले येथे ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार विजय तेंडुलकर यांच्या प्रकट मुलाखतीने या गप्पांना सुरुवात झाली. विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले थकीत
प्रतिनिधी:
मुंबई व परिसरातील महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले लाल फितीच्या कारभारात अडकली असून वर्षांनुवर्षे ही बिले मंजूरच केली जात नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई विद्यापीठाचे अधिसभा सदस्य सुभाष आठवले यांनी उच्च शिक्षण सहसंचालकांकडून माहिती अधिकार कायद्यान्वये मिळविलेल्या कागदपत्रांतून ही बाब उघडकीस आली आहे. विविध महाविद्यालयांतील ५१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बिले मंजूरीच्या प्रतिक्षेत आहेत. यापैकी सहसंचालकांच्या कार्यालयात २१ कर्मचाऱ्यांची, संचालकांच्या कार्यालयात १० कर्मचाऱ्यांची व महाविद्यालयांमध्ये २० कर्मचाऱ्यांची बिले थकीत आहेत. यातील काही बिले तर अडीच वर्षांपासून थकलेली आहेत. ४० हजार रूपयांपर्यंतची वैद्यकीय बिले मंजूर करण्याचे अधिकार सहसंचालकांना आहेत. तर एक लाखापर्यंतच्या बिलांचे अधिकार संचालकांकडे व त्यापुढील अधिक रकमेच्या बिलांचे अधिकार उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे आहेत. बिलांच्या मंजूरीची ही प्रक्रिया एवढी वेळखाऊ आहे की, कर्मचारी दुसऱ्यांदा आजारी पडला तरी त्याचे अगोदरचे बिल मंजूर झालेले नसते, अशी नाराजी आठवले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. या प्रश्नाची तड लावण्यासाठी आठवले व अधिसभा सदस्य वैभव नरवडे यांनी प्रभारी उच्च शिक्षण सहसंचालक एस. जी. गुप्ता यांची भेट घेऊन ही बिले तातडीने मंजूर करण्याची मागणी केली आहे. याबाबत, गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता, थकलेली बिले मंजुर करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. बरीच प्रकरणे आम्ही मंजूर केली असून उरलेली प्रकरणेही लवकरच मंजूर होतील, असे ते म्हणाले.

रुग्णालय संगणकीकरण : सेना-भाजपला श्रेय मिळू नये यासाठी काँग्रेसची धडपड
खास प्रतिनिधी
: महानगर पालिकेच्या केईएम, शीव आणि नायर आदी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या लक्षावधी रुग्णांसाठी तसेच डॉक्टरांसाठी सर्वार्थाने उपयुक्त असे सॉफ्टवेअर तयार होऊन तब्बल २३ महिने उलटले आहेत. परंतु हार्डवेअर खरेदी करण्यात प्रशासनाकडून दिरंगाई होत असताना त्याबाबत प्रशासनाला धारेवर धरण्याऐवजी पालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष असेलल्या काँग्रेसने या कामाचे श्रेय शिवसेना-भाजपला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मिळू नये यासाठी या संगणकीकरणाच्या कामात घोटाळा असल्याचे आरोप करून अधिक दिरंगाई कशी होईल, याची ‘काळजी’ घेण्यात येत आहे.

डोंगरात हरवली वाट
गेल्या आठवडय़ात एका वृत्तवाहिनीवर कोयनेच्या जंगलात काही ट्रेकर्स हरविल्याची बातमी झळकली आणि एका-पाठोपाठ एक डोंगरात वाट हरविल्याच्या अनेक घटना झरकन डोळ्यासमोरून गेल्या. ट्रेकिंगला बाहेर पडल्यावर वाट हरविणे हे काही वेळा हमखास घडतं, पण कोयनेच्या या घटनेने १०-१२ तासांच्या अवधीत मोठं स्वरूप धारण केलं होतं. खरं तर सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांत कोणीही कितीही हरविला तरी त्याला फार काळ धडपडावं लागत नाही, पण सोबतचं पाणी, खाण्याचे पदार्थ आणि इतर सहकारी यांचं पाठबळ किती त्यानुसार बऱ्याच वेळा गंभीर परिस्थिती ओढवू शकते.

विजय ताठरे यांचे निधन
प्रतिनिधी:
विजय गंगाराम ताठरे यांचे नुकतेच येथे निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी , एक मुलगा , एक मुलगी , आई , भाऊ , वहिनी असा परिवार आहे. विजय ताठरे हे ‘ लोकसत्ता ’ मधील मुद्रित तपासनीस व मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य सत्यवान ताठरे यांचे ज्येष्ठ बंधू होत.