Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३० जानेवारी २००९

नवनीत

भारताचे तिसरे राष्ट्रपती डॉ. ज़ाकिर हुसैन यांच्यावर तीन व्यक्तींचा फार प्रभाव होता- पहिले त्यांचे धर्मगुरू शाह हसन, दुसरे गांधीजी आणि तिसरे पंडित जवाहरलाल नेहरू. या व्यक्तींव्यतिरिक्त डॉ. ज़ाकिर हुसैन यांच्यावर मौलाना मुहम्मद अली जौहर, मौलाना अबुल कलाम आज़ाद आणि हकीम अजमल खाँ यांचाही फार प्रभाव होता. डॉ. ज़ाकिर हुसैन राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे खंदे पुरस्कर्ते मानले जातात. राष्ट्रीयता आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याची भावना त्यांच्या मनात त्यांचे धर्मगुरू शाह हसन यांच्यामुळे वाढीला लागली. शाह हसनचे प्रशिक्षण त्यांचे धर्मगुरू शाह हुसैन यांनी केले होते, हेदेखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

 


शाह हसनने एका मैफलीत एका हिंदू अनुयायावर त्याने कपाळावर फार मोठे गंध लावून आल्याने काही टिप्पणी केली. हे ऐकताच त्यांच्या गुरूने त्यांना त्याच मैफलीत आदेश दिला, ‘‘मुसलमानी कपडे काढा. कपाळावर गंध लावा. हिंदू संन्याशाप्रमाणे भगवे वस्त्र परिधान करा आणि येथून थेट हिमालयात जाऊन काश्मीर ते दक्षिणेत रामेश्वरम्पर्यंत पायी चालत जा आणि तेथील पुरोहित व पुजाऱ्यांचे प्रमाणपत्र घेऊन येथे पायी परत या. तरच तुम्हाला माफी देण्यात येईल.’’
सूफी शाह हसनने आपल्या गुरूच्या आदेशाचे पालन केले. त्याने लगेचच प्रवासाला सुरुवात केली. हे सर्व करून त्यांना क़ायमगंजला परत येण्यास तब्बल तीन वर्षे लागली. अशा सनदशीर धर्मगुरूचे डॉ. ज़ाकिर हुसैन आध्यात्मिक शिष्य होते. डॉ. जमकिर हुसैन धर्माने मुसलमान आणि सातत्याने शेरवानी टोपी नेसत असले तरी त्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरा आत्मसात केली होती. राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यावर आकाशवाणीवरून आपल्या पहिल्या प्रसारणात ते म्हणाले होते- ‘‘संपूर्ण भारत हे माझे घर आहे आणि त्यात वास्तव्य करणारा प्रत्येक नागरिक माझा कुटुंबीय आहे..’’
अनीस चिश्ती

शुक्र हा सूर्यापासून बुधापेक्षा दूर असूनही त्याचे तापमान बुधापेक्षा जास्त का?
बुध व शुक्र हे पृथ्वीपेक्षा सूर्याच्या जवळ आहेत. बुधाचे सूर्यापासूनचे अंतर हे पृथ्वी-सूर्य अंतराच्या ०.४ पट, तर शुक्राचे अंतर ०.७ पट एवढे आहे. साहजिकच पृथ्वीच्या तुलनेत, बुधापर्यंत ६.२५ पट व शुक्रापर्यंत १.९२ पट जास्त सूर्यप्रकाश पोहोचतो. याचा अर्थ असा, की बुधावर सूर्याचे तेज हे शुक्रापेक्षा ३.२५ पट जास्त जाणवते. म्हणूनच बुधाचे तापमान शुक्रापेक्षा जास्त असले पाहिजे. समजा, दोन्ही ग्रह वातावरणविरहित असते व संपूर्ण सौरऊर्जा शोषून घेणारे असते, तर बुधाचे सरासरी तापमान १६० अंश सेल्सिअस, तर शुक्राचे सरासरी तापमान शून्याखाली २० अंश सेल्सिअस एवढे असते. पण प्रत्यक्षात बुधाचे सरासरी तापमान १२० अंश सेल्सिअस, तर शुक्राचे तापमान तब्बल ४५० अंश सेल्सिअस एवढे आहे.
कमी सौरऊर्जा मिळूनही शुक्र एवढा तप्त का आहे, या कोडय़ाचे रहस्य दडले आहे शुक्राच्या दाट वातावरणात. शुक्राचे वातावरण पृथ्वीच्या वातावरणापेक्षा ९० पट दाट आहे. हे वातावरण कार्बन-डाय-ऑक्साईडचे असून वातावरणातील ढग सल्फ्युरिक आम्लाचे आहेत. शुक्राला मिळणाऱ्या सौरऊर्जेपैकी बहुतांश ऊर्जा या वातावरणातून परावर्तित होते आणि केवळ २.५ टक्के ऊर्जा ही शुक्राच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचते. पण एकदा ही ऊर्जा आत पोहोचली की तिथेच अडकून पडते. वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साईडमुळे ही ऊर्जा, विशेषत: अवरक्त प्रारणे, वातावरणाच्या बाहेर जाऊ शकत नाही. या ‘हरितगृह’ परिणामामुळे शुक्राचा संपूर्ण पृष्ठभाग तापत जातो. पृष्ठभागाची ही तप्तता शुक्रावर सर्वत्र असून, शुक्राच्या पृष्ठभागाचे तापमान कुठेही गेल्यास बऱ्याच अंशी समान असते.
अभय देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

शिखांचे सहावे गुरू हरगोविंदराय यांनी गुरूगादीसाठी निवड केली ती आपला नातू हरियाल याची. ३० जानेवारी १६३० चा त्याचा जन्म. तो काळ औरंगजेबाचा. त्याच्या कपटीपणाला गुरूजींनी विरोध दर्शवला. अवघे ३२ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या हरगोविंदरायांनी काबूलातही अनुयायांचे जाळे विणले. लंगर संस्थेचे व्यावसायिकरण केले. वंशाच्या दिव्यालाच गुरुगादीवर बसविण्याचा प्रघात असल्याने मोठा मुलगा औरंगजेबाला मिळाल्यानंतर पाच वर्षांचा मुलगा हरिकृष्ण यालाच त्यांनी वारस म्हणून जाहीर केले. ६ ऑक्टोबर १६६१ ला त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

पाचवी ‘अ’च्या वर्गात जयू सगळय़ात धीट मुलगी म्हणून ओळखली जायची. वर्गातल्या मुली तिच्या पुढे पुढे करायच्या. तिच्याशी बोलायला धडपडायच्या, कारण अख्ख्या वर्गात सगळय़ात शूर म्हणून ती शाळेत प्रसिद्ध झाली होती. तिला मुळीच कशाची भीती वाटायची नाही. एकदा तिच्या दप्तरात चांगलं मोठ्ठं, लांब मिशांचं फताडय़ा, फेंगडय़ा पायांचं काळसर तपकिरी रंगाचं झुरळ शिरलं. शेजारी बसलेली उमा किंचाळून उडय़ा मारायला लागली. तिचं ओरडणं ऐकून आजूबाजूच्या मुली ओरडू लागल्या. इकडे तिकडे धावायला लागल्या. सगळा गोंधळ उडाला. बाईंनाही कळेना की झालं काय एवढं? जयूनं सरळ दप्तरात हात घातला. इकडे तिकडे धावणाऱ्या झुरळाला चक्क मुठीत पकडलं. सगळय़ाजणी बघत राहिल्या. ती खिडकीपाशी गेली आणि मुठीतलं झुरळ तिनं बाहेर भिरकावून दिलं, तेव्हा कुठं काय गोंधळ चालला होता ते बाईंना कळलं आणि तास पुढे सुरू झाला.
त्या दिवसापासून उमा जयूची अगदी फॅन बनली. जयूचा तिला हेवाही वाटायला लागला. ‘केवढी धीट आहे ही! अंधाराला घाबरत नसेल. भुताला किंवा राक्षसालासुद्धा घाबरत नसेल. कसली ग्रेट नाही,’ उमाच्या मनात येई. तिची आई सांगे की, दिवेलागणीला देवाला नमस्कार करावा. प्रार्थना करावी. ती प्रार्थना देव ऐकतो. जयू संध्याकाळ झाली की हात-पाय धुऊन देवाला नमस्कार करायची आणि प्रार्थना करायची, ‘‘देवा, मला जयूसारखं शूर कर. मला जयूसारखं व्हायचं आहे.’’ रात्री झोपेतसुद्धा तिला जयू दिसायची.
हळूहळू ती जयूसारखीच बोलायला लागली. जयूसारखं केसांचं वळण घेऊ लागली. जयूसारखं दप्तर, डबा, पाण्याची बाटली तिनं आईच्या मागे भुणभुण लावून आणली. वर्गातल्या मुली उमाला चिडवू लागल्या. ती दिसली की कुजबुजून हसू लागल्या. तिचं नाव पडलं, ‘कार्बन कॉपी’. तिला कुणी मैत्रीण उरली नाही. तिच्याशी कुणी खेळेना. वर्गात हास्यास्पद होऊन बसलेली उमा फार एकटी पडली. जयूसारखे होण्याच्या अट्टहासापायी दु:खी झाली.
‘मोठं झाल्यावर कोण होणार? ’असं तुम्हालाही वडिलधारी मंडळी विचारत असतील. खूप अभ्यास कर म्हणजे कुणीतरी मोठा होशील असंही म्हणत असतील. खरंतर तुम्ही आत्ताही ‘कोणीतरी’ असताच. र्वष जातात तसे तुम्ही मोठे होता, पण आज तुम्ही जे आहात त्यापेक्षा वेगळे होत नाही. कुणासारखे तरी व्हायची इच्छा करायची म्हणजे आपण स्वत: जे आहोत तसे न होण्याची इच्छा करणं आहे.
आजचा संकल्प- तुम्ही आयुष्यात जिथे आहात, जसे आहात, त्याचा अभिमान बाळगा, कौतुक करा.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com