Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३० जानेवारी २००९

नंबर वन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेएनपीटी बंदराच्या कामगार वसाहतीतील ब्युटी स्पॉट कारंज्यांची ही अशी दुरवस्था झाली आहे.

पाणी योजनांचे २८ कोटी अखेर पालिकेच्या तिजोरीत
नवी मुंबई/प्रतिनिधी

नवी मुंबईतील वेगवेगळ्या विकासकामांसाठी दिल्लीकडून येणाऱ्या निधीकडे डोळे लावून बसलेल्या नवी मुंबई महापालिकेवर अखेर दिल्लीश्वर प्रसन्न झाले असून, शहरातील पाणी योजनांसाठी सुमारे २८ कोटी रुपयांचा निधी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. साधारण आठवडाभरापूर्वी नवी मुंबईतील मलनि:सारण प्रकल्पांवर ३५३ कोटी खर्च करण्याच्या प्रस्तावास केंद्राने मंजुरी दिली होती. या पाश्र्वभूमीवर जवाहरलाल नेहरू विकास योजनेतील हा पहिलाच निधी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.

शिवसेनेचा आयुक्तांना घेराव
नवी मुंबई/प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत ऐरोली येथे उभारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब भवनाचा वाद आता आणखीनच चिघळण्याची चिन्हे दिसू लागली असून, हे भवन उभारताना वेळकाढू धोरण अवलंबिणाऱ्या आयुक्त विजय नाहटा यांना या प्रश्नावर आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातल्याने एकच खळबळ उडाली. ऐरोली येथील मैदानाचे आरक्षण असलेल्या भूखंडावर हे आंबेडकर भवन उभारले जाणार आहे. मात्र, मैदानाच्या आरक्षणात बदल करूनच हे भवन उभारण्याची भूमिका नाहटा यांनी घेतली आहे. असे असले तरी या भवनासाठी आरक्षित असलेल्या भूखंडाचा काही भाग बहुउद्देशीय इमारतीसाठी वापरण्यात येणार आहे. त्यासही आज शिवसेनेने विरोध दर्शविला.

महसूल बुडाला.. अतिक्रमणे वाढली
आयुक्तांची घोषणा हवेत विरली

नवी मुंबई, प्रतिनिधी : नवी मुंबईतील अतिक्रमणांवर कारवाईचे आसूड ओढून शहराला सिंगापूरच्या वाटेवर न्यावे, यासाठी गेल्या चार वर्षांपासून जीवाचा आटापिटा करणारे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या या अभिलाषेचा त्यांचीच सत्ता असलेल्या महापालिकेतील प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी पार गळा घोटल्याचे एक धक्कादायक उदाहरण पुढे येऊ लागले आहे. शहरातील दुकानांसमोरील मोकळ्या जागांच्या (मार्जिनल स्पेस) गैरवापरास पायबंद बसावा, यासाठी आयुक्त विजय नाहटा यांनी दोन वर्षांपूर्वी काढलेल्या एका आदेशाचे एव्हाना तीनतेरा वाजल्याचे स्पष्ट होऊ लागले असून, महापालिकेनेच शहरात केलेल्या एका सर्वेक्षणात या आदेशाचे पितळ उघडे पडले आहे.

सेना-मनसेची अजब युती
पनवेल/प्रतिनिधी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमधील ‘जय महाराष्ट्र’ व्यायामशाळेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘रायगड श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेतील विजेत्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रायोजित केलेली सन्मानचिन्हे देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. ही स्पर्धा आयोजित करणारी मंडळी शिवसेनेमध्ये सक्रिय असताना, तसेच त्यातील काही शिवसेनेचे पदाधिकारी असूनही कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असणाऱ्यांची ही युती कशी झाली, असा प्रश्न विचारला जात आहे.

नगरसेवकाला धमकाविणाऱ्या पाच जणांना अटक
पनवेल/प्रतिनिधी

पनवेल नगरपालिकेतील नगरसेवक अरिफ पटेल यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या, तसेच त्यांच्याकडे ५० लाख रुपयांची मागणी करणाऱ्या पाच जणांना पनवेल शहर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. अस्लम कच्छी, संदीप वाघपंजे, देवीदास पाटील, राजेश पाटील, अतुल कुलकर्णी अशी या आरोपींची नावे आहेत. पटेल यांचा केरोसीन, तसेच जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून, एका व्यवहारादरम्यान त्यांचा कच्छीशी परिचय झाला होता. हा व्यवहार कच्छीने अपूर्ण ठेवल्याने आपण त्याला पैसे दिले नाहीत, मात्र मदतीपोटी काही वेळा काही रक्कम त्याला दिली, असे पटेल यांनी म्हटले आहे. बुधवारी कच्छी याने मोबाइलवरून पटेल यांच्याकडे ५० लाख रुपयांची मागणी केली. पटेल यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने रात्री साधारण साडेनऊ वाजता कच्छी आपल्या साथीदारांसह पटेल यांच्या निवासस्थानी आला व त्याने त्यांना बाहेर बोलावले. ते बाहेर आल्यानंतर कच्छीने त्यांच्यावर पिस्तूल रोखून ५० लाख रुपयांची मागणी केली. पटेल यांनी आरडाओरडा केल्यानंतर आसपासचे नागरिक धावून आले व त्यांनी या पाच जणांना पकडले. यातील काहींनी पोलिसांशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी या पाच जणांना ताब्यात घेतले.

अडीच कोटींच्या वसुलीसाठी जुईनगर रेल्वे कार्यालयावर कारवाई
ठाणे/प्रतिनिधी : रेल्वे प्रकल्पासाठी घेतलेल्या जागेचा मोबदला देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मध्य रेल्वेच्या जुईनगर येथील कार्यालयावर कारवाई करून आज जिल्हाधिकारी कार्यालयाने रेल्वेला दणका दिला. मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेने रेल्वे प्रकल्पासाठी महसूल विभागाकडून जमीन घेतली होती. या जमिनीच्या मोबदल्यापोटी द्यावयाच्या सात कोटींपैकी साडेचार कोटी रुपये रेल्वेने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले होते. मात्र उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होते. याबाबत ठाणे तहसीलदारांनी वारंवार नोटिसा पाठवूनही रेल्वेने थकबाकीची उर्वरित रक्कम देण्यास असमर्थता दर्शविली होती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज तहसीलदारांनी रेल्वेचे जुईनगर येथील मुख्य अभियंत्याचे कार्यालय सील केले. ही कारवाई करताना रेल्वे प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात आली असून, रेल्वेने देय रक्कम त्वरित न दिल्यास संपूर्ण कार्यालयास सील ठोकण्याचा इशारा देण्यात आला. ही कारवाई अव्वल कारकून दिनेश पैठणकर, तलाठी गायकवाड आणि मंडल अधिकारी गायकर यांनी केली.