Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३० जानेवारी २००९

प्रमाणापेक्षा अधिक व कमी थंडीमुळे गहू पिकावर प्रतिकूल परिणाम होतो. यंदा थंडीचे प्रमाण अतिशय समतोल असल्याने नाशिक, धुळे या जिल्ह्य़ांमध्ये गहू पिकाची स्थिती उत्तम आहे. सध्या हे पीक ओंब्यांवर आले असून योग्य हवामानामुळे गव्हाचे उत्पादन समाधानकारक होईल, असा अंदाज कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

शाहीमुद्रा प्रतिष्ठानतर्फे विश्वास नागरेंचा नागरी सत्कार
प्रतिनिधी / नाशिक:
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रसंगी प्राणाची पर्वा न करता दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देणारे मुंबई पोलीस दलातील अधिकारी विश्वास नागरे यांचा येथे जाहीर नागरी सत्कार शाहीमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल बागमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. दहशतवादी ताज हॉटेलमध्ये शिरल्याचे समजल्यानंतर सर्वप्रथम हॉटेलमध्ये विश्वास नागरे हे पोलीस अधिकारी पोहोचले. दहशतवाद्यांशी सामना केला. जखमी अवस्थेतही त्यांनी दोन तास आपल्या निवडक कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने दहशतवाद्यांना बाहेर पडण्यापासून रोखून धरले. नागरे यांची ही कामगिरी कौतुकास्पद असली तरी सरकारतर्फे त्यांचा कोणत्याही प्रकारचा गौरव झालेला नाही. त्यामुळे प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सरकारने शहीद झालेल्या अधिकाऱ्यांचा शौर्यपदक देऊन गौरव केला. परंतु ज्या अधिकाऱ्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता दहशतवाद्यांचा सामना केला, त्यांचाही उचित सन्मान होणे आवश्यक होते, असे मत बागमार यांनी व्यक्त केले. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शिवाजी गिते, शैलेश महाजन, सचिव अतुल पवार, राकेश पिंगळे आदींसह सदस्य उपस्थित होते.

नाशिकच्या आसमंतात लवकरच ‘एअर शो’चा थरार
प्रतिनिधी / नाशिक

बहुतांश लढाऊ विमानांची निर्मिती शहरालगतच्या एच.ए.एल. कारखान्यात होत असली तरी येथे नेमकी कोणकोणती विमाने तयार केली जातात आणि त्याची कार्यपद्धती कशी असते, याबद्दलची माहिती बहुतांश नाशिककरांजवळ नाही. प्राथमिक माहिती नसताना लढाऊ विमानांचा अवकाशातील थरार पाहण्याची संधी तरी मग कशी मिळणार? गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांना याबाबत असणाऱ्या जिज्ञासेची पूर्ती व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे यशस्वी तोडगा काढण्यात आला असून एच.ए.एल. आणि भारतीय हवाई दलाच्या विद्यमाने विविध स्वरूपाच्या लढाऊ विमानांची केवळ माहितीच नव्हे तर हवेतील त्यांच्या विलक्षण कसरतीही थेट याची डोळा पाहण्याची दुर्मिळ संधी शहरवासियांना उपलब्ध होणार आहे. येत्या मार्चमध्ये प्रथमच स्थानिक पातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या ‘एअर शो’च्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

नाशिक कलानिकेतनतर्फे आजपासून चित्रप्रदर्शन
प्रतिनिधी / नाशिक

कॅनव्हॉसवरील रंगाची उधळण कोणालाही प्रसन्नतेच्या जगात घेऊन जाते. रोजच्या जीवनात निसर्गातील विविध कलाविष्कार, त्यामधील सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी शोधक नजरेची गरज आहे, हेच खरे. सकाळी उठल्यावर पानावर दिसणारा दवबिंदू अलगद आपल्या कोवळ्या हातात झेलणारा हसरा चेहरा, उमलणारे फुल, कोकणातील माडीचे सौंदर्य आपल्या दिडशे स्क्वेअर फुटच्या गॅलरीतून हद्दपार झाले असले तरी निसर्गाच्या विविध करामती, त्याचा आविष्कार, याची झलक येथील कलानिकेतनतर्फे शुक्रवारपासून आयोजित चित्रप्रदर्शनामुळे नाशिककरांना पाहता येईल.

मनसे म्हणते, हा तर राजकीय बनाव !
प्रतिनिधी / नाशिक

प्रजासत्ताकदिनी सातपूर येथे आयोजित भोजपुरी गीतांचा कार्यक्रम मनसेने उधळून लावल्याच्या कारणावरून मनसेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नाशकातच त्याविषयी नाराजीचा सूर उमटत असल्याच्या पाश्र्वभूमीवर, मनसेची नेतेमंडळी आता हा सगळा राजकीय बनाव असल्याचे सांगण्यास पुढे सरसावली आहेत. भोजपुरीच्या विरोधात यापूर्वीही आवाज उठविणाऱ्या मनसेला डिवचण्यासाठी मुद्दाम या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले व मनसे कार्यकर्त्यांना उत्तर दिल्यावर आता अन्य पक्षांचे नेते त्याला भडक रंग देऊन स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेत असल्याची प्रतिक्रिया या पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे.

ई-गव्हर्नन्स प्रणाली स्वीकारा -भुजबळ
नाशिक / प्रतिनिधी

कामकाजाच्या ठिकाणी चांगले वातावरण निर्माण करून दिल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढून गतिमान प्रशासनाचा जनतेला लाभ मिळू शकतो. गतीमान प्रशासनासाठी आधूनिकता केवळ बाह्य़दर्शी न स्वीकारता प्रशासनात ई-गव्हर्नन्स प्रणालीनुसार चालले पाहिजे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नाशिकरोड येथे विभागीय आयुक्त कार्यालयातील नुतनीकरण केलेल्या नियोजन सभागृहाचे उद्घाटन भुजबळ यांच्या हस्ते झाले.

शेतकऱ्यांना शासनाकडून १५ कोटी रुपये घेणे - मुंडे
धुळे / वार्ताहर

शासनाने जाहीर केल्याप्रमाणे कापसाला तीन हजार रुपये हमी भाव दिला तर नाहीच, पण शेतकऱ्यांना अद्याप पैसेही दिलेले नाहीत. उलट शेतक ऱ्यांचेच शासनाकडून १५ कोटी रुपये घेणे असून ही रक्कम येत्या एक फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना न दिल्यास राज्यभरात कोणत्याही मंत्र्याला फिरू देणार नाही, असा इशारा देत भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी वीज भारनियमनासह रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाच्या हाती सत्ता सोपविण्याची गरज व्यक्त केली.

बनावट नोटा, चंदन तस्करीतील संशयितांना पोलीस कोठडी
वार्ताहर / धुळे

बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी संशयितास चार फेब्रुवारीपर्यंत तर चंदनाची बेकायदा वाहतूक करणाऱ्या तीन संशयितांना एक फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. देवपूर व मोहाडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी ही कारवाई केली होती.
देवपूरमधील वीटभट्टी परिसरात वास्तव्यास असलेल्या ईस्माइल शेख नजीर (३६) या संशयिताकडे ५०० रूपयांच्या बनावट नोटा असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती. २७ जानेवारी रोजी पोलिसांनी ईस्माइलच्या घरी छापा टाकला असता ५०० रूपयांच्या २१ बनावट नोटा त्याच्याकडे आढळून आल्या. पोलिसांनी अटक केल्यावर त्यास न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यास चार फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. दुसऱ्या एका घटनेत ट्रकमधून चंदनाची अवैध वाहतूक केल्याच्या आरोपावरून मोहाडी पोलिसांनी चालक दिलावर ईस्माइल काझी, मोहन खोमणे व सईद या तीन संशयितांना अटक केली. पोलीस ठाण्यात त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता एक फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

लोकशाही दिनाच्या धर्तीवर आता कर्मचारी दिन
नाशिक / प्रतिनिधी

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत नाशिक विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी व सेवाविषयक समस्या सोडविण्यासाठी विभागीय स्तरावर ‘कर्मचारी दिन’ चार महिन्यातून एकदा आयोजित करण्यात येणार आहे. या दिनाचे स्वरुप हे लोकशाही दिनाच्या धर्तीवर असेल. कर्मचारी दिन हा महिन्याच्या चवथ्या शनिवारी आयोजित करण्यात येईल. येत्या ८ फेब्रुवारी रोजी कर्मचारी दिन आयोजित करण्यात आलेला आहे. तसेच वर्षभरात २५ एप्रिल, २२ ऑगस्ट व २६ डिसेंबर रोजी कर्मचारी दिन आयोजित करण्यात येणार आहे. या कर्मचारी दिनी सेवाविषयक बाबींचा, तक्रारींचा, सेवा निवृत्ती प्रकरणे, विविध अग्रीमे, वैद्यकीय देयके, गोपनीय अहवाल, पदोन्नती, शिस्तभंग विषयक, रजा प्रकरणे इत्यादी विषय हाताळले जातील. मात्र कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबतचा विषय विचारात घेतला जाणार नाही. विभागीय समाज कल्याण अधिकारी लक्ष्मीकांत महाजन यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

संपूर्ण कर्जमाफीसाठी आंदोलनाचा किसान सभेचा निर्णय
नाशिक / प्रतिनिधी

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, भारनियमन या प्रश्नाविषयी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राज्य किसान सभेच्या नाशिक जिल्हा अधिवेशन देण्यात आला आहे. अधिवेशनात जिल्हा कार्याध्यक्षपदी राजू देसले तर अध्यक्षपदी दामूअण्णा पाटील यांची निवड करण्यात आली आहे. आदिवासींच्या नावावर वनजमिनी कराव्यात, वनाधिकार कायद्याची त्वरीत कार्यवाही करावी, आळंदी उपसा जलसिंचन संस्थेचे लेखा परीक्षण करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचा ठरावही अधिवेशनात समंत करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. सचिवपदी भास्कर शिंदे, सहसचिवपदी साहेबराव ठोंबरे, उपाध्यक्षपदी शंकर गंभीरे, प्रा. के. एन. अहिरे, जगन माळी, बाळासाहेब काळे, कौतिक जाधव, सूर्यभाम शिंदे यांची निवड करण्यात आली. राज्याचे सरचिटणीस नामदेव गावडे, माजी आमदार माधवराव गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्ग प्रश्नी अपप्रचार बंद करा - गोटे
धुळे / वार्ताहर

मनमाड-धुळे-शिरपूर-इंदूर रेल्वे मार्गासंदर्भातील अपप्रचार बंद करावा असे सांगतानाच या लोहमार्गासाठी मदत करण्याची इच्छा नसेल तर किमान हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेण्याचे प्रकार थांबवा, असे आवाहन लोकसंग्राम पक्षाचे अध्यक्ष अनिल गोटे यांनी केले आहे. मनमाड ते इंदूर पर्यंतच्या रेल्वे मार्गापैकी मनमाड ते बिजासन घाट पर्यंतची लांबी १९२ किलोमीटर इतकी आहे, तर मध्य प्रदेशातील लांबी १५८ किलो मीटर असल्याने मध्य प्रदेश सरकारच्या वाटय़ाला ३२६ कोटी रुपये येतात. तथापि, हा निधी देण्याचे अनेक वेळा कबूल करून आणि रेल्वे मंत्रालयाला लेखी पत्र देवूनही आजवर एक पैसाही मध्य प्रदेश सरकारने दिलेला नाही. यामुळे केवळ मध्य प्रदेश सरकारच्याच औदासिन्यामुळे या रेल्वे मार्गाचे काम रखडले आहे. असे असातना रेल्वे मंत्रालय महाराष्ट्रावर सातत्याने अन्याय करीत असल्याचे भाजपचे ओमप्रकाश शर्मा म्हणातात. त्यांना या रेल्वे मार्गाची पूर्ण माहिती आहे का ? असा सवाल गोटे यांनी उपस्थित केला आहे. तसेच ‘रेल नही तो वोट नही’ हे आंदोलन लोकसभा निवडणुकीत प्रभावीपणे राबवावे लागेल असा इशारा गोटे यांनी दिला आहे.

नगरसेवक साबीर शेखला अमरावती पोलिसांकडे सोपविण्याचे आदेश
वार्ताहर / धुळे

बनावट कागदपत्रांआधारे पारपत्र (पासपोर्ट) तयार केल्याच्या संशयावरून धुळे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नगरसेवक साबीर शेखला अमरावती पोलिसांकडे सोपविण्याचे आदेश येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले. ऑक्टोबरमध्ये धुळे शहरात झालेल्या दंगलीतील शेख हा मुख्य संशयित असून सध्या त्याला नाशिक कारागृहात ठेवण्यात आले आहे. अमरावती येथून बनावट कागदपत्रांआधारे त्याने पारपत्र मिळविल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले. त्यामुळे शेखविरूद्ध शासनाची फसवणूक केल्याचा नवीन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. धुळे पोलिसांनी या गुन्ह्य़ाचा तपास अमरावती पोलिसांकडे वर्ग केल्याने शेखला ताब्यात घेणे, अमरावती पोलिसांसाठी क्रमप्राप्त झाले असून अमरावती पोलिसांची मागणी मान्य करीत न्यायालयाने शेखला अमरावती पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत.