Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३० जानेवारी २००९

विशेष

‘फायझर’चा ‘वाएथ’वर डोळा ?
सध्या अमेरिकन भांडवलशाही अर्थव्यवस्थेला घरघर लागली असताना अनेक कंपन्यांपुढे विलीनीकरण किंवा टेकओव्हर टार्गेट होणे असे दोनच पर्याय आहेत. वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांना तर दिवाळे काढण्याशिवाय अन्य पर्याय नाही. ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या शपथग्रहण समारंभानंतर त्यांनी आर्थिक प्रश्नांना प्राधान्य देण्याची घोषणा केली आहे. अर्थात ओबामा आल्यावर जादूची कांडी फिरविल्यासारखी एका झटक्यात काही बदल होतील अशी अपेक्षा ठेवणे चुकीचेच आहे. मात्र अमेरिकन अर्थव्यवस्थेत सुधारणा होईपर्यंत अनेक नामवंत कंपन्यांचे ‘बळी’ जाणार आहेत हे मात्र निश्चित. अर्थात हे ‘बळी’ कंपन्यांनी दिवाळे काढण्याबरोबरच विलीनीकरणाच्या माध्यमातून जातील. औषध उद्योगातील दोन मोठय़ा अमेरिकन कंपन्यांचे विलीनीकरण अशा प्रकारे होऊ घातले आहे. या कंपन्या आहेत- फायझर आणि वाएथ. या दोन कंपन्या एकत्र आल्यास सुमारे ७५ अब्ज डॉलरची उलाढाल असलेली एक नवीन महाकाय कंपनी स्थापन होणार आहे. तसे पाहता या दोन्ही अमेरिकन कंपन्या परस्परांच्या स्पर्धक आहेत.

‘पॅटर्न’ची उडाली शकले, तरी सत्ता सोडवेना!
पुणे महापालिकेच्या इतिहासातील ‘अभूतपूर्व’ म्हणावी अशी राजकीय खेळी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या मदतीने दोन दिवसांपूर्वी खेळली आणि या खेळीने महापालिकेतील ‘पुणे पॅटर्न’ची अक्षरश: छकले उडाली. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या तीन पक्षांनी एकत्र येऊन बनविलेल्या ‘पुणे पॅटर्न’कडे महापालिकेची सत्ता आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्तेची सारी पदेही त्यांनी परस्परांत ‘सामंजस्य करारा’ने वाटून घेतली आहेत.

अंतिम परीक्षा
अकबर-बिरबलाची माकडीणीची गोष्ट आठवते? पूर आला तेव्हा प्रथम पिल्लांनाही वाचवू पाहणारी माकडीण मृत्यू अटळ दिसताच त्याच पिल्लांचा शिडीसारखा उपयोग करून स्वतचा जीव वाचवू लागली. थोडक्यात काय तर मरणाच्या क्षणी सारे संस्कार, तत्त्व दुय्यम ठरतात आणि आपला बचाव, हाच अग्रक्रम ठरतो. माणसाच्या आंतरिक स्थितीचा कस मरणाच्या क्षणीच लागतो. १४ एप्रिल १९१२ रोजी सागरतळ गाठणाऱ्या टायटॅनिक जहाजाच्या दुर्घटनेतही हीच गोष्ट दिसून आली. या दुर्घटनेचा सामना करणाऱ्या प्रवाशांच्या अखेरच्या वर्तनाबाबत केलेल्या संशोधनात झुरिच विद्यापीठातील ब्रुनो फ्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाला जाणवले की शिष्टाचाराच्या प्रामाणिक पालनामुळे ब्रिटिश प्रवासी मोठय़ा प्रमाणात प्राणास मुकले तर जीव वाचवायला अग्रक्रम देणारे अमेरिकन मोठय़ा संख्येने बचावले! २,२२३ प्रवाशांसाठी केवळ २० जीवरक्षकनौका होत्या आणि त्या अटीतटीच्या प्रसंगीदेखील त्यात बसण्यासाठी ब्रिटिश रांगेत उभे होते तर अमेरिकन मात्र त्या नौकांवर अक्षरश: उडय़ा घेत होते! विशेष म्हणजे जहाज ब्रिटिश कंपनीचे आणि कर्मचारीही ब्रिटिश होते, याकडे फ्रे यांनी लक्ष वेधले आहे. अर्थात या संशोधनावर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ब्रिटिशांच्या भलामणीची खिल्ली उडवताना वॉशिंग्टनच्या एरिन या नेटसॅव्हीने म्हटले आहे की, ‘टायटॅनिकवरून निघालेल्या आणि ४० जणांची क्षमता असलेल्या पहिल्या जीवरक्षकनौकेत सर कॉस्मो, त्यांची पत्नी डफ गॉर्डन, त्यांचा सचिव असे फक्त १२ ‘मान्यवर’ होते. त्यामुळे ब्रिटिशांच्या शिष्टाचाराचे कौतुक करावे की त्यांच्यातील अहंमन्यतेची निंदा करावी? मग इतरांनी जीव वाचविण्यासाठी उडय़ा घेण्यात गैर काय?’
मानसशास्त्रज्ञांच्या मते साधारणपणे मृत्युच्या क्षणी किंवा मृत्युबाबत माणसाच्या पाच मानसिक अवस्था असतात. पहिली स्थिती असते नकार. आपल्याला मृत्यूचा स्वीकार करावा लागणार आहे, याचाच माणसाला धक्का बसतो. मी मरूच शकत नाही, असे त्याला तीव्रतेने वाटते. दुसरी स्थिती अस्वस्थता. माणूस अत्यंत अस्वस्थ होतो. माझ्यावर आताच हा प्रसंग का, हा प्रश्न त्याला भेडसावतो. तिसरी स्थिती असते सौदेबाजी. लहान मुलाप्रमाणे माणूस देवाकडे वा नियतीकडे जीवदानासाठी हट्ट धरतो. चौथी स्थिती असते निराशा. मृत्यूची अटळता जाणवल्यावर माणसाचं मन निराशेनं भरून जातं. अखेर पाचवी स्थिती असते स्वीकार. तो मृत्यूचा स्वीकार करतो. ही प्रत्येक स्थिती कमी-जास्त काळ टिकते. टायटॅनिकसारख्या अनपेक्षित दुर्घटनेतही या पाचही स्थिती प्रत्येकाच्या मनात उमटल्या असतीलच. पण आपल्यावरील संस्कारानुरूप त्या संकटाचा आणि अखेर मृत्यूचा स्वीकार करण्याच्या कठीण परीक्षेत ब्रिटिश उत्तीर्ण झाले, असा या संशोधकांचा दावा दिसतो. मृत्युच्या क्षणी माणूस काय बोलतो, कसा वागतो यातून त्याचं खरं रूप अगदी झडझडून बाहेर पडते. ‘द लास्ट वर्डस् ऑफ सेंट्स अँड सिनर्स’ या पुस्तकात सातशेहून अधिक कवि, तत्त्वज्ञ, नेते, क्रांतिकारकांनी मृत्युशय्येवर काढलेले अखेरचे उद्गार संकलित केले आहेत. त्यात काहींच्या मनातली वैफल्य भडभडून बाहेर पडते तर काहींच्या अंतरंगात दरवळणाऱ्या शांतीचा सुवास आपल्यासारख्या घडीभरच्या प्रवाशांनाही दिलासा देतो!
उमेश करंदीकर
umeshkaran9@gmail.com