Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘त्यांना पुन्हा विनंती करू; पण ‘बजेट’ कोणासाठी थांबणार नाही’
पुणे, २९ जानेवारी/प्रतिनिधी

 

अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली असून शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांना या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी आम्ही पुन्हा विनंती करू, असे जाहीर करतानाच अंदाजपत्रक कोणासाठी थांबणार नाही, असेही सभागृहनेते अनिल भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
स्थायी समितीच्या सर्व सोळा सदस्यांनी शहर विकासाच्या कामासाठी एकत्र येऊन चांगले अंदाजपत्रक तयार करावे असा आमचा संकल्प आहे. त्या दृष्टीने कोणीही प्रतिष्ठेचा मुद्दा न करता आणि जेणेकरून ‘पुणे पॅटर्न’ तुटेल अशा पद्धतीने हा विषय राज्य पातळीवर न नेता कोणी काही कृती करू नये, असे भोसले म्हणाले.
सर्वानी मिळून अंदाजपत्रक तयार करावे, असाच आमचा विचार आहे. त्यासाठी सेना व भाजपच्या सदस्यांना बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मी पुन्हा विनंती करणार आहे, असे सांगतानाच ते आले नाहीत, तरी अंदाजपत्रकाची प्रक्रिया थांबणार नाही आणि या प्रक्रियेत सहभागी न झाल्याबद्दल पुणेकर त्यांनाच दोष देतील, असाही दावा भोसले यांनी केला.
अध्यक्ष श्याम देशपांडे यांनाही मी विनंती करणार आहे आणि ते पुढील बैठकांना येतील, असा विश्वास मला आहे, असेही ते म्हणाले.