Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

स्थायी समितीच्या बैठकीवर युतीचा बहिष्कार

 

स्थायी समितीचे अध्यक्ष श्याम देशपांडे यांचे अधिकार काढून घेण्याच्या या विषयाला आता वेगवेगळी राजकीय वळणे मिळत असून सर्वाधिकार प्राप्त झालेल्या अनिल भोसले यांनी बोलाविलेल्या स्थायी समितीच्या बैठकीवर आज युतीने बहिष्कार घातला. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसे या तीन पक्षांचे अकरा सदस्य उपस्थित होते. तर दुसरीकडे अधिकार परत न मिळाल्यास ‘पुणे पॅटर्न’ तोडा असा दबाव शिवसेनेच्या नगरसेवकांनी पक्षनेतृत्वावर आणला आहे. भाजपचीही साथ शिवसेनेला मिळाली असून बैठकीवरील बहिष्काराच्या निर्णयात तो पक्षही आज सहभागी झाला.

‘अध्यक्षांचे अधिकार सन्मानाने परत घ्या, अन्यथा ‘पॅटर्न’ तोडा’
पुणे, २९ जानेवारी/प्रतिनिधी
स्थायी समितीचे अध्यक्ष श्याम देशपांडे यांचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय निषेधार्ह असून हे अधिकार त्यांना सन्मानाने परत मिळाले पाहिजेत आणि ते जर मिळणार नसतील, तर ‘पुणे पॅटर्न’ तोडा, ‘पॅटर्न’ मधून बाहेर पडा, अशी जोरदार मागणी आज शिवसेनेच्या बहुसंख्य नगरसेवकांनी पक्षाच्या बैठकीत केली.
महापालिकेतील ताज्या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेच्या नगरसेवकांची बैठक आज प्रथमच बोलावण्यात आली होती.
शहरप्रमुख नाना वाडेकर यांनी बोलावलेल्या या बैठकीला उपमहापौर चंद्रकांत मोकाटे, स्थायी समितीचे अध्यक्ष देशपांडे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेत काँग्रेसला जवळ करत देशपांडे यांचे अधिकार काढून घेण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा असून हा निर्णय मागे घेतला गेला पाहिजे. देशपांडे यांचे अधिकार त्यांना सन्मानाने परत मिळणार नसतील, तर ‘पुणे पॅटर्न’ तोडा अशी मागणी यावेळी बहुसंख्य नगरसेवकांनी केली. या घडामोडींबद्दल वाडेकर म्हणाले की, सत्तेचा आम्हाला लोभ नाही. आम्ही प्रखर विरोधी पक्ष म्हणूनही महापालिकेत कामगिरी करू. त्याच संस्कारात आम्ही वाढलो आहोत. सभागृहनेते बोलावत असलेली बैठक बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्या बैठकीला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.