Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

बैठकीला उपस्थित राहण्याच्या निर्णयावर अखेर भाजपची माघार
पुणे, २९ जानेवारी/प्रतिनिधी

 

अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सभागृह नेत्यांनी बोलावलेल्या बैठकीत उपस्थित राहण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाला अखेर काही तासातच मागे घ्यावा लागला आणि भाजपचे स्थायी समितीमधील तिन्ही सदस्य या वादग्रस्त बैठकीला आज अनुपस्थित राहिले.
श्याम देशपांडे यांचे अधिकार काढून घेण्याच्या प्रकारानंतर सभागृहनेते अनिल भोसले यांनी अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी आज स्थायी समितीची बैठक बोलावली होती. या बैठकीवर आमचा बहिष्कार राहील, अशी भूमिका शिवसेनेने तातडीने जाहीर केली. तर भाजपने अंदाजपत्रकासारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा असल्याने आम्ही त्या बैठकीला उपस्थित राहू, अशी भूमिका घेतली. स्वाभाविकपणे या निर्णयावर पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि अखेर बैठकीला न जाण्याचा निर्णय बुधवारी रात्री उशिरा घेण्यात आला.
या विषयी भूमिका स्पष्ट करताना गटनेते प्रा. विकास मठकरी म्हणाले की, युतीतील एका घटक पक्षाच्या गटनेत्याचे अधिकार काढून घेण्याचा प्रकार दुर्दैवी तर आहेच, शिवाय तो कायद्याला व महपालिकेच्या साठ वर्षांच्या परंपरेलाही धरून नाही. आमची युती गेली पंचवीस वर्षे आहे आणि युतीचा धर्म आम्ही नेहमीच पाळत आलो आहोत. त्यामुळे बैठकीला जाऊ नये, असा निर्णय आम्ही घेतला.