Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी गतिरोधकांची पुन्हा बांधणी करणार
सुनील कडूसकर, पुणे, २९ जानेवारी

 

प्राणघातक अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शहरातील विविध रस्त्यांवर पुन्हा नव्याने गतिरोधकांची उभारणी करण्यात येणार आहे. तीन वर्षांपूर्वी न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत बहुतांश गतिरोधक काढून टाकण्यात आले होते; परंतु सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने त्यांची गरज असल्याचे पोलिसांच्या पाहणीत स्पष्ट झाल्याने आता इंडियन रोड काँग्रेसच्या निकषांनुसार त्यांची बांधणी केली जाणार आहे.
सुरक्षित वाहतुकीसाठी शहरातील काही चौकांमध्येही रस्ते अभियांत्रिकीच्या दृष्टिकोनातून विविध सुधारणा वाहतूक पोलिसांनी सुचविल्या असून, त्यांचीही अंमलबजावणी येत्या काही दिवसांतच केली जाणार आहे.

गेल्या वर्षी शहरात साडेचारशे प्राणघातक अपघात झाले. त्यातील निम्म्याहून अधिक अपघात ठराविक अशा ५१ स्पॉटवर (ठिकाणी) झाले. वाहतूक शाखेचे उपायुक्त मनोज पाटील यांनी रस्ते अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने नुकतेच या ‘अपघातप्रवण जागांचे’ सर्वेक्षण करवून घेतले. या जागांवरील गतिरोधक काढून टाकल्यानेच त्या जागा अपघातप्रवण झाल्याचे त्यात निदर्शनास आले. त्याचबरोबर इतरही त्रुटी आढळून आल्या.
तज्ज्ञांच्या पाहणीचे हे निष्कर्ष व त्यांनी सुचविलेल्या उपाययोजनांवर मनोज पाटील व महानगरपालिकेचे वाहतूक नियोजक श्रीनिवास बोनाला यांनी सविस्तर चर्चा केली. त्यानंतरच शहरात पहिल्या टप्प्यात ५१ ठिकाणी नव्याने गतिरोधकांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी ‘अपघात झाला, उभारा गतिरोधक’ या न्यायाने किंवा नगरसेवक वा अधिकाऱ्यांच्या मनमानीनुसार ते सांगतील तेथे जागोजागी अशास्त्रीय पद्धतीने गतिरोधकांची उभारणी करण्यात आली होती. परिणामी अपघात कमी करण्याऐवजी वाढविण्यासच ते कारणीभूत ठरत होते. अखेर न्यायालयाला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला व त्यानुसार २००५-०६ मध्ये इंडियन रोड काँग्रेसच्या निकषांनुसार नसलेले हे आठशेहून अधिक गतिरोधक पालिकेला काढून टाकावे लागले होते. त्यानंतर मात्र नव्याने गतिरोधक उभारण्याचे धाडस करण्यास कोणी धजावले नाही.

गतिरोधक उभारूच नका, असा न्यायालयाचा आदेश नसून ते इंडियन रोड काँग्रेसच्या निकषांनुसार हवेत, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नव्याने उभारण्यात येणारे हे गतिरोधक या निकषांनुसारच उभारण्यात येतील, असे मनोज पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. या निकषांमध्ये गतिरोधकांच्या माथ्याची उंची, त्यांच्या उताराचा कोन, त्यांची लांबी इत्यादींचा समावेश असून, ते बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे काळ्या-पांढऱ्या रंगाने रंगविणे आवश्यक आहे, तसेच गतिरोधक असलेल्या जागेबरोबरच शंभर फूट अलीकडे व पलीकडे त्याची पूर्वकल्पना देणारे फलकही लावणे गरजेचे आहे. नव्याने उभारण्यात येणारे हे गतिरोधक या सर्व निकषांची पूर्तता करणारे असणार आहेत. प्रामुख्याने उपरस्त्यांवर हे गतिरोधक उभारण्यात येणार असल्याने मुख्य रस्त्यांच्या वाहतुकीच्या वेगावरही त्याचा विपरित परिणाम होणार नाही. मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा वेग कमी करण्यासाठी आवश्यक तेथेच विशिष्ट प्रकारच्या ‘रंबल ट्रीप्स’ लावण्यात येतील. त्यामुळे वेगात आलेली गाडी त्यावरून उडणार नाही, तर त्यावरून जाताना होणाऱ्या विशिष्ट आवाजामुळे वेग कमी करण्याची अप्रत्यक्ष सूचनाच चालकाला मिळू शकेल, असेही पाटील यांनी सांगितले.
शहरातील प्राणघातक अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने गतिरोधक उभारण्याच्या या निर्णयाचे सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी स्वागत केले आहे. तथापि, त्यांची देखभाल व रंगरंगोटी नियमितपणे होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.