Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

वृद्धांना मिळणार आता उपचार खर्चात सवलत सह्य़ाद्री रुग्णालयाची नवी योजना
पुणे, २९ जानेवारी / प्रतिनिधी

 

वृद्धापकाळातील आजारांवर उपचार करणे खर्चिक असल्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी बाह्य़रुग्ण विभागातील उपचार आणि औषध खरेदीवर सवलत देणारी योजना सह्य़ाद्री रुग्णालयाने फेब्रुवारीपासून सुरू केली आहे. ज्येष्ठांच्या खिशाला यामुळे जादा भरुदड आता बसणार नाही. शहरातील सह्य़ाद्रीच्या विविध रुग्णालयांमधून १८९५ रुपये भरून योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत नावे नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उतारवयात मधुमेह, सांधेदुखी, हृदयरोगासारखे आजार चांगलेच बळावतात. त्यामुळे आठवडय़ाला रुग्णालयात जाऊन तपासणी, तज्ज्ञांचा सल्ला किंवा सोनोग्राफी, एक्स- रे, सीटी स्कॅन, एमआरआयसारख्या तपासण्या करणे भाग पडते. तपासणी आली की खिशाला कात्री लावावी लागते. ज्येष्ठांसह कुटुंबीयांनाही हा आजार चांगलाच महाग पडतो. यासंदर्भात सह्य़ाद्री रुग्णालय समूहाचे प्रमुख विश्वस्त आणि कार्यकारी संचालक डॉ. चारुदत्त आपटे यांनी ‘लोकसत्ता’ला माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘ ज्येष्ठ नागरिकांना वारंवार विविध कारणांसाठी रुग्णालयात यावे लागते. क ोणतीही व्यक्ती रुग्णालयात स्वत:हून येत नसते. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाच्या खिशाला झळ बसू नये, यासाठी ५० ते ६९ वयाच्या दरम्यान रुग्णांना एक लाख वीस हजार रुपयांपर्यंत तर सत्तरीच्या पुढील वृद्धांसाठी साठ हजार रुपयांपर्यंतचे अंतरविभागातील उपचार मोफत देण्यात येणार आहेत. मात्र अवयवरोपण किंवा सांधेरोपण शस्त्रक्रिया, फिजिअंोथेरपी, पुनर्वसन, एड्स, मद्यपानामुळे झालेले आजार अशांवरील शस्त्रक्रियेचा खर्च मात्र संबंधित रुग्णास सोसावा लागेल. हृदयरोग, मधुमेह, अस्थिरोग, न्यूरोसर्जरीसह अन्य आजारांवरील उपचारांसाठी ही सवलत मिळेल. या रुग्णांवर मात्र जनरल वॉर्डमध्येच उपचार करण्यात येतील. मात्र स्वतंत्र खोलीसाठी त्याचे शुल्क द्यावे लागेल. तसेच पन्नाशीच्या पुढील सर्व ज्येष्ठांना बाह्य़रुग्ण विभागातील उपचार, सोनोग्राफी, एक्स- रे, सीटी स्कॅन, एमआरआयच्या तपासणी, सल्ला यांच्यावर ४० टक्के तर औषधखरेदीवर दहा टक्के सवलत देण्याची योजना आहे. या सेवा चोवीस तास देण्यात येतील. ’’
सह्य़ाद्री रुग्णालयाच्या कर्वेरोड, बिबवेवाडी, क ोथरुड, शंकरशेठ रोड, सूर्या हाॅिस्पटल (कसबा पेठ), हडपसर आणि बोपोडी येथे रुग्णालयांच्या शाखांमध्ये ही सुविधा मिळेल. त्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत १८९५ रुपये भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. या योजनेत सहभागी झालेल्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल होताना त्यांना देण्यात येणारे ओळखपत्र दाखवावे. म्हणजे त्यानुसार उपचारांत सवलत देण्यात येईल. यापूर्वीच्या काही योजनांमध्ये सामील असलेल्या रुग्णांनी पुन्हा योजनेत सहभाग घेतल्यास त्यांच्यासाठी ३१ मार्चपासून तर नव्याने सहभाग घेणाऱ्या रुग्णांना एक फेब्रुवारीपासून योजनेचा लाभ मिळेल, असे विश्वस्त प्रकाश तुळपुळे यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी ०२०-६५००९२४१/२/३/ या दूरध्वनीवर सकाळी सात ते नऊ यावेळेत रुग्णालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.