Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

पवित्र मिस्साने ‘येशू उत्सवा’ची सांगता
पुणे, २९ जानेवारी/प्रतिनिधी

 

पुणे धर्मप्रांताचे महागुरू बिशप व्हेलेरियन डिझोजा यांच्या नेतृत्वाखाली गुलाटी सभागृहात दि. २४ व २५ जानेवारी रोजी ‘येशू उत्सव’ साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास दोनशेहून अधिक प्रतिनिधी धर्मगुरू, सिस्टर्स व प्रापंचिकांचा सहभाग होता. ‘तुमचा प्रकाश लोकांसमोर पसरू द्या.’ हा विषय केंद्रस्थानी ठेवून कार्यक्रमासाठी तीन व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.
उत्सवाचा मूळ उद्देश उपस्थितांना समजून सांगताना डिसोजा म्हणाले की, आपल्या जीवनातील व या जगातील अंधाराचे अस्तित्व नम्रपणे मान्य करून आपण त्या जागी प्रकाश पसरण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. तर एक दिवसीय हा अंधकार दूर होईल.
कार्यक्रमाच्या पहिल्या व्याख्यानामध्ये वसई धर्मप्रांताचे फा. रॉबर्ट डिसोजा यांनी बायबलमधील विविध उदाहरणांच्या आधारे देव सर्व प्रकाशाचा उद्गाता असून प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश कसा आहे. हे सांगितले तसेच ख्रिस्ती व्यक्तीने सदैव प्रकाशाची वाट कशी चालावी त्याचे विवेचन केले.
दुसऱ्या व्याख्यानात ‘तुम्ही जगाचा प्रकाश आहात’ हा विचार फुलविताना मुंबई सरधर्मप्रांताचे कॉन्रॅड सल्ढाना यांनी सद्यस्थितीत आपल्या समोर कोणकोणती आव्हाने आहेत व त्यांना सामोरे जाण्यासाठी येशूची प्रेम, क्षमा, शांतीची शिकवण कशी आवश्यक आहे. ते पटवून सांगितले.
कार्यक्रमाचे संयोजन संत पॅट्रिक कॅथ्रिडलचे प्रमुख धर्मगुरु फा. मॅल्कम सिक्वेरा यांच्या मार्गदर्शनाखाली आठ वेगवेगळ्या समित्यांनी केले. तिन्ही अधिवेशनासाठी फादर अॅलेक्स क्वॉड्रोस, फादर विल्यम फर्नाडिस आणि फादर फर्नाडो डिकॉस्टा यांनी मॉडरेटर म्हणून काम पाहिले.
कार्यक्रमास सिंधुदुर्ग धर्मप्रांताचे फा. सॅबी डिमेलो व अमरावती धर्मप्रांताचे महागुरू बिशप लुईस डॅनिएल विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फादर सॅबी मोनी व कु. शरल पिंटो यांनी केले. शेवटी संत पॅट्रिक कॅथड्रिलच्या भव्य आवारात पवित्र मिस्साने येशू उत्सवाची सांगता झाली.