Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

बेकायदा वास्तव्याबद्दल इराणी विद्यार्थी हद्दपार
पुणे, २९ जानेवारी / प्रतिनिधी

 

कोंढवा येथे बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या इराणी विद्यार्थ्यांची पोलिसांनी देशातून हकालपट्टी केली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पोलिसांनी केलेल्या तपासणी मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली.
शाहराम हुसैन डेलअफकार (वय २१, रा. तिसरा मजला, माणिकचंद मलाबार हिल, लुल्लानगर, कोंढवा) असे देशातून हकलण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. विनापरवाना बेकायदेशीर वास्तव्य करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर ही कारवाई करण्यात आली. शहर पोलिसांच्या विशेष शाखेने परदेशी नागरिक नोंदणी विभागाच्या सहकार्याने मंगळवारी शाहराम याला इराणला पाठवून दिले.
टुरिस्ट अथवा विद्यार्थी व्हिसावर शहरात आलेले परदेशी नागरिक त्यांच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतरही वास्तव्य करत असल्याच्या घटना वेळोवेळी उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे परदेशी नागरिकांना भाडे तत्त्वावर देताना त्यांच्या पारपत्राची व व्हिसाच्या मुदतीची खातरजमा पुणेकर नागरिकांनी करावी, असे आवाहन विशेष शाखेने केले आहे.
त्याचबरोबर, या परदेशी नागरिकांविषयी स्थानिक अथवा विशेष शाखेच्या पोलिसांना पुणेकर नागरिकांनी तत्काळ कळवावे, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिसांना न कळविता परदेशी नागरिकांना भाडेकरू म्हणून ठेवणाऱ्या जागामालकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला.