Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

आयडिया सेल्युलरविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश
पुणे, २९ जानेवारी / प्रतिनिधी

 

ग्राहकाचे सीमकार्ड परत न करणाऱ्या आयडिया सेल्युलर कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने डेक्कन पोलिसांना दिले. त्याचबरोबर या प्रकरणी चौकशी करून आपला अहवाल तीस दिवसांत सादर करण्याचा आदेशही न्यायालयाने या वेळी डेक्कन पोलिसांना दिले.
आतिष वाघेला (रा. मुंढवा) यांनी या प्रकरणी आयडिया कंपनीच्या नऊ अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात खासगी गुन्हा दाखल केला होता. वाघेला यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, आयडिया कंपनीचे सीमकार्ड तीस ऑक्टोबर २००८ रोजी त्यांनी खरेदी केले होते. विशिष्ट व खास क्रमांक पाहिजे असल्याने त्यांनी या सीमकार्डसाठी कंपनीला पाच हजार रुपये दिले. त्यानंतर हे सीमकार्ड चालू न झाल्याने कंपनीकडून दुसरे सीमकार्ड देण्यात आले. मात्र, हेही सीमकार्ड चार नोव्हेंबर रोजी बंद करण्यात आले. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यावरही कंपनीने सीमकार्ड परत करण्यास नकार दिला.
‘कंपनीकडे वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात न आल्याने न्यायालयाकडे धाव घेण्याची वेळ माझ्यावर आली. न्यायालयाने यासंदर्भात आयडिया कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश डेक्कन पोलिसांना दिले आहेत,’ असे वाघेला यांनी सांगितले.