Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३० जानेवारी २००९

‘त्यांना पुन्हा विनंती करू; पण ‘बजेट’ कोणासाठी थांबणार नाही’
पुणे, २९ जानेवारी/प्रतिनिधी

अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली असून शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांना या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी आम्ही पुन्हा विनंती करू, असे जाहीर करतानाच अंदाजपत्रक कोणासाठी थांबणार नाही, असेही सभागृहनेते अनिल भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

स्थायी समितीच्या बैठकीवर युतीचा बहिष्कार
स्थायी समितीचे अध्यक्ष श्याम देशपांडे यांचे अधिकार काढून घेण्याच्या या विषयाला आता वेगवेगळी राजकीय वळणे मिळत असून सर्वाधिकार प्राप्त झालेल्या अनिल भोसले यांनी बोलाविलेल्या स्थायी समितीच्या बैठकीवर आज युतीने बहिष्कार घातला. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसे या तीन पक्षांचे अकरा सदस्य उपस्थित होते. तर दुसरीकडे अधिकार परत न मिळाल्यास ‘पुणे पॅटर्न’ तोडा असा दबाव शिवसेनेच्या नगरसेवकांनी पक्षनेतृत्वावर आणला आहे. भाजपचीही साथ शिवसेनेला मिळाली असून बैठकीवरील बहिष्काराच्या निर्णयात तो पक्षही आज सहभागी झाला.

बैठकीला उपस्थित राहण्याच्या निर्णयावर अखेर भाजपची माघार
पुणे, २९ जानेवारी/प्रतिनिधी

अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सभागृह नेत्यांनी बोलावलेल्या बैठकीत उपस्थित राहण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाला अखेर काही तासातच मागे घ्यावा लागला आणि भाजपचे स्थायी समितीमधील तिन्ही सदस्य या वादग्रस्त बैठकीला आज अनुपस्थित राहिले. श्याम देशपांडे यांचे अधिकार काढून घेण्याच्या प्रकारानंतर सभागृहनेते अनिल भोसले यांनी अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी आज स्थायी समितीची बैठक बोलावली होती.

अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी गतिरोधकांची पुन्हा बांधणी करणार
सुनील कडूसकर, पुणे, २९ जानेवारी

प्राणघातक अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शहरातील विविध रस्त्यांवर पुन्हा नव्याने गतिरोधकांची उभारणी करण्यात येणार आहे. तीन वर्षांपूर्वी न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत बहुतांश गतिरोधक काढून टाकण्यात आले होते; परंतु सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने त्यांची गरज असल्याचे पोलिसांच्या पाहणीत स्पष्ट झाल्याने आता इंडियन रोड काँग्रेसच्या निकषांनुसार त्यांची बांधणी केली जाणार आहे.
सुरक्षित वाहतुकीसाठी शहरातील काही चौकांमध्येही रस्ते अभियांत्रिकीच्या दृष्टिकोनातून विविध सुधारणा वाहतूक पोलिसांनी सुचविल्या असून, त्यांचीही अंमलबजावणी येत्या काही दिवसांतच केली जाणार आहे.

‘कामगारांच्या गुणांना वाव देण्यासाठी मर्दानी खेळांचे आयोजन करावे’
पुणे, २९ जानेवारी/क्रीडा प्रतिनिधी

कामगारांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी क्रिकेट स्पर्धांबरोबरच कबड्डी आणि खो-खो या मर्दानी खेळांचे आयोजन करण्याचे आवाहन आमदार उल्हास पवार यांनी केले. कात्रज येथील यंत्रनिर्माण चौकात आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षीस देण्यात आले. इंडस्ट्रियल असोसिएशन व यंत्रनिर्माण नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित केला होता. या वेळी ते बोलत होते. कात्रज परिसरातील खेळाडूंसाठी शासकीय योजनेतून लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

माहिती आयुकतांनी दबावाखाली काम करू नये- अण्णा हजारे
पुणे, २९ जानेवारी/प्रतिनिधी

माहिती आयुक्त हे पद महत्त्वाचे असून, त्या पदावरील व्यक्तींनी कोणाच्याही दबावाखाली काम करता नये. मात्र आज माहिती आयुक्तांमध्येच भांडणे लागली आहेत. या उच्चपदस्थ व्यक्ती भांडत राहिल्या तर समाजाने नेमका काय आदर्श घ्यायचा, असा सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. तसेच येत्या ३ फेब्रुवारी रोजी माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी, वाळूचे धोरण, दारूबंदी अशा विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांशी बैठक होणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

रुग्णालय सुरू करण्याच्या मागणीसाठी उपोषण
पुणे, २९ जानेवारी/प्रतिनिधी

येरवडा येथील राजीव गांधी हे रुग्णालय लवकरात लवकर सुरू करावे, या मागणीसाठी येत्या १५ फेब्रुवारी रोजी रुग्णालयासमोर धरणे व एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा बहुजन समाजवादी पक्षाचे हुलगेश चलवादी यांनी दिला आहे. रुग्णालय उभारून दोन वर्षे झाली तरी महापालिका हे रुग्णालय सुरू करू शकलेले नाही. त्यामुळे येरवडा भागातील गरिबांचे हाल होत आहेत. १ ते १५ फेब्रुवारी दरम्यान एक लाख नागरिकांच्या सह्य़ांची मोहीम राबविण्यात येणार आहे, असे चलवादी यांनी म्हटले आहे.

मंगेशकर रुग्णालयात शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
पुणे, २९ जानेवारी / प्रतिनिधी

आर्थिकदृष्टय़ा दुर्बल आणि गरजू रुग्णांसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वतीने येत्या एक ते २८ फेब्रुवारी दरम्यान शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांतर्गत अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याध, टॉन्सिल, कान, नाक, घसा तसेच मूतखडासारख्या आजारांवर शस्त्रक्रिया करण्यात येतील. गरजू रुग्णांनी रुग्णालयात ४०१५१०११/१५ या दूरध्वनीवर संपर्क करून आपली नावे नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘ज्योतिपुंज’चे रविवारी प्रकाशन
पुणे, २९ जानेवारी/प्रतिनिधी

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या ज्योतिपुंज या गुजराथी भाषेतील पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांच्या हस्ते १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता गणेश कला क्रीडामंच येथे होणार आहे. अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर यांनी आज ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. पुस्तकाचा मराठी अनुवाद दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार रवींद्र दाणी यांनी केला आहे. प्रकाशन समारंभास नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस गोपीनाथ मुंडे उपस्थित राहणार असून, डॉ. श्रीपती शास्त्री समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. मोदी यांच्या एकूण तेरा प्रकाशित पुस्तकांपैकी मराठीत अनुवादीत झालेले हे पहिलेच पुस्तक आहे.

नृत्य-नाटय़, गायनानेआळेकरसरांना निरोप
पुणे, २९ जानेवारी/खास प्रतिनिधी

नृत्य-नाटय़ सादरीकरण, शास्त्रीय गायन अशा आविष्कारांच्या माध्यमातून ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी विद्यमान संचालक सतीश आळेकर यांना अनौपचारिक समारंभाद्वारे निरोप दिला.
आळेकर हे येत्या शनिवारी निवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने केंद्रामध्ये आज हा आविष्कार आयोजित करण्यात आला होता. तत्कालीन कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांनी १९९६ साली ज्येष्ठ नाटककार आळेकर यांची केंद्राच्या संचालकपदी नियुक्ती केली. त्यानंतर आळेकरसरांच्या कारकीर्दीत केंद्राने भरारी घेतली. गुरुकुल शिक्षणपद्धतीच्या माध्यमातून दिग्गज कलावंतांचा विद्यार्थ्यांना मिळालेला सहवास, पंडित भीमसेन जोशी अध्यासन, रतन टाटा ट्रस्टची ८२ लाख रुपयांची शिष्यवृत्ती, रतन थिय्याम यांच्यापासून देशभरातील दिग्गज कलावंतांच्या संस्थांसमवेत करण्यात आलेले सहकार्य करार वैशिष्टय़पूर्ण ठरले. गाब्रीचा पाऊस-टिंग्या आदी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या कलाकृतींच्या माध्यमातून केंद्राचे माजी विद्यार्थी लौकिक प्राप्त करीत आहेत. आळेकर यांच्या निवृत्तीनंतर डॉ. शुभांगी बहुलीकर या ललित कला केंद्राच्या संचालिका म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत.

‘माझे पुस्तक’द्वारे आदिवासी विद्यार्थी शिकले भाषा-गणित
पुणे, २९ जानेवारी/खास प्रतिनिधी

विद्यार्थ्यांची विचारप्रक्रिया विकसित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘माझे पुस्तक’ या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून आदिवासी पाडय़ांमधील विद्यार्थ्यांनी भाषा-गणिताचे धडे यशस्वीपणे घेतले आहेत. या अभिनव उपक्रमाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी उद्या, शुक्रवारी पुण्यात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. क्वेन्च एज्युकेशन सोल्युशन्स या संस्थेतर्फे पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी ‘माझे पुस्तक’ या साहित्याची निर्मिती करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात भाषा व गणित या विषयांची पहिली-दुसरीसाठी पुस्तके तयार करण्यात आली आहेत. राज्यातील शहरी, ग्रामीण, तसेच आदिवासी भागांतील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या ५१ शाळांमधील विद्यार्थी या शैक्षणिक साहित्याचा लाभ घेत आहेत. हे पुस्तक वापरणाऱ्या विद्यार्थ्यांची आकलनक्षमता आणि गुणांमध्ये वाढ झाली आहे. मराठी मातृभाषा नसलेल्या विद्यार्थ्यांनाही मराठीचे शिकणे शक्य आहे. याबाबत मुख्याध्यापक व शिक्षकांना माहिती करून देण्यासाठी ही कार्यशाळा असून, संस्थेचे प्रमुख नीलेश निमकर, वैदेही देशपांडे, गायत्री सेवक आदी या वेळी माहिती देतील. ना. सी. फडके सभागृहात दुपारी तीन वाजता कार्यशाळा होईल. अभिनेते अतुल कुलकर्णी हेही उपस्थित राहणार आहेत.

धर्माबाबतचे अज्ञान हेच दहशतवादामागचे कारण - सत्यपालसिंह
पुणे, २९ जानेवारी/प्रतिनिधी

जगामध्ये सध्या फोफावत चाललेली गुन्हेगारी व वाढता दहशतवाद यांचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केल्यास, धर्माबद्दलचे अज्ञान हेच त्याचे कारण आहे. देशामध्ये स्वयंघोषित धर्ममार्तंडांची संख्या भरपूर आहे. परंतु त्यांना ईश्वर आणि धर्म यातला फरक अद्याप कळलेलाच नाही, असे मत पोलीस आयुक्त सत्यपालसिंह यांनी व्यक्त केले. उद्योगपती शंकरदत्त महाशब्दे यांनी अनुवादित केलेल्या ‘धर्मरथ’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी डॉ. सिंह बोलत होते. डॉ. भटकर म्हणाले की, भारतीय संस्कृतीमध्ये न्याय, समता, बंधुता ही मूल्ये सामावलेली आहेत. श्रीराम हा शब्दातून भारतीय संस्कृतीचीच प्रचिती येते. धर्मरथ या पुस्तकातून हिंदू तत्त्वज्ञानाप्रमाणेच दर्शन घडते. तीर्थक्षेत्रांना ज्ञानक्षेत्राचा दर्जा मिळावा तसेच पुण्यामध्ये ज्ञानविद्यापीठ व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. यावेळी शंकर सूर्यवंशी, प्रमोद चमकिरे यांची भाषणे झाली. घनश्याम सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

शेटे यांची निवड
पुणे, २९ जानेवारी / प्रतिनिधी

श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्रीकांत शेटे तर, उपाध्यक्षपदी सूर्यकुमार निरगुडकर यांची निवड झाली आहे. कार्यकारिणी - भरत राठोड (सचिव), अनिल पानसे (खजिनदार), रामकृष्ण ढेरे (सहखजिनदार), निलेश वकील (सहसचिव), प्रदीप चौधरी (कार्याध्यक्ष), अनिल दिवाणजी (स्वागताध्यक्षा), प्रशांत तावरे (हिशोब तपासणीस)

रासकर यांचे निधन
पुणे, २९ जानेवारी/प्रतिनिधी

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां द्रौपदाबाई रासकर (वय ७५) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुली, तीन मुले असा परिवार आहे. माळी समाजातील ज्येष्ठ समाजसेवक सोपान रासकर यांच्या त्या पत्नी होत.