Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

पहिल्या विश्व मराठी संमेलनासाठी मुख्यमंत्र्यांकडून २५ लाख
संदीप देशपांडे
नागपूर, २९ जानेवारी

 

अमेरिकेतील सॅन होजे येथे होणाऱ्या पहिल्या बहुचर्चित विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी आयोजकांना महाराष्ट्र सरकारकडून २५ लाख रुपये मिळणार आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे यंदा इतिहासात पहिल्यांदाच दोन संमेलने घेतली जाणार आहेत. पहिले विश्व मराठी संमेलन फेब्रुवारीमध्ये सॅन होजे येथे तर, ८२ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन मार्चमध्ये महाबळेश्वरला होणार आहे. भारतात दरवर्षी होणाऱ्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी स्वागत समितीला सरकारकडून २५ लाख रुपये मिळतात. मराठीच्या या सर्वात मोठय़ा उत्सवाला प्रोत्साहन म्हणून सरकार न चुकता २५ लाख रुपये देते. यंदा मात्र अ.भा. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी प्रखर विरोधाला तोंड देत भारतात आणि भारताबाहेरही संमेलन घेण्याचे धाडसी पाऊल टाकले. पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचा बार उडायला आता केवळ पंधरवडा उरला असून व्हिसाच्या चाळणीतून बाहेर पडलेले भारतातील जवळपास दोनशे प्रतिनिधी समुद्रापल्याडच्या पहिल्या अधिकृत मराठी संमेलनाच्या स्थळावर पाय ठेवण्याचा इतिहास रचणार आहेत.मध्यंतरी विश्व संमेलनाच्या वैधतेवरून महामंडळ आणि विरोधकांमध्ये झालेल्या वादावादीमुळे भारतातले संमेलन होईल किंवा नाही, असे वातावरण होते. त्यामुळे अ.भा. संमेलनाला सरकारकडून मिळणारे २५ लाख रुपये विश्व संमेलनात खर्च होतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. प्रत्यक्षात कौतिकरावांनी दोन्ही संमेलने घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अ.भा. संमेलनाला हा निधी मिळणार आहेच. त्याशिवाय विश्व संमेलनासाठीही सरकार अतिरिक्त २५ लाख रुपये देणार आहे. मुख्यमंत्री प्रत्यक्ष महामंडळाला पैसे देत नाहीत आणि महामंडळही मागत नाही. सरकार स्वागत मंडळाला हा निधी देते. त्यामुळे विश्व संमेलनाचा निधी एवढय़ातच बे-एरिया महाराष्ट्र मंडळाला देण्यात येणार आहे, असे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.शासन मराठीच्या कामासाठी मदत करत असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण, केवळ महामंडळाच्याच नव्हे तर अन्य कोणत्याही संस्थेच्या मराठी साहित्य संमेलनासाठीही सरकारने आर्थिक मदत केली पाहिजे, असे मत प्रगतिशील लेखक संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री जाणार नाहीत?
मराठीच्या कोणत्याही चांगल्या उपक्रमाला पाठबळ देणे हे आमचे धोरणच आहे. या संमेलनाच्या निमित्ताने मायमराठीचा झेंडा विश्वस्तरावर फडकणार आहे, ही आनंदाची बाब आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मी सांस्कृतिक खात्याचा मंत्री होतो. त्यावेळी बे-एरिया महाराष्ट्र मंडळ आणि स्वागत समितीचे संदीप देवकुळे यांनी भेट घेऊन संमेलनाचे निमंत्रणपत्र दिले होते. त्यावेळीच विलासरावांनी विश्व संमेलनासाठी २५ लाख रुपये देण्याचा शब्द दिला होता. तो शब्द आम्ही पाळणार आहोत. हा निधी मंजूरही करण्यात आला आहे पण, आता लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. त्यामुळे या संमेलनाला प्रत्यक्ष जाता येणार नाही पण, माझे प्रतिनिधी म्हणून सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील हे जाणार आहेत, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.