Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

सत्ताधाऱ्यांचे समर्थन मागे घेण्याचा आदिवासी संघर्ष समितीचा इशारा
नाशिक, २९ जानेवारी / प्रतिनिधी

 

राज्य तसेच केंद्रातील आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा सहभाग असून देखील त्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नसल्याच्या निषेधार्थ राज्य आदिवासी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या पक्षांना असलेले आपले समर्थन काढून घेण्याचा इशारा दिला. संपूर्ण कर्जमाफीसह विविध प्रलंबित प्रश्नांसाठी आदिवासी विकास विभागाच्या येथील मुख्यालयासमोर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या संघर्ष समितीतर्फे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाच्या पाश्र्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे.
स्थानिक पातळीपासून केंद्रीय स्तरापर्यंत सर्वत्र काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता असतानाही आदिवासींचे प्रश्न सुटू शकत नसल्याबद्दल संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री अशा सर्व पातळीवर यासंदर्भात आजवर अर्ज-विनंत्या करण्यात आल्या. मध्यंतरी आदिवासी विकास विभागाच्या मुख्यालयावर या संदर्भात मोर्चाही काढण्यात आला, परंतु अद्याप प्रलंबित ११ मागण्यांपैकी एकाही मागणीची तड लागू शकली नाही. परिणामी, गेल्या तीन दिवसांपासून येथील मुख्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले असले तरी त्याची योग्य ती दखल घेतली गेलेली नाही. उलट संबंधितांनी त्याकडे पाठच फिरविल्याचा समितीचा आरोप आहे. याबाबत आदिवासी विकास मंत्र्यांना वेळोवेळी कल्पना देण्यात येऊनही प्रश्न सुटत नसल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आता समितीने उभय काँग्रेसला असलेले आपले समर्थन मागे घेण्याचा इशारा दिला आहे. एवढेच नव्हे तर संघटनेचे सदस्य असणारे हजारो आदिवासी बांधव काँग्रेस व राष्ट्रवादीतून बाहेर पडतील, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, माजी आदिवासी विकास मंत्री व आमदार ए. टी. पवार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली. या मागण्या शासन दरबारी मांडण्याचे त्यांनी आश्वासन देऊनही संघटनेचे पदाधिकारी आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत. शुक्रवारी उपोषणाचा चवथा दिवस असून मागण्या त्वरीत मान्य झाल्या नाहीत तर येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे राज्य अध्यक्ष कैलास बोरसे, सचिव एकनाथ गुंड, सदस्य डी. के. गांगुर्डे, नानाभाऊ शिंदे यांनी दिला आहे.