Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी रस्तोगी यांची सहसचिव म्हणून मुंबईत बदली
डॉ. साळुंखे प्रभारी जिल्हाधिकारी

 

रत्नागिरी, २९ जानेवारी/खास प्रतिनिधी : जिल्हाधिकारी विकासचंद्र रस्तोगी यांची राजभवन, मुंबई येथे सहसचिव म्हणून बदली झाली असून, त्यांनी आपल्या पदाचा भार अपर जिल्हाधिकारी डॉ. सुरेश साळुंखे यांच्याकडे आज सोपविला.रस्तोगी यांनी जून २००६ मध्ये रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतली आणि त्याच क्षणी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्याचा ‘रुबाब आणि मुखवटा’ बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेच्या आणि पर्यायाने जिल्ह्याच्या विकासाला वाहून घेतले. कामाचा जलदगतीने निपटारा करण्याची त्यांची हातोटी त्यांच्या कार्यक्षमतेची साक्ष देणारी ठरली व यामुळेच ते कर्मचारी, अधिकारी आणि सर्वसामान्यांमध्ये आदराचे स्थान पटकावून गेले. फलोत्पादन आणि मच्छिमारी व्यवसायावर रत्नागिरी जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून असले, तरी या अर्थकारणाचा कणा असलेले हे व्यवसाय गेल्या काही वर्षांंपासून अडचणीत सापडले आहेत. या पाश्र्वभूमीवर फलोत्पादन व मच्छिमारी व्यवसायाबरोबरच पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याच्या शासनाच्या धोरणाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करून रस्तोगी यांनी आपल्या ‘विकास’ या नावाला खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरविले आहे. १९९५ साली भारतीय प्रशासन सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी जबाबदारीच्या अनेक पदांवर आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. जून २००६ मध्ये जिल्हाधिकारीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी सुरू केलेल्या विकासकामांचा धडाका सर्वश्रुत आहे. आता त्यांची राजभवन, मुंबई येथे सहसचिव म्हणून नेमणूक झाल्याने त्यांनी आज आपल्या पदाची सूत्रे रत्नागिरीचे अपर जिल्हाधिकारी डॉ. सुरेश साळुंखे यांच्याकडे सोपविली. रस्तोगी आपल्या नव्या पदावर उद्या रुजू होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी रस्तोगी यांची अचानक बदली झाल्याचे समजताच जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रशीद साखरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते दिलीप तथा नाना मयेकर यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी रस्तोगी यांनी जिल्ह्यातील जनतेने दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच माझी बदली मुंबईत झालेली असली तरी या जिल्ह्याच्या विकासासाठी माझे सहकार्य सदैव राहील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.