Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

‘मायभगिनींना उद्ध्वस्त केल्यास याद राखा’
सावंतवाडी, २९ जानेवारी/वार्ताहर

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मायनिंग आणि औष्णिक वीज प्रकल्पांना मंजुरी देऊन मायभगिनींना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्यास याद राखा, अशा खणखणीत शब्दात शिवसेना नेते व विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी शासनाला इशारा दिला. येत्या नऊ महिन्यांत छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असणारा भगवा झेंडा विधानसभेवर फडकणार आहे, असा विश्वास व्यक्त करून सर्व मंत्र्यांच्या संपत्तीची चौकशी करणार आहोत, असे जाहीर आश्वासन त्यांनी दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील शिवसेनेच्या जाहीर सभेत रामदास कदम बोलत होते. यावेळी आमदार परशुराम उपरकर व शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक उपस्थित होते. कोकणावर शिवसेनाप्रमुखांचे अपार प्रेम आहे. जिल्हा भगवामय झाला आहे. आजच्या सभेची सीडी मी शिवसेनाप्रमुखांना दाखवेन आणि आजही कोकणचे लोक तुमच्यावर प्रेम करीत असल्याचे सांगेन, असे रामदास कदम यांनी प्रथमच स्पष्ट केले.
मुंबईवर दहशतवादी हल्ला म्हणजे हिंदुस्थानावर हल्ला आम्ही मानतो. शासनकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळेच दहशतवादी हल्ला झाला, असे सांगून कदम यांनी राज्य शासनावर टीका केली. कर्जमाफीचा फायदा कोकणवासीयांना झाला नसून, तो पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनाच झाला, असा आरोप कदम यांनी केला. काँग्रेसचे हे सरकार गाडीला चाके नसणारे, अशी टाकी करीत त्यांनी वीज प्रश्नावर सरकारने लोकांना नुकसानीत नेल्याचे सांगून, आज वीज नसल्याने सव्वाचार लाख कामगार बेकार झाले. राज्यात ४० लाख बेरोजगारांत ही आणखी भर पडली आहे. वीज नसल्याने उद्योग बंद पडल्याने हा परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षांंत कोकणात पाटबंधारे प्रकल्प नाहीत. जमिनी बळकाविणे आणि प्रदूषणविरहित प्रकल्प आणण्याच्या भूमिकेला रामदास कदम यांनी जोरदार विरोध केला.