Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

पालीत शेतकरी कामगार पक्षाच्या तीन सदस्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

 

पाली, २९ जानेवारी/प्रतिनिधी : शेतकरी कामगार पक्षाचे संदीप शंकर परब, अर्पणा अरुण साखरले व अनिता सागळे यांनी आपल्या प्रभागातील विकासकामे होत नसल्याने व निवडून दिलेल्या जनतेचा शब्द पूर्ण करू न शकल्यामुळे सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल यांनी त्यांचे स्वागत व अभिनंदन केले. पक्ष कार्यालयात झालेल्या छोटय़ाशा कार्यक्रमात पक्षात प्रवेश केलेल्या ग्रा. पं. सदस्यांना मानाची वागणूक दिली जाईल, तसेच त्यांच्या प्रभागातील ठप्प झालेली कामे त्वरित सुरू करून, या सदस्यांची जनमानसात प्रतिमा उंचावेल याची काळजी पक्षातर्फे घेतली जाईल, तसेच लवकरच पाली शहरासाठी अत्याधुनिक फिल्टर प्लॅन्ट असलेली नळयोजना त्वरित कार्यान्वित करण्यासंबंधीचे आश्वासन वसंत ओसवाल यांनी दिले.
सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देसाई यांनी स्वागतपर भाषणात राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेल्या सदस्यांचे स्वागत व अभिनंदन करून राष्ट्रवादी हा शिस्तबद्ध पक्ष असून, त्याची अस्मिता जपण्याचे काम सर्वांनी करावे, असे आवाहन करून राष्ट्रवादीमध्ये कोणतीही बेशिस्त कार्यकर्त्यांकडून खपवून घेतली जाणार नाही. ज्यांच्या चुका झाल्या आहेत त्यांनी त्या सुधाराव्यात, अन्यथा पक्षातून निघून जावे, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला. आणखी असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक असून, त्यांना लवकरच मानाने पक्षात प्रवेश दिला जाईल, असे सुतोवाच देसाई यांनी केले.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल व राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रकाश देसाई यांच्या लोकाभिमुख काम करण्याच्या पद्धतीने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याचा निर्णय घेतला असून, यापुढे राष्ट्रवादीच्याच माध्यमातून राजकीय मार्गक्रमण करण्याचा निर्धार व्यक्त करून सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम व विकासकामे खऱ्या अर्थाने राबवली जातात, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस तालुक्यामध्ये क्रमांक एकचा राजकीय पक्ष असून, महाराष्ट्रात सत्तेवर असलेला मातब्बर पक्ष आहे व त्या माध्यमातून लोकांना अपेक्षित असलेली विकासकामे आम्ही पूर्ण करू शकतो, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केला.
यावेळी या कार्यक्रमास पालीचे सरपंच विजय काटकर, ग्रा. सदस्य रमेश मिसाळ, ग्रा. सदस्य अनुपम कुलकर्णी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दादा कारखानीस, राजयोगी मित्रमंडळाचे अध्यक्ष अविनाश शिंदे, वसंत पालकर, अण्णा मोरे, हरिश्चंद्र पाटील, सुधाकर मोरे, अरुण साखरले, गोरखनाथ माळी, संजय खंडागळे, मिलिंद थळे आदी मान्यवर उपस्थित होते.