Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

ठाणे-कर्जत नव्या लोकलचे कर्जत स्थानकामध्ये स्वागत

 

कर्जत, २९ जानेवारी/वार्ताहर : ठाणे रेल्वे स्थानकातून सायंकाळी ७.५९ वाजता सुटणाऱ्या आणि कर्जत रेल्वे स्थानकामध्ये रात्री ९.२७ वाजता पोहोचणाऱ्या अशा नव्याने सुरू करण्यात आलेल्या लोकलचे कर्जत रेल्वे प्रवासी संघाच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. या लोकलमुळे कर्जतच्या प्रवाशांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे.
ठाण्याहून निघालेल्या नवीन बनावटीच्या या उपनगरी गाडीचे कर्जत रेल्वे स्थानकामध्ये रात्री आगमन होताच कर्जतकरांनी एकच जल्लोष केला. या गाडीचे मोटरमन आर. के. चावडा, गार्ड ए. जे. चतुर आणि तंत्रज्ञ सुरेश कुशवाह यांचे कर्जत रेल्वे प्रवासी संघाचे सरचिटणीस विजय हरिश्चंद्रे आणि रवींद्र खराडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी गोपीलाल ओसवाल, बच्चुशेठ मिश्रा, शीतलाप्रसाद गुप्ता, अनंत कोरी, राजेंद्र खिल्लार, इरफान अत्तार, सतीश पवार, नवनीत साळवी, शहीद शेख यांच्यासह असंख्य कर्जतकर उपस्थित होते.
नव्या गाडय़ांच्या वेळा
रेल्वे प्रवासी संघाच्या गेल्या अनेक दिवसांपासूनच्या अथक प्रयत्नांमुळे कर्जत आणि खोपोलीसाठी काही नवीन लोकलगाडय़ा सुरू करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक जे. एन. लाल यांनी यासंबंधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केल्याबद्दल विजय हरिश्चंद्रे यांनी त्यांना कर्जतच्या प्रवाशांच्या वतीने जाहीर धन्यवाद दिले आहेत. नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपनगरी गाडय़ांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे- (१) ठाण्याहून सायंकाळी ७.५९ वाजता सुटणार आणि कर्जतला ९.२७ वाजता पोहोचणार. (२) कर्जतहून रात्री ९.५४ वाजता सुटणार आणि ठाण्याला रात्री ११.२५ वाजता पोहोचणार. (३) मुंबईहून रात्री ९.५४ वाजता सुटणार आणि कर्जतला रात्री ११.५५ वाजता, तर खोपोलीला रात्री १२.२० वाजता पोहोचणार. (४) कर्जतहून पहाटे ५.४० वाजता सुटणार व खोपोलीला सकाळी ६.०५ वाजता पोहोचणार. (५) खोपोलीहून सकाळी ६.१३ वाजता सुटणार आणि मुंबईला सकाळी ८.४२ वाजता पोहोचणार. (६) खोपोलीहून रात्री ११.२० वाजता सुटणार आणि कर्जतला रात्री ११.४५ वाजता पोहोचणार.