Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३० जानेवारी २००९

राज्य

पहिल्या विश्व मराठी संमेलनासाठी मुख्यमंत्र्यांकडून २५ लाख
संदीप देशपांडे
नागपूर, २९ जानेवारी

अमेरिकेतील सॅन होजे येथे होणाऱ्या पहिल्या बहुचर्चित विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी आयोजकांना महाराष्ट्र सरकारकडून २५ लाख रुपये मिळणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे यंदा इतिहासात पहिल्यांदाच दोन संमेलने घेतली जाणार आहेत. पहिले विश्व मराठी संमेलन फेब्रुवारीमध्ये सॅन होजे येथे तर, ८२ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन मार्चमध्ये महाबळेश्वरला होणार आहे. भारतात दरवर्षी होणाऱ्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी स्वागत समितीला सरकारकडून २५ लाख रुपये मिळतात.

महापूर : चौकशी समितीचाही पालिकेवर ठपका
नाशिक, २९ जानेवारी / प्रतिनिधी

संपूर्ण शहराला १९ सप्टेंबर २००८ रोजी महापुराचा जो तडाखा बसला, त्यामागे नेमक्या कोणकोणत्या त्रुटी होत्या, याविषयीच्या चौकशी अहवालात नाशिक महापालिकेने संवेदनशीलता तर दाखविली नाहीच, शिवाय महापुराची माहिती नागरिकांना देण्यातही त्यांना अपयश आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या काठावर झालेली अतिक्रमणे, गंगापूर धरणातून अचानकपणे सोडलेले पाणी, पूर रेषेची आखणी न करणे आणि प्रत्यक्ष पुराच्या काळातील त्रुटी यामुळे पुराची तीव्रता अधिक वाढल्याचा निष्कर्षही समितीने नोंदविला आहे.

इतर मागासवर्गीय महामंडळाविरुद्धची जनहित याचिका निकाली
नाशिक, २९ जानेवारी / खास प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय महामंडळाचे अध्यक्ष शासननियुक्त असल्याने मंडळाकरवी होणाऱ्या कर्ज वाटपात राजकीय हितसंबंध असतात. परिणामी कर्ज वाटपामध्ये पारदर्शकतेचा अभाव असतो. त्यामुळे अध्यक्षांकडे कर्ज वितरणाचे अधिकार न ठेवता ते शासकीय अधिकाऱ्यांकडे असावे या प्रमुख मुद्यावर आधारित उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिका याचिकाकर्त्यांनेच मागे घेतल्यामुळे मुख्य न्यायाधीश स्वतंत्रकुमार व न्या. डॉ. धनंजय चंद्रचुड यांच्या खंडपीठाने ही बहुचर्चित याचिका निकाली काढली.

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी रस्तोगी यांची सहसचिव म्हणून मुंबईत बदली
डॉ. साळुंखे प्रभारी जिल्हाधिकारी
रत्नागिरी, २९ जानेवारी/खास प्रतिनिधी :
जिल्हाधिकारी विकासचंद्र रस्तोगी यांची राजभवन, मुंबई येथे सहसचिव म्हणून बदली झाली असून, त्यांनी आपल्या पदाचा भार अपर जिल्हाधिकारी डॉ. सुरेश साळुंखे यांच्याकडे आज सोपविला.रस्तोगी यांनी जून २००६ मध्ये रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतली आणि त्याच क्षणी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्याचा ‘रुबाब आणि मुखवटा’ बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेच्या आणि पर्यायाने जिल्ह्याच्या विकासाला वाहून घेतले.

बचतगटांमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे - सुळे
बारामती, २९ जानेवारी / वार्ताहर

महिलांना स्वतंत्र व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी निर्णयप्रक्रियेमध्ये ज्यांच्या सहभाग आहे, अशा महिलांसाठी ज्येष्ठनेते शरद पवार यांनी ३३ टक्के आरक्षण लागू केले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेबरोबर सहकार क्षेत्रातही महिला दिसू लागल्या आहेत. महिलांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांच्यात व्यावहारिक ज्ञान वाढून महिला स्वावलंबी व्हाव्यात. यासाठी बचतगट स्थापन करून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र शासनाने चार टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले आहे. या निर्णयामुळे महिलांचे राहणीमान उंचविण्याबरोबरच त्यांना आर्थिक स्वातंत्र्यही मिळाल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुप्रिया सुळे यांचा बारामती तालुक्यातील गुणवडी, डोर्लेवाडी, झारगडवाडी, सोनगाव, मेखळी, धाडगेवाडी, निरा-वागज, खांडज या गावांमध्ये संपर्क दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी आमदार रमेश शेडगे, माळेगाव साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे, छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष अविनाश घोलप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे, पंचायत समितीचे सभापती पोपटराव पानसरे, जिल्हा बँकेचे सदस्य विश्वासराव देवकाते, निला गाडे, बारामती बँकेचे अध्यक्ष उमेश पोतेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अ‍ॅड. आर ए जगताप, नितीन शेंडे, योगेश जगताप, किरण तावरे, द्वारका टकले, संध्या बोबडे, संगीता कोकरे, उज्ज्वला शिपकुले, अश्विनी जगताप आदी उपस्थित होते.