Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३० जानेवारी २००९

क्रीडा

सिक्स पॅक पवार!
दुलीप करंडक क्रिकेट
प्रसाद लाड
मुंबई, २९ जानेवारी

अनुभवी फिरकीपटू रमेश पोवारला डावलून राजेश पवारला दुलीप करंडक क्रिकेट स्पध्रेच्या पूर्व विभागाविरूद्धच्या उपान्त्य फेरीतील सामन्यात निवडण्याचा निर्णय घेतल्यावर अनेक क्रिकेट पंडितांनी भुवया उंचावल्या होत्या. पण राजेशने त्याच्यातील ‘पावर’ दाखवित पूर्व विभागाचे सहा फलंदाज गारद केले आणि त्याच्या या भेदक माऱ्यामुळेच पश्चिम विभागाला पूर्व विभागाला पहिल्याच दिवशी तंबूत धाडणे शक्य झाले. आज सामन्याच्या पहिल्याच दिवशी पूर्व विभागाचा पहिला डाव १७१ धावांमध्ये संपुष्टात आला असून त्याला चोख प्रत्युत्तर देत पश्चिम विभागाने दिवसअखेर २ विकेट्सच्या मोबदल्यात १०२ धावा पूर्ण केल्या आहेत. खेळपट्टीवरचे गवत, गोलंदाजीसाठीचे पोषक वातावरण आणि मैदानाचा पूर्व इतिहास लक्षात घेऊन पश्चिम विभागाचा कर्णधार वसीम जाफरने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि त्याच्या तो चांगलाच पथ्यावर पडला.

आफ्रिकेकडून पॅर्नेल, सोसोबेला पदार्पणाची संधी
मेलबर्न, २९ जानेवारी / पीटीआय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने उद्या, शुक्रवारी पर्थला होणाऱ्या पाचव्या व शेवटच्या एकदिवसीय सामन्यात डेल स्टेन आणि मखाया एनटिनीच्या जागी दोन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

विश्व क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळविण्यासाठी सचिन महत्त्वाचा दुवा - शेन वॉर्न
नवी दिल्ली, २९ जानेवारी/पीटीआय

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या चमकदार कामगिरीने ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पीनर शेन वॉर्न याला चांगलेच प्रभावीत केले आहे. मात्र क्रिकेटमधील अव्वल स्थान मिळविण्याच्या भारताच्या स्वप्नात फिट सचिन तेंडुलकर हा महत्त्वाचा दुवा असेल असे वॉर्नने म्हटले आहे. भारतीय संघाने अलिकडेच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाला पराभवाची धूळ चारली असली तरी हा भारताचा सर्वोत्तम संघ आहे हे मानण्यास वॉर्न तयार नाही.

भूपती-नोवेल्स दुहेरीच्या अंतिम फेरीत
ऑस्ट्रेलियन ओपन
मेलबर्न, २९ जानेवारी / पीटीआय
महेश भूपती आणि मार्क नोवेल्स या जोडीने ल्युकाझ क्युबोट आणि ऑलिव्हर मराच जोडीचा ६-३, ६-१ असा पराभव करून येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेची अंतिम फेरी गाठली आहे.
तिसऱ्या मानांकित भारत-बहामाच्या जोडगोळीने पोलंड-ऑस्ट्रियन जोडीला उपांत्य फेरीच्या लढतीत फक्त ५८ मिनिटांत नामोहरम केले.

जेतेपद आणि नंबर १साठी सेरेना - सफिना यांच्यात झुंज
कारकीर्दीतील दहावे ग्रॅण्डस्लॅम आणि विश्व टेनिस क्रमवारीतील पहिले स्थान हेच स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सपुढे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेच्या महिला गटाच्या अंतिम फेरीत शनिवारी आव्हान असेल ते रशियाच्या दिनारा सफिनाचे. रॉड लेव्हरचे मैदान उष्म्यामुळे तापलेले असताना सेरेनाचा फॉर्मही मैदानात प्रखरतेने तळपत होता. उपांत्य फेरीत एलिना देमेंतिव्हाची सलग १५ विजयांची घोडदौड रोखताना सेरेनाने ६-३, ६-४ अशा दमदार विजयाची नोंद केली. अमेरिकेच्या द्वितीय मानांकित सेरेनाने आतापर्यंत तीन वेळा ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम जेतेपदावर नाव कोरले आहे.

रॉजर फेडरर अंतिम फेरीत
स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररने अ‍ॅन्डी रॉडिकचा पराभव करून ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेच्या पुरुष विभागाची अंतिम फेरी गाठली आहे. कारकीर्दीतील १४व्या ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदाचे ध्येय जोपासणाऱ्या द्वितीय मानांकित फेडररने रॉडिकला ६-२, ७-५, ७-५ अशी धूळ चारली. त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नादाल शुक्रवारी स्पेनच्या फर्नाडो व्हर्दास्कोशी उपांत्य फेरीची झुंज देणार आहे.फेडररने १८व्या ग्रॅण्डस्लॅम अंतिम फेरीत प्रवेश केला असून, त्याने मागील तीन्ही वेळा ऑस्ट्रेलियन स्पध्रेच्या जेतेपदाच्या लढतीत पराभव पत्करलेला नाही.

धोनीच्या ‘ग्रीप’ला स्क्वॉश बॉलचा आधार!
विनायक दळवी
मुंबई, २९ जानेवारी

क्रिकेटमध्ये डेनिस लिलीची अ‍ॅल्युमिनियमची बॅट आली, रिकी पॉन्टिंगची ग्राफाईटची बॅट आली. हॅन्सी क्रोनिएचा ‘इअरफोन आला. त्यामुळे वादंग माजला. गतविश्वचषक स्पर्धेत गिलख्रिस्टने डाव्या ग्लोव्हजमध्ये स्क्वॉशचा चेंडू भरला होता. त्यामुळे फलंदाजीसाठी गिलख्रिस्टला मदत झाली होती. गिलख्रिस्टने बार्बाडोसच्या अंतिम सामन्यात १०४ चेंडूत १४९ धावा फटकाविल्या होत्या. गिलख्रिस्टची ती शक्कल भारताच्या कप्तान महेंद्रसिंग धोनीने दम्बुलाच्या श्रीलंकेविरुद्ध लढतीत वापरली.

महिंद्र संघ सर्वप्रथम बाद फेरीत दाखल
रोहा, २९ जानेवारी/क्री.प्र.

दत्ताजीराव तटकरे क्रीडा नगरीत सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धेत साखळीतील अखेरचा सामना जिंकून मुंबईच्या महिंद्र आणि महिंद्र संघाने पुरुष गटातून सर्वप्रथम बाद फेरीत प्रवेश केला. त्याआधी महिंद्रने दिल्लीला नाणेफेकीचा कौल जिंकून हरविले.महिंद्र संघाने आठ-सहा अशी आघाडी घेतली असताना सीमा सुरक्षा दल संघाचे खेळाडू स्वत:च राखीव रेषा जाणीवपूर्वक पार करून एकापाठोपाठ बाद होत गेले. पंचांना त्यांचे हे वागणे गैर वाटले.

दक्षिणेचा धावांचा डोंगर; बद्रिनाथचे द्विशतक, द्रवीडचे शतक
राजकोट, २९ जानेवारी/ वृत्तसंस्था

माधवराव सिंधिया स्टेडियमवरील उत्तर विभागाविरुद्ध उपान्त्य फेरीच्या सामन्यात दक्षिण विभागाचा कर्णधार एस. बद्रिनाथने (२००) तडफडार द्विशतक झळकावित संघाला ६ विकेट्सच्या मोबदल्यात ४४२ धावांचा डोंगर उभारून दिला. त्याला सुयोग्य साथ लाभली ती सध्या फॉर्मात नसलेल्या राहुल द्रविडची. दरवेळी कासवगतीने खेळणाऱ्या द्रविडने (१३८) आज आक्रमक फलंदाजी करीत संघाला झटपट धावा करण्यात चांगलाच हातभर लावला.दक्षिण विभागाचे अभिनव मकुंद (१०) आणि रॉबीन उत्थप्पा (१) लवकर परतल्याने धावसंख्या वाढविण्याची जबाबदारी कर्णधार एस. बद्रिनाथ आणि राहुल द्रविड या दोन फलंदाजांवर येऊन पडली. एस. बद्रिनाथने २४ चौकार आणि ४ षटकार ठोकत द्विशतक पूर्ण केले, पण त्यानंतर लगेचच त्याला मनप्रीत गोणीने तंबूत धाडले. तर द्रविडनेही १५ चौकारांच्या सहाय्याने १७३ चेंडूत १३८ धावा फटकाविल्या. त्याला फिरकीपटू अमित मिश्राने बाद केले. दिवसअखेर दक्षिण विभागाने ९० षटकांत ६ बाद ४४२ धावा केल्या.

आयसीसी बैठकीत ‘आयसीएल’ वर चर्चा होणार
दुबई, २९ जानेवारी, वृत्तसंस्था

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या शनिवारपासून पर्थ येथे होणाऱ्या बैठकीत इंडियन क्रिकेट लीगला (आय.सी.एल) मान्यता देण्याच्या मुद्य्यावर चर्चा होणार आहे.
सुभाष चंद्रा यांच्या ‘झी टेलिफिल्म्स’ ने चालू केलेली इंडियन क्रिकेट लीग ही गेल्या दीड वर्षांपासून वादाचा विषय बनली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयसीएल ला मान्यता दिलेली नाही. इंडियन क्रिकेट लीग तर्फे भरविण्यात येणाऱ्या ट्वेंटी २० स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बहिष्कृत केले आहे. या खेळाडूंचा भारतीय संघ निवडीसाठी तसेच स्थानिक स्पर्धामध्ये खेळण्यासाठीही विचार केला जात नाही. इंडियन क्रिकेट लीग तर्फे भरविण्यात येणाऱ्या ट्वेंटी २० स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या परदेशी खेळाडूंवरही संबंधित देशांच्या मंडळांनी बंदी घातली आहे. इंडियन क्रिकेट लीगला मान्यता न देण्याच्या निर्णयाचा सर्वात मोठा फटका पाकिस्तान आणि बांगला देश या संघांना बसला आहे. या देशांचे अनेक अनुभवी खेळाडू इंडियन क्रिकेट लीगमध्ये सहभागी झाले आहेत.या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भवितव्याचा विचार न करता आयसीएल मध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. आयसीएल मध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंवर बंदी घालण्याचा निर्णय रद्द करावा अशी मागणी अजित वाडेकर यांच्यासारख्या ज्येष्ठ खेळाडूनेही अनेकवेळा जाहीरपणे केली आहे.

वेंगसरकर संघ अजिंक्य
मुंबई, २९ जानेवारी/क्री.प्र.

वेंगसरकर इलेव्हनने आपल्या तीनही सामन्यात मिळविलेली पहिल्या डावातील आघाडी आणि त्यायोगे मिळालेल्या नऊ गुणांच्या आधारे द्वितीय एलआयसी चषक (१४ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. मुंबईचाच दुसरा संघ तेंडुलकर इलेव्हनने सरस ‘कोशंट’च्या आधारे द्वितीय स्थान मिळविताना पुण्याच्या केडन्स अकादमीला मागे टाकले. स्पर्धेमध्ये सर्वोत्तम ठरलेला केडन्सचा यष्टीरक्षक- फलंदाज निखिल नाईक (६४) याने नचिकेत परांजपे (२५) आणि आकाश गाडे (४५) यांच्या साथीने आपल्या संघाला विजयाच्या समीप आणले होते. पण त्याच्या संघाच्या १९१ धावा झाल्या असता विकास पवारने निखिलला प्रसाद पवार करवी यष्टीमागे बाद केले आणि पुणेकरांच्या विजेतेपदाच्या आशेला ओहोटी लागली. आजच्या शेवटच्या फेरीतील अन्य सामन्यामध्ये तेंडुलकर संघाने बडोदे संघावर पहिल्या डावात आघाडी घेतली. किशन घोष (४३), प्रणव मेनन (३१) आणि नवव्या क्रमांकावरील अल्पाश रमजानी (५३) यांनी मुंबईकरांना २२४ चा पल्ला गाठला. मेनन आणि घोष यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४३ आणि रमजानीने वैभव जावकरसह सातव्या विकेटसाठी ३७ आणि अतुलसिंगसह नवव्या विकेटसाठी २९ धावांच्या ज्या महत्त्वपूर्ण भागिदाऱ्या केल्या. त्यामुळे मग त्यांच्या संघाला उपविजेतेपद जिंकण्यास मदत केली.

सायमंड्सला दंड
मेलबर्न, २९ जानेवारी/ पीटीआय

न्यूझीलंडचा यष्टीरक्षक ब्रेन्डन मॅक्यूलमवर शाब्दिक टिकास्त्र सोडल्याबद्दल अष्टपैलू क्रिकेटपटू अ‍ॅण्ड्रय़ू सायमंड्सला ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने निलंबनाची कारवाई न करता फक्त चार हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंड ठोठविला आहे.रेडिओवर झालेल्या एका मुलाखतीदरम्यान सायमंड्सने मॅक्यूलमवर केलेल्या टिपण्णी केली होती, त्यावर आज ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने सुनावणीसाठी बैठक घेतली होती. या सुनावणीनंतर सायमंड्स म्हणाला की, मी मॅक्यूलमची माफी मागत आहे, त्याने मला माफ करावे. त्याने हे प्रकरण उत्तमरीत्या समजून घेतल्याने मी त्याचा आभारी आहे. कमिशनर लुईस यांनी माझे म्हणणे एकून घेऊन कमीत कमी शिक्षा केल्याने मला खेळावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करता येईल.

एअर इंडियाने बाजी मारली
अजय ठाकूरचा चढायांचा धुडगूस
छत्रपती शिवाजी चषक कबड्डी
रोहा, २९ जानेवारी/क्री.प्र.

एअर इंडिया विरुद्ध सी.आर.पी.एफ.- दिल्ली या दोन तुल्यबळ संघात जुंपलेल्या तुंबळ युद्धाने आज छत्रपती शिवाजी चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेतील तिसरा दिवस गाजला. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी ही लढत अखेर एअर इंडियाने ३४-२५ अशी जिंकली. एअर इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो पाच फूट दहा इंच उंचीचा अजय ठाकूर. त्याने अक्षरश: धुमाकूळ घेतला. चौदा चढायांत त्याने एकूण १८ गुण घेतले. अवधुत तटकरे मित्र मंडळाने येथील कै. दत्ताजीराव तटकरे क्रीडा नगरीत आयोजित केलेल्या या स्पर्धेत तिसऱ्या दिवशी झालेल्या सर्व सामन्यांत सवरेत्कृष्ट ठरला तो वरील दोन संघातील सामना. साखळीतील त्यांचा हा अखेरचा सामना जिंकून एअर इंडियाने महिंद्र पाठोपाठ बाद फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या दिवशी रायगड क्रीडा रसिकांची तुफान गर्दी उसळली होती. सुमारे १८ हजार क्रीडा रसिकांनी आपली उपस्थिती नोंदविली होती. त्यांना दर्जेदार लढती पाहावयास मिळाल्या. या साऱ्यांचा ‘हिरो’ ठरला तो मात्र एअर इंडियाचा अजय ठाकूर. तीन वेळा संघ अडचणीत आला असताना या पठ्ठय़ाने प्रत्येक चढाईत एकेक गुण घेत संघाची सूत्रे आपल्या हाती घेतली. या संधीचा पुरेपूर लाभ गौरव शेट्टी, प्रशांत चव्हाण यांनी उठविला. गौरवने चढाईत एकेक गुण घेतला तर प्रशांत चव्हाणने चित्तथरारक पकडी केल्या.