Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३० जानेवारी २००९

ठाणे/प्रतिनिधी : सॅटिस प्रकल्पाचे सुरू असलेले काम, रिक्षावाल्यांची सततची घुसखोरी आणि फेरीवाले-हातगाडीवाल्यांचा उच्छाद यामुळे घुसमट झालेल्या ठाणे रेल्वे स्टेशन परिसराने अखेर आज मोकळा श्वास घेतला. भाजपच्या आंदोलनामुळे या परिसरातील फेरीवाले परागंदा झाले असले तरी ‘फेरीवालामुक्त स्टेशन परिसर’ कायम राहील का? याबाबत मात्र प्रवाशांनी साशंकता व्यक्त केली.

पेट्रोलचे दर घटल्याने डोंबिवलीत रिक्षाभाडय़ात कपात
डोंबिवली/प्रतिनिधी

महाराष्ट्र चालक रिक्षा सेनेने पेट्रोलचे भाव कमी झाल्यामुळे रिक्षाचे भाडे आजपासून कमी केले आहे. शेअर रिक्षेसाठी यापूर्वी आकारण्यात येणारा सहा रुपये दर एक रुपयाने कमी करण्यात आला आहे, तर एक ग्राहक वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा तेरा रुपये दर दोन रुपयांनी कमी करण्यात आला आहे.
डोंबिवली शहरातील रिक्षांना मीटर पध्दत लागू करण्यासाठी शिवसेना पुढाकार घेणार आहे. या प्रकरणी परिवहन विभाग, प्रादेशिक वाहतूक अधिकारी, उपप्रादेशिक वाहतूक अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र रिक्षा चालक सेना डोंबिवली विभागाचे अध्यक्ष शरद गंभीरराव म्हणाले.

विक्रीकराच्या सल्लागारांचे हात कलम !
राजीव कुळकर्णी

मूल्यवर्धित कराचे (व्हॅट) ऑडिट फक्त सनदी लेखापालांनीच (चार्टर्ड अकाऊंटंट) करावे, असे निर्देश शासनाने जारी केल्याने राज्यातील हजारो विक्रीकर सल्लागारांना याचा फटका बसला असून सनदी लेखापालांची संख्या तुलनेने कमी असल्याने व्हॅटच्या ऑडिटसाठी त्यांना वेळ देणे अशक्य होऊन बसले आहे. यामुळे ऑडिटला विलंब होऊन अनेक कायदेविषयक गुंतागुंत निर्माण होऊ लागली असून प्रसंगी व्यापाऱ्यांना दंडही भरावा लागत आहे.

..तर शासनाचे चार कोटी वाचले असते!
ठाणे/प्रतिनिधी

बदलापूर येथील ‘बॅरेज’ धरणाच्या कामाचा खर्च तब्बल ७०० टक्क्याने वाढल्याचे ध्यानात आल्यानंतर नव्याने निविदा मागविल्या असत्या तर स्पर्धात्मक स्वरूप येऊन शासनाचे किमान तीन ते चार कोटी रुपये वाचले असते, तसेच प्राधिकरण व जलसंपदा विभागाकडे तांत्रिक ज्ञान असलेले वरिष्ठ अभियंते उपलब्ध असताना बंधाऱ्याच्या आराखडय़ात एवढय़ा टोकाचा बदल करण्याचा निर्णय इतक्या उशिरा का व कुणाच्या फायद्यासाठी घेण्यात आला, असा सवाल त्यातील जाणकारांकडून विचारला जात आहे.

निविदा प्रक्रियेत पाण्याची वाट अडली असती म्हणूनच..
ठाणे/प्रतिनिधी

बदलापूर व अंबरनाथ शहरांना पाणीपुरवठा करणारे ‘बॅरेज’ धरण २००५ च्या अतिवृष्टीने वाहून गेल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीतून तातडीने मार्ग काढण्यासाठी वाढीव कामाच्या निविदा न मागविता दोन कोटींचे काम १५ कोटी रुपये एवढय़ा खर्चात करण्यात आले, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे, तर आमदार किसन कथोरे यांनीही मंडळाची बाजू योग्य असल्याचा निर्वाळा देणारी भूमिका घेतली आहे. ‘ठाणे वृत्तान्त’मध्ये ‘म.जी.प्रा.चे चुकीचे नियोजन- दोन कोटींचा बंधारा गेला १८ कोटींवर’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीसंदर्भात मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे.

वेतन आयोगासाठी शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात
शहापूर/वार्ताहर

सहाव्या वेतन आयोगासंदर्भात राज्य शासनाने तातडीने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी न केल्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा परिषदेचे कार्याध्यक्ष आमदार रामनाथ मोते यांनी दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने २३ जानेवारी रोजी केलेल्या धरणे आंदोलनासही शिक्षक परिषदेने पाठिंबा दिला होता. वेतन आयोग लागू करण्यास शासन हेतुपुरस्सर दिरंगाई करीत आहे, हे शिक्षक परिषद सहन करणार नाही. शिक्षकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने तातडीने सहावा वेतन आयोग लागू करावा, अन्यथा शिक्षक परिषद प्रसंगी रस्त्यावर उतरेल, असा इशारा आमदार मोते यांनी दिला आहे. सहावा वेतन आयोग १ जाने. २००६ पासून लागू करावा, पाचव्या वेतन आयोगातील त्रुटींप्रमाणे त्रुटी नसाव्यात, आदी मागण्यांचे निवेदनही संघटनेने शासनाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

डोंबिवली टपाल व तार कर्मचारी संघटनेचे स्नेहसंमेलन संपन्न
डोंबिवली/प्रतिनिधी

डोंबिवली टपाल आणि तार कर्मचारी कल्याणकारी संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम नुकताच येथे साजरा झाला. सभासद आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सादर केलेल्या मनोरंजन कार्यक्रमांनी सुरुवात झाली. संस्थेचे अध्यक्ष के. एन. कुलकर्णी यांनी पूजन केल्यानंतर कार्याध्यक्ष गो. के. हिंगणे यांनी प्रास्ताविक केले. नंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यांचे सूत्रसंचालन संस्थेच्या कार्यकर्त्यां शोभना उमराणी यांनी केले. दुसऱ्या दिवशी खुले अधिवेशन संपन्न झाले. स्वागतगीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक संस्थेचे कार्यवाह पी. जी. साने यांनी केल्यानंतर प्रमुख पाहुण्या माधवी घारपुरे यांनी दीप प्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन केले. त्यानंतर के. एन. कुलकर्णी यांनी घारपुरे तसेच प्रमुख पाहुणे डॉ. उल्हास कोल्हटकर यांचा सत्कार केला. याप्रसंगी काही शैक्षणिक पारितोषिकांचे वितरण, संस्थेने आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धा तसेच करमणूक कार्यक्रमातील सहभागी सदस्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. कोल्हटकर यांच्या हस्ते झाले. डॉ. कोल्हटकर यांनी आपल्या भाषणात, पोस्टातील कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाविषयी विशेष उल्लेख केला, तर माधवी घारपुरे यांनी लिहिलेल्या ‘श्वास’ कादंबरीविषयक मनोरंजक माहिती दिली.

शरीरसौष्ठव स्पर्धेत स्वप्निल सुर्वेचे यश
कल्याण/प्रतिनिधी : श्री तिसाई हेल्थ सेंटरतर्फे आयोजित हौशी शरीरसौष्ठव स्पर्धेत सर्वोत्तम शरीरसौष्ठव प्रदर्शक म्हणून ठाणे येथील स्फूर्ती व्यायामशाळेच्या स्वप्निल सुर्वे यांनी यश संपादन केले. या स्पर्धेत ६० स्पर्धक सहभागी झाले होते. पिळदार शरीरयष्टीचा सन्मान निळजे गावच्या विठ्ठलकृपा व्यायामशाळेच्या जितेंद्र ढोणे, कल्याणच्या दुर्गामाता व्यायामशाळेच्या लक्ष्मीकांत म्हात्रे याने पटकावला. सांघिक विजेतेपद कळव्याच्या अपोलो जिम, डोंबिवलीच्या कानविंदे व्यायामशाळेने उपविजेतेपद, तिसाई हेल्थ सेंटरच्या श्रीजेश मेनन याने उगवता तारा हा बहुमान पटकावला. टॉप टेन स्पर्धकांमध्ये लक्ष्मण गायकवाड, श्रीजेश मेनन, भालचंद्र गायकवाड, हितेश चव्हाण, श्रीकांत शाहू, मच्छिंद्रनाथ गायकवाड, प्रशांत कांबळे, मंगेश पार्टे, दीपक सिंह, संदेश भारती यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला आमदार किसन कथोरे, उपसभापती वसंत डावखरे, महापौर रमेश जाधव, उपमहापौर नरेंद्र जाधव, संघटनेचे कमलाकर पाटील उपस्थित होते. तिसाई हेल्थ सेंटरचे गणपत गायकवाड यांनी या स्पर्धाचे आयोजन केले होते.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘नवाकाळ’ चे पारितोषिक
प्रतिनिधी : दहावीच्या परीक्षेत मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमांमध्ये मराठी विषयात सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रत्येकी दहा हजार रुपयांचे पारितोषिक देण्याचा निर्णय दै. ‘नवाकाळ’चे संपादक नीळकंठ खाडीलकर यांनी घेतला आहे. खाडिलकर यांनी यासाठी मंडळाला २ लाख २५ हजार रुपये निधी दिला आहे. दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांला नाटय़ाचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या नावे १० हजार रुपयांचे तर इंग्रजी माध्यमात मराठी भाषेत सर्वात जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांला नीळकंठ खाडीलकर यांच्या नावे १० हजाराचे पोरितोषिक देण्यात येणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही पारितोषिक देण्यात येणार आहे. यंदापासून ही पारितोषिके सुरू होत आहेत. मंडळाच्या निकाल सांराश पुस्तिकेत विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

हेरंबमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम
बदलापूर/वार्ताहर : अंबरनाथमध्ये विविध ठिकाणी माघी गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हेरंब विभागातील श्री हेरंब सेवा समितीचे यंदा उत्सवाचे ५४ वे वर्ष आहे. मंगळवार, २७ जानेवारीपासून माघी गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. उद्या शुक्रवार ३० जानेवारी रोजी ५.३० वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच हभप सदानंद बुवा गोखले यांचे दुपारी १२.३९ जन्माचे कीर्तन, रात्री ८ वाजता महाआरती, शनिवार, ३१ रोजी सकाळी ७ वाजता सामुदायिक सहस्त्रावर्तने, दुपारी ३ वाजता सत्यम भजन, दुपारी ४.३० वाजता ‘श्रीं’चा पालखी सोहळा, याशिवाय रात्री ९ वाजता ‘झी’ मराठी फेम सूरतालचे कलाकार भूपाळी ते भैरवी कार्यक्रम सादर करणार आहेत.

‘शिक्षणाच्या धंद्यामुळे समाजाची अधोगती ’
डोंबिवली/प्रतिनिधी

शिक्षणामुळे माणसाची प्रगती होत असते. मात्र शिक्षणाकडे धंदा म्हणून पाहिले की समाजाची अधोगती होते, असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. गोविंदराव आदिक यांनी येथे केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस गोपाळ गुळवे, कल्याण जिल्हाध्यक्ष जयनारायण पंडित, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, नगरसेवक रवी पाटील, संस्था अध्यक्ष महेश डुकरे उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रांत आदर्शवत कार्य करणाऱ्या सुधाकर कदम, रमेश पाटील, संघजा मेश्राम, श्रीकांत काळे, अशोक ओव्हाळ, राजेंद्र बोरसे, रूपाली कोकणे, अय्याज मौलवी, धर्मेंद्र उपाध्याय यांचा सत्कार करण्यात आला.

आनंदनगर वसाहतीत स्फोट; एक ठार
बदलापूर/वार्ताहर

अंबरनाथ येथील आनंदनगर औद्योगिक वसाहतीमधील इंडो फार्मा कंपनीमध्ये काल झालेल्या स्फोटात दीनानाथ मौर्या (२२) हा कामगार मरण पावला. या प्रकरणी अद्याप कोणास अटक झाली नसून, शिवाजीनगरचे पोलीस उपनिरीक्षक मोकाशी पुढील तपास करीत आहेत. काम सुरू असताना तांत्रिक बिघाडामुळे स्फोट झाल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले.