Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
विशेष लेख
(सविस्तर वृत्त)

गांधीहत्येचा प्रवास..

 

स्वातंत्र्यानंतरही सर्वसामान्यांच्या मनात जातीधर्माचा आधार घेत विद्वेष भिनवण्याचे काम काही शक्ती अविरतपणे करीत आहेत. विचारांची लढाई विचारांनी लढावी, हे सूत्र नाकारत ते व्यक्तिद्वेषातून हत्येचा आधार घेतात व विचार संपविण्याचा प्रयत्न करतात. ही धर्माध मंडळी इतिहास विपरीत स्वरूपात मांडतात. गैरसोयीची ठरणारी इतिहासातील पाने पुसतात. अशाच मनोवृत्तीने ३० जानेवारी १९४८ला महात्मा गांधींची हत्या करण्यात आली. ही हत्या ज्या नथुराम गोडसेने केली तो एक व्यक्ती नव्हता, तो विद्वेषाचे राजकारण करणाऱ्या शक्तींचा प्रतिनिधी होता. गांधीहत्येनंतर महात्म्याचे विचार संपतील हा धर्माधांचा भ्रम होता. आजही जग गांधीवादाच्या मार्गाने चालले आहे. महात्मा गांधींच्या हत्येची कारणे खोटी होती हे इतिहासाच्या दाखल्यांवरून सिद्ध होते.
गांधीजींच्या हत्येचा प्रयत्न १५ वेळा झाला. त्यातील दोन हल्ले तर नथुराम गोडसेनेच केले होते. त्यामागचे एक कारण मुस्लिमांचे तुष्टीकरण व दुसरे ते फाळणीला जबाबदार होते, असे सांगण्यात आले; पण द्विराष्ट्र ही मुस्लिम लीग व हिंदूमहासभेची मागणी होती. मुस्लिमांचे तुष्टीकरण हे कारण होते, तर स्वातंत्र्यपूर्व काळात १९३५ साली नथुरामने हल्ला का केला? इतिहासाच्या विद्रूपीकरणाचे मोठे उदाहरण म्हणजे भाजपच्या निवडणूक प्रचारात नरेंद्र मोदींच्या बाजूला लावण्यात आलेला कै. सरदार वल्लभभाई पटेल यांचा फोटो. महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर सरसंघचालक गोळवलकर व श्यामाप्रसाद मुखर्जी यांना लिहिलेल्या पत्रात, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांच्या प्रचार व प्रसारामुळे गांधीजींची हत्या झाली’, असे वल्लभभाई पटेल यांनी म्हटले होते.
महात्मा गांधींची धर्माबाबतची कल्पना व्यापक होती. परमेश्वराची उपासना करणे अथवा धार्मिक कर्मकांड म्हणजे धर्म असे त्यांनी मानले नाही. त्यांनी धर्मातीत तत्त्वाची संकल्पना स्पष्ट केली व हीच संकल्पना पुढे भारताच्या धर्मातीत घटनेचा आधार बनली. आज दुर्दैवाने हिंदुत्व हा धार्मिक नव्हे, तर राजकीय कार्यक्रम झाला आहे. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम हिंदू राष्ट्राचा पुरस्कर्ता होता. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी हे नथुरामचेच वैचारिक वारसदार आहेत आणि त्यांना पाठिंबा देणारा संघ परिवार वा शिवसेनाही त्याच पठडीतील आहेत. या हिंदुत्ववादी शक्तींचा हा संधिसाधूपणा व दुटप्पीपणा वर्तमानपत्रांतून रोजच लोकांसमोर येत असतो. दहशतवाद्यांना रोखण्यासाठी बलिदान देणारे हेमंत करकरे व त्यांच्यासारखे कर्तव्यनिष्ठ अधिकारी २६ नोव्हेंबरपूर्वी हिंदुत्ववाद्यांना सत्ताधाऱ्यांचे एजंट वाटत होते! ‘करकरेंच्या बायकामुलांची धिंड काढली पाहिजे’ असे म्हणणारे १२ तासांच्या अवधीत लगेच करकरे व हौतात्म्य पत्करलेल्या अधिकाऱ्यांच्या प्राणांचा राजकीय सौदा करण्यासाठी सरसावले.
मालेगाव बॉम्बस्फोटानंतर दहशतवादातील नवीन चेहरे भारतीयांसमोर आले. स्वत:ला शंकराचार्य म्हणविणारा दयानंद पांडे व त्याच्या पायाशी लोळण घेणारे उजव्या विचारसरणीचे हिंदुत्ववादी नेते यांना कदाचित महाराष्ट्राची संत परंपरा माहीत नसावी. येथील संतांनी ईश्वरभक्ती ही जाती-धर्माच्या पलीकडची असते हे सांगण्याचे धाडस केले. कर्मकांडाविरुद्ध आवाज उठविला आणि समाजातील सर्वच घटकांनी, त्या काळच्या चालीरीतींना विरोध करीत भक्तीचा नवीन मार्ग स्वीकारला. त्याच काळामध्ये सुरू झालेली मुसलमानांमधील सुफी परंपरा आणि इथल्या संतांनी सुरू केलेली भक्तीची मोहीम हे आज निर्माण झालेल्या धर्मातीत भारताचे बीज रोवणारी ठरली, पण साध्वी व संत म्हणविणाऱ्यांनी धर्मद्वेष शिकवत सत्तेचा मार्ग स्वीकारावा म्हणजे महाराष्ट्रामधील संत परंपरेच्या विचारांचा अपमानच होय. सहजीवनाचा मार्ग दाखविणारे संत कुठे आणि संतपदाचा बुरखा घालून विद्वेषी विचारांचे विष समाजाला पाजत, धर्मसत्ता आणण्यासाठी दुसऱ्या धर्माच्या तिरस्काराची शिकवण देणारी, स्वत: साध्वी म्हणवून घेणारी प्रज्ञासिंग ठाकूर आणि स्वत:ला शंकराचार्य म्हणवून घेणारा दयानंद पांडे कुठे?
मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये वापरण्यात आलेले आरडीएक्स हे काश्मीरमधील अतिरेक्यांकडून जप्त करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर येथे धार्मिक गदारोळ उठावा म्हणून आरएसएसचे प्रमुख प्रचारक मोहन भागवत यांच्या हत्येचा कटही रचण्यात आला होता. परकीयांचे आरडीएक्स स्वकीयांचे जीव घेण्यासाठी वापरणे याबाबत हिंदुत्वाची भाषा करणाऱ्या राजकीय पक्षांनी बोलायला हवे.
इतिहासाचे विद्रूपीकरण, धर्माच्या नावाने मांडलेला बाजार हाच या देशाचा खरा शत्रू आहे. मुस्लिम धर्मातील धर्माध व हिंदू धर्मातील धर्माध यांचे ध्येय व मार्ग एकच आहे. धर्माच्या आधारावर निर्माण झालेली राज्यसत्ता म्हणजेच ‘तालिबान’. जिथे स्त्रियांना किंमत नाही, जिथे मोकळ्या वातावरणात श्वास घेण्याची कोणाची हिम्मत नाही. सर्वसामान्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाला धर्मसत्तेत स्थान नसते.
हिंदुत्ववाद्यांना बहुसांस्कृतिक भारत मान्य नाही. जसे जिहादी हे खरे मुस्लिम नाहीत तसे हिंदुत्ववादी हे खरे हिंदू नाहीत. त्यांना येथे हिंदूंचे नव्हे, तर हिंदुत्ववाद्यांचे राष्ट्र आणायचे आहे. हे राष्ट्र ‘तालिबानी’ पद्धतीचेच असणार आहे; कारण हिंदुत्ववाद ही धार्मिक नव्हे, तर राजकीय विचारसरणी आहे. धर्माचा निव्वळ वापर ही विचारसरणी करते. त्यासाठी राजकीयच नव्हे, तर सर्वांनीच पुढे आले पाहिजे. तसे झाले नाही, तर भारताचा पाकिस्तान होण्यास वेळ लागणार नाही. स्वातंत्र्यानंतरच्या ६० वर्षांच्या प्रवासात महात्मा गांधींच्या विचारांना विश्वमान्यता मिळाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीदेखील महात्मा गांधींच्या विचारांना जाहीर मुजरा केला, पण भारतात मात्र नथुरामांचे वारसदार विद्वेषाचे विष पेरतच आहेत. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना प्रत्युत्तर त्यांच्याच भाषेत देणे हे आमचे कर्तव्य ठरेल, पण त्यांचीच नीती जेव्हा स्वकीय आपल्या मायभूमीत स्वत:चे उद्देश पूर्णत्वास नेण्यासाठी अमलात आणतात, तेव्हा म्हणावेसे वाटते- ‘गांधी, हम शर्मिदा हैं, तेरे कातिल जिंदा हैं!’
जितेंद्र आव्हाड
jsa707@gmail.com