Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
विशेष लेख
(सविस्तर वृत्त)

गांधीहत्या : संकुचित उद्दिष्टपूर्तीच्या मालिकेचा विकृत एपिसोड

 

न्यूयॉर्कमध्ये गांधीजींचा पुतळा बसविण्याला सर्वाधिक विरोध भारतीयांनीच केला होता. गांधींना स्वहितासाठी वापरून घ्यायचे आणि त्यांच्या मूल्यांची मात्र हत्या करायची, असे चालले आहे. एका कवीने म्हटल्यानुसार, ‘बरं झालं गांधी, तू तेव्हा मरून गेलास नाही तर आज तुला रोज मरावं लागलं असतं.’
मध्यंतरी मिरजेतील एका शिक्षण संस्थेत बोलताना शरद पोंक्षे (‘मी नथुराम बोलतोय’चा नायक) ने पूज्य गांधीजींची हत्या हे नथुरामच्या देशभक्तीचे कृत्य होते, असे म्हटले होते. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली गांधीजींच्या विरुद्ध लोकभावना चेतविण्याचे आणि ज्यांनी गांधींना पाहिलेही नव्हते अशा तरुण वर्गात त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे हे कूट कारस्थान आहे. आज देशात अनुभवास येणारी धर्माधता, मग ती बहुसंख्याक हिंदूंची असो वा अल्पसंख्याक मुस्लिमांची, देशाच्या स्वातंत्र्य, लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता आणि ऐक्याला मारक असल्याने तिचा मुकाबला सर्व स्तरांवर करणे अगत्याचे आहे. यासाठी सत्य जाणून घेतले पाहिजे.
‘गांधीजींचे राजकारण मुस्लिम अनुनयाचे होते, त्याची परिणती फाळणीत झाली. फाळणीनंतरही गांधींचे मुस्लिमप्रेम संपले नाही. त्यांनी पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्यासाठी उपोषण केले म्हणून त्यांची हत्या झाली’, असा प्रचार काही लोकांकडून सातत्याने करण्यात येतो. पण वस्तुस्थिती तशी नव्हती. काँग्रेसचे नेतृत्व लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर १९२० साली गांधीजींकडे आले. ज्याला आपण ‘मुस्लिम समस्या’ म्हणतो तो आधीच्या नेतृत्वाकडून गांधीजींकडे आलेला राजकीय वारसा होता. मुसलमानांना मुख्य राजकीय प्रवाहात आणण्याचे प्रयत्न गांधीजी भारतात परतण्यापूर्वीच चालू होते. १९०७ मध्ये १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्तच्या इंग्लंडमधील एका सभेत स्वा. सावरकर यांनी मुसलमानांचा उल्लेख ‘इंद्रधनुष्याचा एक रंग’ असा केला होता, हे विसरून चालणार नाही.
१९०७ साली धर्मनिहाय विभक्त मतदारसंघ जाहीर झाले तेव्हा टिळक तुरुंगात होते. १९१६ मध्ये टिळकांनी मुस्लिम लीगबरोबर लखनौ करार करून विभक्त मतदारसंघांना मान्यता दिली. या वाटाघाटीत बापूंचा सहभाग नव्हता. स्वत:च्या निर्णयाचे समर्थन करताना टिळकांनी म्हटले होते, ‘कित्येक मान्यवरांना वाटते की, आम्ही मुसलमान बंधूंना अधिक महत्त्व देतो. मी त्यांना सांगू इच्छितो की, स्वशासनाचा अधिकार केवळ मुस्लिमांना बहाल केला गेला तरी माझी हरकत नाही. भारतातल्या कोणत्याही समुदायाला हा अधिकार दिला गेला तरी माझी हरकत नाही. माझ्या या निवेदनात समग्र राष्ट्रीय भावनेचे प्रतिनिधित्व आहे..’ या निखालस धैर्यशाली निवेदनामुळे विरोधक चूप झाले. (संदर्भ: भारत का स्वतंत्रता का संग्राम/ १०) श्यामाप्रसाद मुखर्जीसुद्धा अशा मताचे होते की, स्वतंत्र भारतात मुसलमान वा अन्य धर्मीयांना एखाद्या पक्षात प्रवेश नाकारणे योग्य नाही. सुभाषबाबूंची तक्रार होती की, काँग्रेसमध्ये मुसलमानांना अधिक प्रतिनिधित्व मिळावयास हवे.
गांधीजींच्या हत्येचे प्रयत्न सातआठ वेळा ठराविक गटाकडूनच झाले. हल्ल्याच्या सहा प्रयत्नांची स्पष्ट नोंद आहे. १९२४ साली पुणे महानगरपालिकेने योजिलेल्या त्यांच्या सन्मानप्रसंगी त्यांच्यावर बॉम्ब फेकण्यात आला होता. जुलै १९४४ मध्ये पाचगणीत नथुराम गोडसे सुरा घेऊन त्यांच्यावर धावून गेला होता. सप्टेंबर १९४४ मध्ये गांधीजी महंमद अली जिनांसोबत मुंबईत वाटाघाटी करण्यासाठी वध्र्याहून निघाले तेव्हा मोटारीचे टायर फोडण्याचा बेत आखण्यात आला होता. २९ जून १९४६ रोजी खास ट्रेनने बापू मुंबईहून पुण्याला जात असताना नेरळ-कर्जत दरम्यान रुळांवर दगड ठेवण्यात आले होते. तसेच २० जाने. ४८ रोजी मदनलाल पाहवा याने बॉम्ब फेकला, तर ३० जाने. ४८ रोजी नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केली, या त्या नोंदी!
पाकिस्तानची स्पष्ट मागणी उशिरा झाली, पण त्याचे बीज आधीच पेरले गेले होते. ‘सारे जहाँ से अच्छा’ या प्रसिद्ध गीताचे कवी इक्बाल हे १९२० मध्ये लीगच्या अहमदाबादच्या अधिवेशनात म्हणाले होते की, ‘पंजाब, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर, सिंध व बलुचिस्तान मिळून एक राज्य बनविले, तरच मुसलमानांचे भाग्य उजळेल.’ १९३७ साली जिना म्हणाले, ‘आज हिंदुस्तान एकात्म राष्ट्र आहे, असे मानण्याची चूक आपण करता कामा नये, उलट या देशात मुख्यत: हिंदू व मुस्लिम अशी दोन राष्ट्रे आहेत.’ तसेच १९३७ साली अहमदाबादच्या हिंदू महासभेच्या अधिवेशनाच्या वृत्तांतात स्वा. सावरकरांच्या भाषणात पुढील वाक्याची नोंद मिळते. ‘माझा जिनांच्या दोन राष्ट्रांच्या सिद्धान्ताला विरोध नाही. आम्ही हिंदू स्वत: एक राष्ट्र आहोतच. हिंदू व मुसलमान दोन वेगवेगळी राष्ट्रे आहेत.’ (संदर्भ : इंडियन अ‍ॅन्युअल रजिस्टर १९४३)
गांधीजी व काँग्रेस मात्र हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी धडपडत होते. ५५ कोटींची समस्या हा फाळणीच्या कायदेशीर कराराचा एक भाग होता. १४ जानेवारीला तत्कालीन सरकारने पाकिस्तानला ५५ कोटी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात एकमताने घेतला ज्यात हिंदू महासभेचे श्यामाप्रसाद मुखर्जीही होते. १३ जाने. ४८ ला सुरू झालेले गांधीजींचे उपोषण १६ जानेवारीला सुटले नव्हते. ते शांतता प्रस्थापित करण्यासाठी होते. (संदर्भ : ‘महात्म्याची अखेर’- जगन फडणीस.)
हिंदू राष्ट्रनिर्मितीस बहुसंख्य हिंदूचाही पाठिंबा नव्हता आणि आजही नाही. तरी श्रीरामशरणतेचा प्रयोग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून लोकानुनय करणे चालूच आहे. अजूनही काही उच्चवर्णीयांची मने ‘विष’मतेवर आधारलेल्या समाजव्यवस्थेने बुरसटलेली आहे. गांधीहत्या या संकुचित उद्दिष्टपूर्तीच्या मालिकेचा एक केविलवाणा ‘एपिसोड’ होता.
राजा एस. पाटील