Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
विशेष लेख
(सविस्तर वृत्त)

महाभारत आणि महात्माजी

 

‘एकानं थोबाडीत मारली म्हणून त्याच्या भावाच्या थोबाडीत मारणं मला मंजूर नाही.’ प्रार्थनेनंतरच्या एका भाषणात गांधीजी म्हणाले, ‘नौखालीतल्या हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचं उट्टं बिहारमधल्या मुसलमानांवर अत्याचार करून तिथले हिंदू काढत असल्याचं कळताच मला धक्काच बसला. अशा तऱ्हेने हिंसाचाराचा बदला हिंसाचारानं घेण्यानं कुणाचाही फायदा होणार नाही.’
संध्याकाळची सार्वजनिक प्रार्थना गांधीजी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत करत होते. १९४८ च्या ३० जानेवारीस संध्याकाळच्या सार्वजनिक प्रार्थनेला जात असतानाच त्यांची हत्या झाली. नौखाली आणि बिहारमध्ये अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर म्हणजे १९४६ च्या नोव्हेंबरमध्ये हे उद्गार गांधींनी काढले. ‘पण सूडाचा बदला सूडानं म्हणजे ‘जशास तसं’ वागल्यानं पांडवांचा विजय झाला, असं महाभारतात म्हटलं आहे ना?’- प्रार्थनेला हजर असलेल्या एका तरुणानं जरा तावातावानंच महात्माजींना विचारलं. ‘महाभारताचा लावलेला तो अर्थ मला बरोबर वाटत नाही,’ महात्माजी उत्तरले, ‘बळाच्या जोरावर मिळवलेला विजय, हा खरा विजय नसतोच मुळी, हाच संदेश त्या महाकाव्यानं दिला आहे. पांडवांनी मिळवलेला विजय पोकळ आणि निर्थक होता, हीच महाभारताची खरी शिकवण आहे. एकाच कुळाचे पांडव आणि कौरव आपसात लढले. त्यात दुष्टांचा नाश झाला हे जरी खरं असलं तरी त्या युद्धाचा शेवट काय झाला? पांडवांनी कुणावर राज्य केलं? तर एका स्मशानरूपी देशावरच ना? युद्ध जिंकल्याचा आनंद उपभोगायला किती पांडव शिल्लक राहिले? फक्त सातजण! सूडाचा बदला सूडानं घेतला जाऊ लागला, तर काही दिवसांतच आपल्या देशाची तीच स्थिती होणार आहे.’ या उत्तरानं प्रश्नकर्ता जितका आश्चर्यचकित झाला असेल, तेवढाच प्रत्येक वाचकही होतो. गांधीजींच्या त्या उत्तरानं मीही विचारमग्न झालो. श्री महाभारत ग्रंथ मी वाचायला काढला. कृष्णशिष्टाई यशस्वी झाली असती तर ते युद्ध झालंच नसतं, तेव्हा ते प्रकरण प्रथम काढलं. त्यात म्हटलं होतं : सर्वाची भाषणे झाल्यावर समेटसूत्र पकडून श्रीकृष्ण दुर्योधनाला म्हणाला.. ‘तुला सार्वभौम राजा व्हायचंच आहे ना? तर जरूर हो. पण राज्याचा अल्पसा वाटा पांडवांना दे पण युद्धखोरी सोड.’ हे ऐकताच दुर्योधनाचं डोकं भणभणून गेलं. तो म्हणाला, ‘सगळे मलाच दोष देताहेत.. पांडव द्यूतात हरले हा काय माझा दोष?’’ असं विचारून कृष्णाला तो म्हणाला, ‘राज्यातला काही वाटाच काय पण सुईच्या अग्रावर राहील इतकादेखील पृथ्वीचा भाग पांडवांना मी घेऊ देणार नाही..’ मी भराभरा पानं उलटली.. युद्धाला सुरुवात होणार होती.. श्रीकृष्णाने लवकरच ‘पांचजन्य’ शंखाचा विराट ध्वनी दशदिशांतून घुमवला. अर्जुनाने आपला ‘देवदत्त’ फुंकून युद्धसज्जतेचा इशारा केला.. सैन्याच्या मध्यभागी रथ न्यावा, अशी सूचना अर्जुनाने करताच कृष्णानं योग्य जागी रथ उभा केला.. आजोबा, गुरू, भाऊ, नातू, मामा, मित्र व सोयरे असे सगळे नातेवाईक पाहून अर्जुनाचे विचारचक्र उलटसुलट गरगरू लागले आणि कृष्णाला तो म्हणाला, ‘रक्ताच्या नात्याच्या या साऱ्यांना ठार मारून विजयाचा आनंद मी लुटू काय?’
..‘तुझ्यासारख्या महापराक्रमी वीराला असले पराभूत पळपुटे विचार शोभत नाहीत.’ श्रीकृष्ण म्हणाला, ‘अर्जुना एक लक्षात ठेव. हे धर्मयुद्ध आहे. युद्धाला सामोरे जाणे हा क्षत्रियाचा धर्म होय. युद्धात हिंसा होणारच.’
भगवंतांनी अर्जुनाला अठरा अध्यायी गीता सांगितली तेव्हा कुठे अर्जुनाचे सर्व संशय फिटले आणि युद्धाला सुरुवात झाली. दोन्ही पक्षांचे हजारो सैनिक, शेकडो शूर योद्धे मारले गेले. श्री महाभारतात पुढं म्हटलं होतं, दिवसेंदिवस युधिष्ठिराच्या मनाची उदासीनता वाढतच गेली. तो मनाला विचारू लागला, ‘काय मिळालं एवढा संहार करून? राजवैभव भोगायला मिळालं म्हणून का माझा जीव कासावीस झाला होता?’ असे विचार मनात येत असले तरी त्यानं १५ र्वष राज्य केलं. त्यानंतर धृतराष्ट्र, गांधारी आणि माता कुंती अग्नीत जळून गेली. एका पारध्याच्या हातून कृष्णाची हत्या झाली. स्वर्गाला जायला निघालेले चार पांडव आणि द्रौपदी वाटेत मरण पावली. युधिष्ठिर आणि त्याचा कुत्रा फक्त सदेह स्वर्गाला गेले.
कृष्णशिष्टाई यशस्वी झाली असती तर तो नरसंहार टळला असता. पण ते काही जगातलं शेवटचं युद्ध नव्हतं. त्याहीपेक्षा महाभयंकर महायुद्धं जगात झाली आहेत. बहुतेक सगळी दुसऱ्या पक्षाला अल्पही जमीन न देण्यावरून म्हणजे त्याचा थोडाही अधिकार न मानण्यावरूनच झाली आहेत. बहुतेक युद्धांनंतर विजेत्यांना स्मशानभूमींवर राज्य करावं लागलं आहे. महाभारताचा चुकीचा अर्थ लावल्यावर, आणखी दुसरं काय होणार होतं?
फिरोझ रानडे