Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
विशेष लेख
(सविस्तर वृत्त)

‘आपबीती जगबीती’ आणि गांधीजी

 

भारताच्या स्वातंत्र्यलढय़ात पाच वेळा प्रदीर्घ तुरुंगवास भोगलेले, १९२० ते १९३० या काळात अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य राहिलेले, पंडित नरदेवशास्त्री ऊर्फ ‘रावजी’ हे मूळचे उस्मानाबादचे रहिवासी. नांदेडच्या प्रा. (डॉ.) कुशलदेवशास्त्रींच्या सौजन्याने उपलब्ध झालेल्या नरदेवशास्त्रींच्या ‘आपबीती जगबीती’ शीर्षकाच्या, १९५७ मध्ये हरिद्वारहून प्रकाशित झालेल्या हिंदीतील आत्मचरित्रात, महात्मा गांधींच्या सहवासातील आठवणी, चर्चा, पत्रव्यवहार त्यांनी शब्दांकित केले आहेत. मराठी जगताला अज्ञात राहिलेल्या या इतिहासावर हा दृष्टिक्षेप.

दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर, ज्वालापूरच्या महाविद्यालयाला भेट देऊन महात्मा गांधींनी विद्यार्थ्यांसमोर ‘निर्भयता’ या विषयावर व्याख्यान दिले होते. ‘महाविद्यालयाला विसरू नका’ असा संदेश विद्यार्थ्यांना त्यांनी दिला होता. ‘लखनौ काँग्रेस अधिवेशनात त्यांची पुन्हा भेट झाली होती.. त्यानंतर प्रत्येक ऑल इंडिया काँग्रेस कमिटी बैठकीत आणि राष्ट्रीय महासभेत त्यांचे न चुकता दर्शन होई.. महात्माजींच्या यू. पी. दौऱ्यात, प्रांत प्रतिनिधी म्हणून, १३ दिवस, डेहराडून व सहारनपूर या दोन जिल्ह्य़ात, मला त्यांच्यासोबत राहावे लागले होते.. अशा प्रकारे महात्माजींशी खूप संपर्क राहिला..
***
सीतापूरच्या कॉन्फरन्समध्ये, अहिंसात्मक असहयोगावर, झालेल्या चर्चेचा सारांश-
नरदेव- महात्माजी, आपण म्हणता की, आत्मिक बलाने, अहिंसात्मक पद्धतीने स्वराज्य मिळू शकते. आजपर्यंत अशा प्रकारच्या आत्मबलाने, अहिंसात्मक पद्धतीने पृथ्वीतलावर कुणालाही स्वराज्य मिळाले आहे काय?
महात्माजी- जी गोष्ट पूर्वी कधीही झाली नाही, ती भविष्यातही होणार नाही, असा नियम आहे काय?
नरदेव- भगवान कृष्णचंद्रांनाही तुमची ही अहिंसात्मक पद्धती माहीत नव्हती आणि ज्ञात असती किंवा मान्य असती तर अर्जुनाला, ‘युद्धाला तयार हो’ असा उपदेश त्यांनी का केला असता?
महात्माजी- हे कौरव- पांडवांचे युद्ध नाही, हे युद्ध आहे ‘दैवी’ आणि ‘आसुरी’ या दोन प्रवृत्तींमधील, असे मी मानतो.
नरदेव- मन्वादी धर्मशास्त्रात सहा प्रकारच्या अत्याचाऱ्यांना (अतिरेक्यांना) न विचारताच ठार मारण्याचा आदेश दिला आहे, जसा
‘गुरू वा बालवृद्धौ वा..‘आततायिनं आयान्तं हन्या देव अविचारयन्’ इत्यादी
महात्माजी- त्या वेळची गोष्ट त्यांच्याबरोबर. आज तरी या गोष्टींची आवश्यकताच नाही. वशिष्ठ- विश्वामित्र युद्धाची गाथा हेच माझे ध्येय आहे, किती सुंदर दृष्टान्त आहे. व्यक्तिगत आहे, पण मी त्याचे आचरण समुदायात आणू इच्छितो.
***
एकदा १९२५ साली याच विषयावर नरदेवांनी महात्माजींना पत्र लिहिले होते, त्याचा सारांश असा- ‘जगात क्षत्रिय धर्म राहीलच. आपण प्रवर्तित करीत असलेला अहिंसात्मक असहयोग ब्राह्मणांचा धर्म आहे. क्षात्रधर्म आणि ब्राह्मधर्म सोबतीने चालत आले आहेत. जिथे ‘शास्त्र’, ‘फेल’ (Fail= अयशस्वी) झाले, तिथे ‘शस्त्र’ आलेच म्हणून समजा. महात्मा गांधींनी ‘यंग इंडिया’ व ‘नवजीवन’मध्ये याचे उत्तर दिले आहे.
***
नरदेवांनी जेलमध्ये लिहिलेल्या डायरीत १९.३.१९२२ ला ‘केसरी’तील ‘महात्मा गांधींना पकडले’ हा लेख वाचल्याचा उल्लेख आहे. ‘महात्मा गांधी आदर्शवादी आहेत.. साधू-संतात त्यांची गणना होऊ शकेल.. लोकमान्य टिळकांच्या पश्चात भारताला इतक्या अल्पावधीत इतके पुढे खेचून आणणारा अन्य नेता मिळाला नाही.. महात्मा गांधींचा उद्देश, ‘शान्ति से क्रान्ति’ आहे.. गांधींचे तुरुंगातील दिवस शांततेत जावोत आणि इकडे भारत आपले कर्तव्य समजून घेऊन ‘शान्ति से क्रान्ति कार्यात संलग्न होवो’, अशी प्रार्थना केली आहे.
***
आश्रमाच्या प्रारंभिक दिवसांत गांधीजी प्राय: दररोज रामदास स्वामींचे ‘मनाचे श्लोक’, थोरोंचे ैLife without principles आणि बनियन यांचे Pligrim’s Progress’ वगैरे पुस्तके वाचून त्यावर चर्चा करीत. डॉ. हरप्रसाद देसाई तेथे नित्य उपस्थित राहात’, अशी एक आठवणही नरदेवांनी सांगितली आहे.
***
गांधींनी एके दिवशी सांगितले की, ‘अतिरिक्त शक्तीची इच्छा करू नये, आवश्यकतेपेक्षा जास्त ताकद शरीरात विकार उत्पन्न करते, आत्मशक्तीचा ऱ्हास करते.
‘मी आफ्रिकेत राहत असताना २१ मैल पायी जाऊन वकिली करीत असे. शनिवारी तर ४२ मैलांचा पायी प्रवास होई. पहाटेच उठून रात्रीच बनवून ठेवलेल्या रोटय़ा आणि लिंबाचे लोणचे मी सोबत बांधून घेई. वाटेवरच्या तलावात स्नान करून ऑफिसला पोहोचल्यानंतर कामात व्यग्र होऊन जाई. इतर दिवशी संध्याकाळी गाडीने परत येत असे, पण शनिवारी मात्र जाणे व येणे मिळून ४२ मैलांचा पायी प्रवास होई. जेवढी आवश्यक तेवढीच शक्ती शरीरात असण्याची इच्छा करावी, आवश्यकतेपेक्षा जास्त शक्ती शरीरात नको’, असे गांधी म्हणाले होते, अशी आठवण त्यांनी लिहून ठेवली आहे.
***
विद्यार्थ्यांच्या निवडणुकीच्या काळात ज्वाला महाविद्यालयात महात्मा गांधी थांबलेले असतानाची आठवण नरदेवांनी सांगितली आहे-
निवडणुकीतील गोंधळ त्यांच्या कानावर गेला होता. तेव्हा महात्माजी म्हणाले होते, ‘सामाजिक जीवन मोठे विचित्र आहे. सांभाळूनच पावले टाकली पाहिजेत. विलायतेत मुले एक खेळ खेळतात. जिवंत माशीला पकडून तिच्या शरीरात सुया टोचवतात. माशीने पंख फडफडवले की आनंदाने पाहत बसतात. जनताही कधी कधी कार्यकर्त्यांची हीच दशा करून टाकते. सावधान राहा.’
***
‘डेहराडून, हरिद्वार येथून कुणीही व्यक्ती त्यांना भेटली की ते त्यांच्याकडे माझ्याबाबत चौकशी करायचे. महात्मा गांधींची माझ्यावर नेहमीच कृपादृष्टी राहिली..’- नरदेवांनी लिहून ठेवले आहे. महात्मा गांधींबद्दल ‘कहाँ तक लिखें- लिखें तो ग्रंथ तैयार होगा’, असे लिहून, नरदेवांनी महात्मा गांधींच्या आठवणींचा समारोप केला आहे.
अशोक शिरसीकर