Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३० जानेवारी २००९

विशेष लेख

गांधीहत्येचा प्रवास..
स्वातंत्र्यानंतरही सर्वसामान्यांच्या मनात जातीधर्माचा आधार घेत विद्वेष भिनवण्याचे काम काही शक्ती अविरतपणे करीत आहेत. विचारांची लढाई विचारांनी लढावी, हे सूत्र नाकारत ते व्यक्तिद्वेषातून हत्येचा आधार घेतात व विचार संपविण्याचा प्रयत्न करतात. ही धर्माध मंडळी इतिहास विपरीत स्वरूपात मांडतात. गैरसोयीची ठरणारी इतिहासातील पाने पुसतात. अशाच मनोवृत्तीने ३० जानेवारी १९४८ला महात्मा गांधींची हत्या करण्यात आली. ही हत्या ज्या नथुराम गोडसेने केली तो एक व्यक्ती नव्हता, तो विद्वेषाचे राजकारण करणाऱ्या शक्तींचा प्रतिनिधी होता. गांधीहत्येनंतर महात्म्याचे विचार संपतील हा धर्माधांचा भ्रम होता. आजही जग गांधीवादाच्या मार्गाने चालले आहे. महात्मा गांधींच्या हत्येची कारणे खोटी होती हे इतिहासाच्या दाखल्यांवरून सिद्ध होते.
गांधीजींच्या हत्येचा प्रयत्न १५ वेळा झाला. त्यातील दोन हल्ले तर नथुराम गोडसेनेच केले होते. त्यामागचे एक कारण मुस्लिमांचे तुष्टीकरण व दुसरे ते फाळणीला जबाबदार होते, असे सांगण्यात आले; पण द्विराष्ट्र ही मुस्लिम लीग व हिंदू महासभेची मागणी होती.

गांधीहत्या : संकुचित उद्दिष्टपूर्तीच्या मालिकेचा विकृत एपिसोड
न्यूयॉर्कमध्ये गांधीजींचा पुतळा बसविण्याला सर्वाधिक विरोध भारतीयांनीच केला होता. गांधींना स्वहितासाठी वापरून घ्यायचे आणि त्यांच्या मूल्यांची मात्र हत्या करायची, असे चालले आहे. एका कवीने म्हटल्यानुसार, ‘बरं झालं गांधी, तू तेव्हा मरून गेलास नाही तर आज तुला रोज मरावं लागलं असतं.’ मध्यंतरी मिरजेतील एका शिक्षण संस्थेत बोलताना शरद पोंक्षे (‘मी नथुराम बोलतोय’चा नायक) ने पूज्य गांधीजींची हत्या हे नथुरामच्या देशभक्तीचे कृत्य होते, असे म्हटले होते.

महाभारत आणि महात्माजी
‘एकानं थोबाडीत मारली म्हणून त्याच्या भावाच्या थोबाडीत मारणं मला मंजूर नाही.’ प्रार्थनेनंतरच्या एका भाषणात गांधीजी म्हणाले, ‘नौखालीतल्या हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचं उट्टं बिहारमधल्या मुसलमानांवर अत्याचार करून तिथले हिंदू काढत असल्याचं कळताच मला धक्काच बसला. अशा तऱ्हेने हिंसाचाराचा बदला हिंसाचारानं घेण्यानं कुणाचाही फायदा होणार नाही.’ संध्याकाळची सार्वजनिक प्रार्थना गांधीजी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत करत होते. १९४८ च्या ३० जानेवारीस संध्याकाळच्या सार्वजनिक प्रार्थनेला जात असतानाच त्यांची हत्या झाली.

‘आपबीती जगबीती’ आणि गांधीजी
भारताच्या स्वातंत्र्यलढय़ात पाच वेळा प्रदीर्घ तुरुंगवास भोगलेले, १९२० ते १९३० या काळात अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य राहिलेले, पंडित नरदेवशास्त्री ऊर्फ ‘रावजी’ हे मूळचे उस्मानाबादचे रहिवासी. नांदेडच्या प्रा. (डॉ.) कुशलदेवशास्त्रींच्या सौजन्याने उपलब्ध झालेल्या नरदेवशास्त्रींच्या ‘आपबीती जगबीती’ शीर्षकाच्या, १९५७ मध्ये हरिद्वारहून प्रकाशित झालेल्या हिंदीतील आत्मचरित्रात, महात्मा गांधींच्या सहवासातील आठवणी, चर्चा, पत्रव्यवहार त्यांनी शब्दांकित केले आहेत. मराठी जगताला अज्ञात राहिलेल्या या इतिहासावर हा दृष्टिक्षेप.