Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३० जानेवारी २००९

विविध

पब संस्कृतीवरून तीनतिघाडा!
नवी दिल्ली, २९ जानेवारी / पी.टी.आय.

कर्नाटकातील मंगलोर येथे पबवर झालेल्या हल्ल्यानंतर पब संस्कृतीवरून तीन राज्यांचे मुख्यमंत्री तीन दिशांनी गेले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनी राज्यात पब संस्कृतीवर बंदी घालण्याचे सूतोवाच केले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या वादापासून स्वत:ला दूर राखण्याचा प्रयत्न केला आहे तर दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी मुलामुलींना पबमध्ये एकत्र येण्यात काहीही गैर नसल्याची भूमिका घेतली आहे.

‘बांगलादेशी’ हिंदू कुटुंबाची सुरू आहे कुचंबणा..
केंद्रपाडा(ओरिसा) २९ जानेवारी/ पीटीआय

बांगलादेशी म्हणजे विशिष्ट धर्माचे, असाच सार्वत्रिक समज. त्यातूनच बांगलादेशींना भारतातून हद्दपार करण्याची मागणी तारस्वरात केली जाते. ओरिसातील महाकालपाडा या किनारपट्टीच्या गावात मात्र एका बांगलादेशी पण हिंदू कुटुंबाची विचित्र कोंडी झाली आहे. दहाजणांच्या या कुटुंबात काहीजणांना भारतीय नागरिकत्व लाभले आहे तर काहीजणांची नोंद बांगलादेशी अशी आहे.

भाजपच्या लाचखोर आमदाराला अटक
बंगलोर, २९ जानेवारी / पी.टी.आय.

भूखंड वादाशी संबंधित प्रकरणाची पोलीस फाईल बंद करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेणाऱ्या वाय. समपानगी या भाजप आमदाराला अटक झाल्याने कर्नाटकात नुकतीच सत्ता मिळवणाऱ्या भाजपला जबर धक्का बसला आहे. पन्नास हजार रुपयांची रोख आणि साडेचार लाखांचा धनादेश एका व्यावसायिकाकडून स्वीकारताना त्यांना निवासस्थानीच रंगेहाथ अटक झाल्याची माहिती लोकायुक्त न्या. एन. संतोष हेगडे यांनी दिली. समपानगी यांच्याविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून याची माहिती विधानसभाध्यक्ष जगदीश शेट्टार यांना देण्यात आली आहे. कर्नाटक लोकायुक्तांच्या आजवरच्या इतिहासात एखाद्या आमदाराला लाच घेताना अटक होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. मात्र, आमदाराविरुद्ध खटला चालवण्यासाठी विधानसभाध्यक्षांची परवानगी लागते.

विसुआमाडु शहरावर श्रीलंका लष्कराचा ताबा
कोलम्बो, २९ जानेवारी/पी.टी.आय.

श्रीलंका लष्कराने तामिळी अतिरेक्यांचा अखेरचा तळ असलेल्या विसुआमाडु शहरावर पूर्णपणे ताबा मिळविला आहे. हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या छत्रछायेत सैनिकांनी आगेकूच करीत ही मोहीम फत्ते केली. अतिरेक्यांच्या अनेक नौका व पाणबुडय़ाही हस्तगत झाल्या आहेत. या भागात शोधमोहीमही जोरात आहे. महत्त्वाच्या रस्त्यांवरही लष्कराने ताबा मिळविला आहे. अतिरेक्यांनी उद्ध्वस्त केलेल्या १४० फुटी कलमधुकुलम पुलाचीही फेरबांधणी केली गेली आहे. गेल्या तीन वर्षांत श्रीलंकेतील धुमश्चक्रीत ३७०० सैनिक मृत्युमुखी पडले तर १३ हजार अतिरेक्यांना टिपण्यात यश आले, असे लष्कराने जाहीर केले आहे.

फिजाचा आत्महत्येचा प्रयत्न
चंदिगढ, २९ जानेवारी/पीटीआय

दोनच महिन्यांपूर्वी हरियाणाचे माजी उप-मुख्यमंत्री चंदर मोहन यांच्याशी विवाह केलेल्या फिजाने काल आपल्या पतीचे अपहरण झाले असल्याचे पत्रकारांना सांगितले. नंतर तिने मोहाली येथील आपल्या घरी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. फिजाशी विवाह करण्यासाठी चंदर मोहन याने धर्मातर केले व चांद मोहम्मद हे नाव धारण केले. चंदरमोहन यांना मंत्रिपदही गमवावे लागले होते. त्यांच्या प्रेमकहाणीने आणखी एक नवे वळण घेतले. आपल्या पतीचे अपहरण झाल्याचे फिजाने काल साश्रू नयनांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नंतर रात्री झोपेच्या गोळ्यांचा मोठा डोस घेतला. सकाळी तिला अज्ञात इसमाने रुग्णालयात दाखल केले. आता तिची प्रकृती सुधारत असून पंजाब पोलिसांनी तिच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

दिल्लीत विमान वाहतुकीला धुक्याचा फटका
नवी दिल्ली, २९ जानेवारी / पी.टी.आय.

दाट धुक्याचा फटका दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील २०० विमानांना बसला. धुक्यामुळे देशांतर्गत आणि विदेशातील १०३ विमानांच्या उड्डाणाच्या वेळा बदलवाव्या लागल्या, सहा विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले तर अन्य २२ विमानांचा मार्ग वळवावा लागला. उर्वरित विमानांच्या उड्डाणाला विलंब झाला. दाट धुक्यामुळे सकाळी साडेसात ते नऊ चाळीस अशा दोन तासांहून अधिक काळ विमानतळावर काहीही दृष्टोत्पत्तीस पडत नव्हते. त्यामुळे २२ विमाने अन्यत्र वळविण्यात आली. या काळात एकही विमान उतरलो नाही तसेच उड्डाण करू शकले नाही असे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले.