Leading International Marathi News Daily
शनिवार, ३१ जानेवारी २००९

इतिहासातील गोष्टींकडे स्त्रीवादी दृष्टिकोनातून बघून त्यांचे तसे विश्लेषण करण्यात उमा चक्रवर्ती यांचा हातखंडा आहे. त्यांचे चळवळ व अभ्यासकेंद्र यांच्याशी घट्ट नाते आहे. वेळप्रसंगी त्या रस्त्यावर लढय़ासाठी उतरण्यासही मागेपुढे बघत नाहीत. एक इतिहासकार म्हणून त्या श्रेष्ठ आहेतच ; चळवळीतील कार्यकर्त्यांनाही त्या आपल्या वाटतात..
नुकतेच मुंबई विद्यापीठाच्या स्त्री-विकास कक्ष आणि यूएनडीपी पुरस्कृत सेंटर फॉर ह्युमन डेव्हलपमेंट, अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय स्तरावर ‘जेंडर अ‍ॅण्ड कास्ट : इंटरफेस अ‍ॅण्ड इश्यूज’ (लिंगभाव आणि जात : व्यामिश्रता व मुळे) या एका सेमिनारचे आयोजन केले होते. या सेमिनारच्या बीजभाषणासाठी डॉ. उमा चक्रवर्ती यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे व्याख्यान नेहमीच विचार करण्यासाठी नवे मुद्दे देऊन जाते. याही वेळेस समजून घेण्यास आणि विचार करण्यासाठी भरपूर नवीन मुद्दे मिळाले.
उमा चक्रवर्ती यांनी प्राचीन इतिहासाचे स्त्रीवादी विश्लेषण केलेले वाचनात आले आहे. त्या म्हणतात त्याप्रमाणे स्त्री-मुक्ती चळवळीतून स्त्रीवादी अभ्यासक्रम अथवा स्त्रियांविषयी माहिती गोळा करण्याची निकड उत्पन्न झाली. या स्त्री-अभ्यासात प्रामुख्याने
 

समाजशास्त्रज्ञ- अर्थशास्त्रज्ञ स्त्रियांचा सहभाग होता. इतिहासतज्ज्ञ अभ्यासकांमध्येही स्त्रीवादी अभ्यासक कमीच आहेत. इतिहासातील गोष्टींकडे स्त्रीवादी दृष्टिकोनातून बघून त्यांचे तसे विश्लेषण करण्यात उमा चक्रवर्ती यांचा हातखंडा आहे.
जाती विषमतेप्रमाणेच लिंगसापेक्ष विषमताही स्त्रियांवर लादलेली असते. त्यातून स्वत:ची सुटका करून घेऊन जुन्या माहीत असलेल्या गोष्टींकडे नव्या नजरेने पाहण्यात वेळ जातो व नवीन सुरुवात करण्यासाठी तर नवा रस्ता बनवायचा असतो. अर्थात ती नजर प्राप्त झाली की फक्त स्त्रीविषयकच नाही, तर अनेक विषमतांचे भान येते. उमा यांना ते आलेले त्यांच्या लिखाणावरून स्पष्ट दिसून येते. त्यांच्या काही पुस्तकांची नावे पाहा- ‘एव्हरीडे लाईव्ज’; ‘एव्हरीडे हिस्टरीज बियाँड द किंग अ‍ॅण्ड ब्राह्यणस ऑफ एनशंट इंडिया’, ‘जेन्डरिंग कास्ट : थ्रू फोमिनिस्ट लेन्स’; ‘श्ॉडो लाइव्ज - रायटिंग्ज ऑन विडोहूड’; ‘फ्रॉम मिथस् टु मार्केटस्’; ‘एसेज ऑन जेंडर’; सोशल डायमेन्शन्स ऑफ अर्ली बुद्धा’; ‘रिरायटिंग हिस्टरी - द लाइफ अ‍ॅण्ड टाइम्स ऑफ पंडिता रमाबाई’. यातील काही पुस्तके त्यांनी संपादित केली आहेत. त्यांनी लेख तर अनेक लिहिले आहेत.
त्यांच्या लिखाणातून काही मुद्दे स्पष्टपणे अधोरेखित होतात. स्त्रियांची विषमता समान नसते, तर जातीप्रमाणे उतरंडीची असते. म्हणजे प्रत्येक जातिविषयक लिंगसापेक्ष विषमतेचा अभ्यास करून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जातीचा अभ्यास करणारे फक्त जातीचा अभ्यास करतात व लिंगभावाचा अभ्यास करणारे फक्त त्याचा. या अभ्यासात समन्वय असणे आवश्यक आहे.
स्त्री ही पुनरुत्पादक शक्ती असल्याने तिने तिच्या फक्त जातीत नाही, तर उपजातीत राहणे आवश्यक आहे, अशी समाजाची अपेक्षा असते. म्हणूनच भारतात प्रेमकथा फार दु:खांतांच्या आहेत. शिरी-फरहाद, सोहनी-महिवाल, हीर-रांझा, वगैरे. आपला मुद्दा अधिक स्पष्ट करताना त्यांनी, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’चे उदाहरण दिले. काजोलच्या वडिलांनी कन्यादान केल्याशिवाय शाहरुख तिच्याशी लग्न करायला तयार नसतो. या उपजातीही कठोरपणे सांभाळण्यामागे जमीन व संपत्तीवरील आपला अधिकार आपल्याच ताब्यात ठेवण्याचीही भूमिका असते. हे एकदा समजून घेतले म्हणजे जर जाट मुलीने दलित मुलाशी लग्न केल्यावर त्यांना ठार मारण्यामागची भूमिका कळू शकते. कारण दलित जावयाने मुलीच्या नावावर जमिनीतील हिस्सा मागितला तर? गावगाडय़ात ज्याच्याजवळ जमीन तो वरचढ, व भूमिहीन हा सत्ताहीनही. जमीन, जात व वर्ग ही अशी व्यामिश्र गुंतागुंत झाली आहे. म्हणूनच त्यांना त्या ‘क्लास्ट’ असे म्हणतात. क्लास+ कास्ट!
हेच त्यांचे महत्त्वाचे विवेचन ब्राह्मणी पुरुषप्रधानतेविषयी आहे. आजचे प्रश्न समजून घेण्यासाठी कर्मकांडी शुद्धतेपेक्षा त्यात गुंतलेले ऐहिक प्रश्न कसे असतात, हे त्यांच्या विवेचनातून कळून येईल.
स्त्री-अभ्यास हा चळवळीची गरज म्हणून सुरू झाला. त्यामुळे चळवळ व अभ्यासकेंद्र यांचे घट्ट नाते आहे. अभ्यास केंद्रातील मंडळी, स्त्री-चळवळीप्रमाणेच सर्व उपेक्षितांच्या लढय़ांशी आपले नाते मानतात. उमा चक्रवर्तीही वेळप्रसंगी रस्त्यावर लढय़ासाठी उतरण्यात मागेपुढे बघत नाहीत. एक इतिहासकार म्हणून त्या श्रेष्ठ आहेतच; परंतु चळवळीतील कार्यकर्त्यांना त्या आपल्या वाटतात, आपल्यापैकी एक वाटतात.
चक्रवर्ती आडनावामुळे त्यांना अनेकदा बंगाली समजले जाते; परंतु त्या दाक्षिणात्य आहेत. त्यांचे शिक्षण दिल्ली व बंगळुरू येथे झाले आहे. १९६६ ते १९९८ पर्यंत त्यांनी दिल्ली येथील मिरांडा हाऊस या कॉलेजात इतिहास हा विषय शिकवला. याच अवधीत त्यांना जे. पी. नाईक विशेष व्यक्ती पुरस्कार मिळाला. १९९८ साली त्यांनी व्ही. आर. एस. घेऊन स्वत:ला पूर्ण वेळ संशोधन कामात झोकून दिले. लाहोर येथील स्त्री-अभ्यास संस्थेत त्या पाहुण्या प्राध्यापक आहेत. त्यांचे साधे परंतु अभिरुचीपूर्ण व्यक्तिमत्त्व पाहणे व स्पष्ट रोखठोक विवेचन ऐकणे हा आनंदाचा भाग असतो. दिल्लीकरांच्या भाषणात येते तशी मधून मधून सहज येणारी हिंदी भाषा त्या भाषणाला सहजता देते. त्यांना खंत आहे की, अजूनही इतिहासात स्त्री-वादी दृष्टिकोन ठेवून फारसे काम झालेले नाही. प्राचीन इतिहासावर त्यांचे प्रभुत्व आहे. परंतु मध्ययुगीन व वसाहतवादापूर्वीच्या इतिहासावर फारसे कुणी काम केलेले नाही. बऱ्याच मोठय़ा कालखंडाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे, असे त्यांना वाटते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक हात पुढे येवोत, ही इच्छा.
वासंती दामले
vasantidamale@hotmail.com