Leading International Marathi News Daily
शनिवार, ३१ जानेवारी २००९

हुरडा हा महाराष्ट्रभर अगदी जिव्हाळ्याचा विषय. विदर्भात तर अधिकच! आता हुरडा पार्टीचं स्वरूप बदललंय. हे नवं स्वरूप उसासे टाकत सांगण्यासारखं नसून ‘वा! याव्वं!’ करत सांगण्यासारखं आहे. पूर्वी फक्त शेतात रंगणारी हुरडा पार्टी आता रिसॉर्टवरही साजरी होते. पर्यटन कंपन्याही हुरडा पार्टीसाठी खास सहली काढतात. विदर्भातल्या हॉटेलांच्या मेन्यूकार्डवर ‘हुरडा-थाली’ही जागा पटकावते. क्वचित कुठे ‘बार्बेक्यू’च्या नावाखालीदेखील अभिनव हुरडा-पार्टी रंगते!
यंदा म्हणावी तशी थंडी ‘पडलीच’ नाही! थंडीचं हे ‘पडणं’ खास वऱ्हाडी असलं की अस्सल हुरडय़ाची चव जीभेवर रेंगाळायला लागते. कडकड दात वाजायला लावणारी थंडी सुरू झाली की शहरातदेखील रस्त्याच्या कडेला शेकोटय़ा पेटतात. गावातली मजा तर अफलातूनच! घराघरातून छोटय़ा कोळशाच्या शेगडय़ांवर चक्क हात-पाय ‘शेकले’ जातात. अख्खं घर कोंडाळं करून त्या
 

शेगडीभोवती जमा होतं. या उबेला जी ‘माया’ असते ती ‘हीटर’च्या गर्मीला नसते! शहरात अगदी उच्चभ्रूंकडेदेखील कोळशाची शेगडी दिमाखात विराजमान झालेली वऱ्हाडाने अनुभवली आहे. या वर्षी मात्र गायब होती. तरीदेखील जेवढी थंडी वाटय़ाला आली त्यातच ‘हुरडय़ा’साठी जीवाचं ‘रान’ करत हुरडाप्रेमींनी तृप्ततेची ढेकर दिली.
हुरडा हा महाराष्ट्रभर अगदी जिव्हाळ्याचा विषय. विदर्भात तर अधिकच! इथे डिसेंबरमध्ये विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचे वारे सुरू झाले की, समजायचं ‘हुरडा पार्टी’ची वेळ जवळ आली आहे! ही हुरडा पार्टी राजकारण्यांनादेखील मतभेद विसरायला लावून दोन घटका ‘माणसांत’ आणते. एकमेकांच्या शेतात हुरडा पार्टीचे बेत ठरविण, हा अधिवेशन काळातला महत्त्वाचा ‘अजेन्डा’ असतो.
काळ बदलला तसं हुरडा पार्टीचं स्वरूप बदललंय. परंतु आनंदाची गोष्ट अशी की, हे नवं स्वरूप उसासे टाकत सांगण्यासारखं नसून ‘वा! याव्वं!’ करत सांगण्यासारखं आहे. हुरडा पाटीचं अप्रूप जुन्या-जाणत्या पिढीपासून आताच्या तरुणताईपर्यंत सर्वानाच वाटतं, यात शंका नाही! आज नव्या पिढीला शेती दिसणं दुरापास्त झालंय, तिथे हिरव्याकंच रिसॉर्टस्मध्ये जर मेन्यूकार्डवर ‘हुरडा-थाली’ दिसली, तर त्याचं कौतुकच व्हावं!
आता हुरडय़ाला चकाचक स्वरूप लाभलंय. ‘फार्म हाऊस पार्टी’ ही नवी संकल्पना जोमाने रुजतेय. पूर्वी डिसेंबर-जानेवारीत ज्वारीची कोवळी कणसं दिसू लागली की, हुरडा पार्टीची तयारी सुरू व्हायची. घरच्या दूध-दुभत्याचं घट्ट चविष्ट दही, कोवळा लुसलुशीत हुरडा, गडी माणसांनी तयार केलेली भट्टी, छानशी शेकोटी, वांगे, बटाटे, कांदेदेखील या भट्टीच्याभोवती जमा झालेले, तिखट चमचमीत चटणी, कच्चे तेल, लसणाची फोडणी, कोवळा पातीचा कांदा असा थाट हुरडा पार्टीसाठी सजला की, क्षेत्रातला वारादेखील आनंदाने इकडून-तिकडे उंडारायचा! झकास सूर्यप्रकाश पडलेला असला तरी हुरडा पार्टी रंगायची आणि कोणी रात्रीची पार्टी करायची ठरवली तरी शेत गजबजून जायचं!
मावशीकडे सेलूच्या शेतावर जमिनीपासून शेंडय़ापर्यंत लगडलेल्या पपईच्या झाडांच्या बाजूला जेव्हा मातीचं माठ भरभरून दही जमा व्हायला सुरुवात व्हायची, तेव्हा परमेश्वराने हुरडा खायलाच जणू आपल्याला जन्माला घातलाय या सुखद विचाराने असा काही आनंद मिळायचा की बस! आता शेती कमी झाली आणि रिसॉर्टस्नी त्यांची जागा घेतली. बालपणी शेतात खाल्लेला हुरडा आता तरुणपणी ‘फार्म हाऊस’वर खायला मिळतोय. औरंगाबाद, पुणे, सातारा, नगर रोड अशा कित्येक ठिकाणी खास हुरडय़ाच्या दिवसांत रिसॉर्टस् सजवली जातात.
औरंगाबादचा ‘हिरण्य हुरडा’ तर जगप्रसिद्ध! देश-विदेशातली पर्यटक मंडळी वेरुळ बघून हिरण्य-हुरडय़ात ‘टू प्लेट्स हुरडा विथ ओनियन’ अशी ऑर्डर देतात, तेव्हा जानेवारी महिना सफल झाला समजायचं. कोवळा हुरडा किलोने मिळतो. सोमवार बाजार लागला की, कोवळ्या गोड (खरं तर हुरडय़ाचं वर्णन शब्दातीत आहे. गोड हा फार ढोबळ शब्द झाला!) हुरडय़ाच्या टोपल्या घेऊन आजूबाजूच्या खेडय़ांतून बायाबापडय़ा हजर होतात आणि मग घरच्याघरीदेखील हुरडा पार्टी रंगात येते. तरी हुरडा हा डायनिंग टेबलवर बसून छोटय़ा गॅस शेगडीवर भाजून खाण्याचा प्रकारच नाही, हे राहून राहून वाटतं आणि कदाचित हीच भावना हॉटेल्सवाल्यांच्याही मनात असावी. म्हणूनच मग रिसॉर्टवाले खास झोपडी उभारून, गोवऱ्यांची चूल तयार करून साग्रसंगीत हुरडा पार्टीचा सीन तयार करतात.
तरी शेतात बसून हुरडा खाणं हा स्वर्गीय आनंद असतो आणि ‘कृषीपर्यटन’ या पर्यटनाच्या नव्या दालनाने तोही सादर केला आहे. कित्येक गावातून, शहरातून ‘कृषीपर्यटन’ हा मस्त पर्याय हळूहळू का होईना, परंतु उपलब्ध होतो आहे. नागपूरला तर याची केव्हाच सुरुवात झालीय. पुण्याला, औरंगाबादला, सोलापूर, नगरलादेखील याची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे.
नागपूरच्या मेघना वाहोकर आणि गौरी शास्त्री-देशपांडे या दोघींनी ‘मृद्गंध’ या नावाने अफलातून हुरडा पार्टीची संकल्पना साकारली आहे. ‘मृदगंध’ हाही कृषी पर्यटनाचे नवे दालन. प्रचंड मोठी मस्त शेती! हिरवीगार मेथी, पालक, मुळा, वांगी, टोमॅटो यांनी बहरलेलं शेत! दुसरीकडे संत्र्याची बाग, दूर तिकडे कापूस आणि तूर आपली वाट बघत बसलेला! आणि त्यांच्यापर्यंत पोहोचताना बोराचे काटे वाचवायचे की, काटय़ांची पर्वा न करता खाली पडलेल्या आंबट-गोड बोरांचा सडा वेचायचा- हा प्रश्न पडतो! पिवळा धम्म टपोरा गुलाब लालचुटूक गुलाबाकडे बघत आपल्याला शेतातून वाट दाखवत असतो. शेंगा कधीही तोडून तोंडात टाकता येतात आणि अशातच गडीमाणसं बोरांच्या झाडाखाली झकास हुरडा पार्टीची तयारी करतात. हुरडय़ाची कोवळी कणसं शेणाच्या गोवऱ्यांवर भाजायची. ही कणसं भाजत असतांना त्यांच्या सोबतच कांदा, बटाटा, वांगी पण भाजली जातात. भाजलेली कणसं कसलेल्या हातांनी मळली जातात. आणि मग हे कोवळे गोड चवदार दाणे, तीळ, दाणे किंवा लसूण चटणी, तळलेली मिरची, दही किंवा ताक, कांदा भाजलेली वांगी, मस्त लसणाची फोडणी यांच्यासोबत बशी भरभरून खायचे! झाडांना दोरीचे झोपाळे, छोटय़ा-छोटय़ा कोंबडय़ांचं इकडून-तिकडे पळणं गायी-गुरांचा तृप्त गोठा, आपले गुंजासारखे डोळे टुकटुक फिरवत उडय़ा मारणारे ससुले आणि गरमागरम भाजी-झुणका, भरीत, भजे, कढी, गाजर हलवा आणि अजून खूऽप काही असं मस्त जेवण शेतातल्या मातीत पाय पसरून घेतल्यावर मग झुळझुळणाऱ्या वाऱ्याने तजेलदार व्हायचं. विहिरीवर जाऊन पाण्याचा हबका तोंडावर मारायचा आणि निघायचं बैलगाडीतून शिवार फेरीवर! अशी धमाल येते!
मेघना वाहोकरांना आताच्या पिढीलाच नाही तर जुन्या पिढीलादेखील मातीशी घट्ट बांधून ठेवण्याचा अनुभव द्यायचा आहे. मस्त मनमोकळं शिवार सगळ्यांनी अनुभवावं, लहानग्यांनी मृद्गंधाची अनिवार ओढ लावून घ्यावी आणि ही संस्कृती टिकून राहावी, वाढत जावी या इच्छेपोटी हा कृषीपर्यटनाचा प्रयोग त्यांनी सुरू केला.
या हुरडा-पार्टीच्या रंगतदार कार्यक्रमाची अशी काही झिंग चढते की, बस्स. काही जण ढोलकी आणतात, मनसोक्त नाचतात. मात्र यात कोणीही मर्यादांचं उल्लंघन करू नये, ही कडक अन् वाजवी अपेक्षा असते. कित्येक शेतांवर आता कृषीपर्यटनाच्या अंतर्गत ‘फूड कॉर्नर’ ही सजवला जातो. मानव मंदिर (फेटरी गावाजवळ, नागपूर जिल्हा) इथे माफक किमतीत ताजी भाजी मिळते. आपणच शेतातून भाजी तोडायची आणि विकत घ्यायची, याची मजाच न्यारी!
‘बार्बेक्यू’च्या नावाखालीदेखील अभिनव हुरडा-पार्टी रंगते! बार्बेक्यू म्हटलं की, आधुनिक वाटतं आणि ते नव्या पिढीला चटकन उमगतं!
आता बडय़ा व्यापारी रिसॉर्टमध्ये काही ठिकाणी हुरडा पार्टीत उंची मद्याच्या साथीला ‘डीजे’ची धूम असते. परंतु अशा हुरडा-पार्टीविषयी प्रतिकूल मतंही वाचली. ‘शेतातल्या वाऱ्याचं गाणं, गायीचं हंबरणं, कोंबडय़ाचं कुकूचकू आणि ढोलकीची साथ, गोवऱ्यांची ऊब आणि हुरडय़ाची चव- हीच खरी हुरडा-पार्टी! तिथे डीजेची धूम हे ‘मिस-मॅच’ आहे,’ अशा प्रतिक्रिया वाचून प्रकर्षांने जाणवलं, जे जातिवंत अस्सल आहे ते टिकणारच! वाणीचा हुरडा भले कमी मिळायला लागला असेल, परंतु ‘लाँग लिव्ह हुरडा पार्टी’ हे स्पिरिट मात्र चौफेर आहे!
सोनाली कोलारकर-सोनार
sonalikolarkar@hotmail.com