Leading International Marathi News Daily                                शनिवार, ३१ जानेवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

व्यापार - उद्योग

क्रीडा

अग्रलेख

ग्रंथविश्व

त्रिकालवेध

लोकमानस

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांत


निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

सत्यम: सट्टेबाजीला ऊत, अनेकांचे हात ओले!
सचिन रोहेकर
मुंबई, ३० जानेवारी
राजू बंधू प्रवर्तकांच्या कृष्णकृत्यांनी सत्यम कॉम्प्युटर या नावाजलेल्या कंपनीला भाकड बनविले असले तरी या कंपनीचा शेअर मात्र अनेकांसाठी दुभती गाय बनला आहे. सत्यम महाघोटाळ्यात कुणाकुणाचे हात गुंतले आहेत हे स्पष्ट होण्यापूर्वीच, कंपनीच्या शेअर्समध्ये सध्या सुरू असलेल्या सट्टय़ात मात्र अनेकांचे हात ओले होत आहेत. ऑफिसमधील डेस्कपासून ते ब्रोकर्सच्या बोल्टपुढे आणि ब्लॉग्जवरील ऑनलाइन चर्चा व टिकाटिप्पणीत सत्यमच्या शेअर्सला मिळणाऱ्या आजच्या व भविष्यातील भावावरच केवळ चर्चा सुरू नसून, या प्रकरणी ‘सेबी’च्या भूमिकेबाबतही सवाल उपस्थित केले जात आहेत.

तुंबडय़ा भरणाऱ्या उच्चपदस्थांवर ओबामा संतापले!
वॉशिंग्टन, ३० जानेवारी/पी.टी.आय.

वॉल स्ट्रीट कंपन्यांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सध्याच्या मंदीच्या काळातही तब्बल १८ अब्ज अमेरिकी डॉलरचा बोनस आपल्याला वाटून घेतल्याबद्दल नवे अध्यक्ष बराक ओबामा यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली असून हे कृत्यच घृणास्पद असल्याचा कडाडून हल्ला चढविला आहे. जेव्हा करदाते सर्वसामान्य नागरिक अडचणीत आहेत आणि त्यांना जेव्हा आर्थिंक शिस्तीचे धडे दिले जात आहेत अशा वेळी या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोनसच्या नावाखाली स्वत:च्या तुंबडय़ा भरून घेणे हे कृत्यच अक्षम्य आणि निंदनीय असल्याचे ओबामा यांनी म्हटले आहे.

चौकशीसाठी केंद्राने आयोग नेमावा
अडवाणी यांची मागणी
नवी दिल्ली, ३० जानेवारी/खास प्रतिनिधी
मुंबईवर २६ नोव्हेंबर रोजी झालेलाभीषण दहशतवादी हल्ला करणारे अतिरेकी कुठून व कसे आले, याचा शोध घेण्यासाठी केंद्रातील युपीए सरकारने चौकशी आयोग नेमावा, अशी मागणी आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली. गेटवे ऑफ इंडिया ते इंडिया गेट हे अंतर सायकलने पूर्ण करून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना आगळीवेगळी श्रद्धांजली वाहणारे विख्यात सायकलपटू विनोद पुनमिया यांचे दिल्ली आगमनप्रसंगी आपल्या निवासस्थानी स्वागत करताना अडवाणी बोलत होते.

सायकलपटू विनोद पुनमियांचे उदाहरण प्रेरणादायी ठरावे: राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील
गेटवे ऑफ इंडिया ते इंडिया गेट ‘व्हिल टू हिल’ मोहीमेचा राष्ट्रपती भवनात समारोप

नवी दिल्ली, ३० जानेवारी/खास प्रतिनिधी
‘व्हिल टू हिल’ या मोहीमेद्वारे मुंबई ते दिल्ली असा साडेतीन दिवसात सायकलप्रवास करून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मे व बळींना श्रद्धांजली अर्पण करणारे प्रसिद्ध सायकलपटू विनोद पुनमिया यांच्यासारखी अनेक उदाहरणे देशातील युवकांपुढे निर्माण होण्याची आवश्यकता आहे, असे गौरवोद्गार आज राष्ट्रपती महामहीम प्रतिभाताई देवीसिंह पाटील यांनी काढले. आज सायंकाळी राष्ट्रपती भवन येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी पुनमिया यांचे स्वागत केले. २६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हिरवी झेंडी दाखविलेल्या ५३ वर्षीय विनोद पुनमिया यांच्या गेटवे ऑफ इंडिया ते इंडिया गेट या सुमारे १५०० किमी अंतराच्या सायकल प्रवासाचा समारोप आज दिल्लीत झाला.

अश्विन नाईक सुटला!
मुंबई, ३० जानेवारी / प्रतिनिधी

शिवसेनेच्या दिवंगत नगरसेविका नीता नाईक यांच्या खुनाचा कट रचल्याच्या आरोपातून त्यांचा पती आणि कुख्यात गँगस्टर अश्विन नाईक याची विशेष मोक्का न्यायाधीश आर. जी. अवचट यांनी आज सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या खूनप्रकरणात आतापर्यंत तिघांना दोषी ठरविण्यात आले असून त्यांना पाच वर्षांची शिक्षा ठोठाविण्यात आली तर दोघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अश्विन नाईक हा सध्या कल्याण कारागृहात आहे. नीता नाईक यांचा त्यांच्या घराजवळच १३ नोव्हेंबर २००० रोजी गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. त्यावेळी अश्विन नाईक हा तिहार कारागृहात होता. नीता यांच्या चारित्र्याच्या संशयावरून अश्विन नाईक याने त्यांचा काटा काढण्यासाठी मारेकऱ्यांना खुनाची सुपारी दिल्याचा आणि खुनाचा कट रचल्याचा आरोप अश्विन नाईक याच्यावर ठेवण्यात आला होता. सर्वप्रथम अश्विन याचा या खुनाशी संबंध जोडण्यात आला नव्हता. मात्र खुनापूर्वी अश्विनने वडिलांना लिहिलेले पत्र मिळाले. त्यामध्ये मुलांना आईवडिलांविना राहण्याची सवय करायला सांगा, असे लिहिले होते. त्यावरून अश्विन याच्यावर नीता यांच्या खुनाचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

सोन्यात विक्रमी तेजी
१४,१७५ रुपयांचे नवे शिखर
मुंबई, ३० जानेवारी/ व्यापार प्रतिनिधी

चलन बाजारातील वाढती अनिश्चितता आणि डॉलरच्या कमजोर होण्याने जगभरात सर्वत्र मौल्यवान धातूतील गुंतवणुकीकडे ओढा वाढला असून, परिणामी जागतिक स्तरावर सोन्याच्या भावात विक्रमी तेजी दिसून येत आहे. मुंबई सराफ बाजारात आज झालेल्या व्यवहारात स्टँडर्ड सोन्याने प्रति १० ग्रॅमला १४,१७५ रुपये असा सर्वकालिक उच्च भाव मिळविला. अन्य गुंतवणूक पर्यायांमध्ये परताव्याबाबत अनिश्चितता असल्याने सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे गुंतवणूकदारांचा होरा वळला आहे. गेले आठवडाभर सोन्याचा भाव १४ हजारांच्या पातळीवर घोटाळत होता.

सत्य दडविण्यासाठीच पाकिस्तानची परस्परविरोधी वक्तव्ये -मुखर्जी
नवी दिल्ली, ३० जानेवारी/पीटीआय

मुंबई हल्ल्यांबाबत दिलेल्या पुराव्यांबाबत चौकशीसंदर्भात पाकिस्तानकडून परस्परविरोधी वक्तव्ये करण्यात आल्याने भारताने पाकिस्तानवर टीका केली असून सत्य दडवण्यासाठीच हेतुत: या क्लृप्त्या करण्यात आल्या असे म्हटले आहे. पाकिस्तान या प्रकरणात सादर केलेल्या पुराव्यांच्या संदर्भात स्वच्छपणे काही सांगणार नाही असे भारताला वाटते कारण यात आयएसआय व दहशतवादी संघटना यांचे लागेबांधे आहेत. पाकिस्तानी दहशतवादी संघटनांची व दहशतवाद्यांची यादी करून त्यांच्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी समितीपुढे मांडण्याचे भारताचे प्रयत्न आहेत. या यादीत जैश ए महंमदचा प्रमुख मासूद अझर व इतर दहशतवादी संघटनांची नावे आहेत. पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून योग्य मार्गाने माहिती मिळालेली नाही .जे काही समजते आहे ते प्रसारमाध्यमातून समजते आहे, कुठल्याही सरकारला प्रतिसाद देण्याचा हा मार्ग नव्हे, असे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज सांगितले. आम्ही दिलेल्या पुराव्यांवर त्यांनी चौकशी करून माहिती देणे अपेक्षित होते पण पाकिस्तानने अजून कुठलीही माहिती दिलेली नाही, पाकिस्तानने वेगळ्या मार्गाने दिलेला प्रतिसाद आम्हाला मान्य नाही.

कोकणसाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्यास केंद्राचा नकार
नवी दिल्ली, ३० जानेवारी/पीटीआय

कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने सादर केलेला प्रस्ताव केंद्राने फेटाळला आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री शकील अहमद यांनी सांगितले की, कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या प्रस्तावावर नियोजन आयोगासहित अन्य संबंधित यंत्रणांशी केंद्र सरकारने सविस्तर चर्चा केली. त्यानंतरच या प्रस्तावाला नकार देण्याचे केंद्राने ठरविले. शिवसेना खासदार व माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना यासंदर्भात लिहिलेल्या एका पत्रात शकील अहमद यांनी ही माहिती दिली आहे.कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्यास नकारघंटा वाजविणाऱ्या केंद्र सरकारचा शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी आज नवी दिल्ली येथे एका पत्रकार परिषदेत निषेध केला. कोकणाचा अनुशेष भरून काढण्यासाठी या भागासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करावे ही शिवसेनेची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या मागणीला केंद्राने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. मनोहर जोशी यांच्या या पत्रकार परिषदेस सुरेश प्रभूही उपस्थित होते. कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे हा मुद्दा सुरेश प्रभू यांनी लोकसभेत सातत्याने उपस्थित केला होता.

राजू श्रीवास्तवला ‘डी’ कंपनीकडून धमकी?
मुंबई, ३० जानेवारी / प्रतिनिधी

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम तसेच पाकिस्तानची टिंगलटवाळी करणे विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव याच्या चांगलेच अंगाशी आले आहे. दाऊद आणि पाकिस्तानवर विनोद करणे थांबविले नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी श्रीवास्तवला ‘डी’ कंपनीकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी धमकीच्या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी धमकीचे फोन कुठून येत आहेत, याचा शोध घेतला जात असल्याचे सहआयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले. एका खासगी वाहिनीवर सुरू असलेल्या विनोदी मालिकेत श्रीवास्तवने अनेकदा मुंबई हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याच्याबाबतीत पाकिस्तानने स्वीकारलेल्या भूमिकेची टिंगलटवाळी केली होती. त्याचप्रमाणे दाऊद आणि त्याच्या ‘डी’ कंपनीवरही विनोद केले होते. तेव्हापासून त्याला धमकीचे फोन येणे सुरू झाले आहे. गेल्या २०-२५ दिवसांपासून आपल्याला धमकीचे फोन येत असून सुरूवातीला आपण त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र नंतर अशा धमकीच्या फोनची संख्या वाढल्याने काही दिवसांपासून वरचे वर असे धमकीचे दूरध्वनी येऊ लागले आहेत, असे राजूने काही खासगी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले. फोन करणारी व्यक्ती दाऊद आणि पाकिस्तानची टिंगलटवाळकी करणे थांबविले नाही तर ठार तुला ठार करू असे धमकावत असल्याचे राजूने सांगितले. राजूने याविषयी अद्याप पोलिसांत रितसर तक्रार दाखल केलेली नाही. परंतु स्वत: मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे जाऊन याबाबतीत सतत संपर्कात राहण्याचे आणि माहिती कळविण्याची सूचना त्याला दिली आहे. तसेच त्याला आवश्यक ती सुरक्षा पुरविण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मुंबईत प्रथमच अर्जेटिनाच्या चित्रपटांचा महोत्सव
मुंबई, ३० जानेवारी/प्रतिनिधी

अर्जेटिनाचे दूतावास मुंबईत सुरू होत आहे त्यानिमित्त अर्जेटिना दूतावास व फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने २ ते ६ फेब्रुवारी या सप्ताहात अर्जेटिनाच्या चित्रपटांचा खास महोत्सव यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला आहे.रोज सायंकाळी ६.३० वा. चित्रपट हे दाखविण्यात येणार असून चित्रपट रसिकांना महोत्सवासाठी विनामूल्य प्रवेश आहे.प्रभात चित्रमंडळ, एनलायटन फिल्म सोसायटी, बिमलरॉय फिल्म सोसायटी, सिने सोसायटी इ. फिल्म सोसायटय़ा महोत्सवात सहभागी होत आहेत.महोत्सवाचे उद्घाटन २ फेब्रुवारी रोजी माजी शेरीफ किरण शांताराम यांच्या हस्ते होणार असून सांस्कृतिक कार्य संचालक अजय आंबेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महोत्सवातील चित्रपटांची पुस्तिका चव्हाण प्रतिष्ठान येथे उद्घाटनाच्या दिवशी उपलब्ध होईल.जॉयंटस ऑफ व्हेल्डस (२००८), डी ग्रुज्यूएट (२००७), फोर्थ जुलाय (२००७) व्हेलॉसिटी बिगेटस ऑब्लीव्हन (२००६) रेन (२००८) या पाच चित्रपटांतून अर्जेटिनाच्या वर्तमान चित्रपटांचे दर्शन रसिकांना घडणार आहे.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८