Leading International Marathi News Daily
रविवार, १ फेब्रुवारी २००९

विघ्ने येतील, सावध राहा
सूर्य-मंगळ-गुरू यांच्या सहकार्याने सुरू असलेला प्रवास सफल होणार असला, तरी यावेळी शनी-हर्षल प्रतियोगामुळे त्यात छोटी-मोठी विघ्नं येणं शक्य आहे. विश्वास आणि आश्वासन यांच्या आधाराने प्रवास अवघड होईल. अधिकारी सहकारी भागीदार यांच्याशी गोड बोलूनच कार्यभाग साधावा लागणार आहे. यावेळी मुलांचे प्रश्न तीव्र होतील. शनिवारचा चंद्र-हर्षल नवपंचम योगामुळे काही विघ्नं दूर होतील. प्रवासाचा वेग वाढेल.
दिनांक : ३ ते ६ शुभकाळ.
महिलांना : परिश्रम यश मिळवून देतील.

कार्यचित्र आकर्षक होईल
भाग्यात सूर्य-मंगळ-गुरू, लाभात असलेला शुक्र वृषभ व्यक्तींचं व्यवहार चित्र आकर्षक करणार आहेत. शनिवारच्या चंद्र-हर्षल नवपंचम योगापर्यंत संधीतून सफलता आणि सफलतेमधून प्रतिष्ठा असाच प्रवास सुरू राहील. शनी-हर्षल प्रतियोगाचे छोटे-मोठे धक्के बसणार असले, तरी नोकरी-धंदा, राजकारण, शिक्षण यातील प्रगतीचा वेग कमी होणार नाही. प्रपंच आणि प्रकृती यांकडे दुर्लक्ष नको. भक्तिमार्ग आनंद देईल.
दिनांक : ४ ते ७ यश मिळेल.
महिलांना : जबाबदाऱ्या कमी होतील.

संकटातून बाहेर याल
व्यवहारात समस्यांची गर्दी आणि संरक्षणात संशय अशा परिणामांची मिथुन व्यक्तींची ग्रहस्थिती आहे. अष्टमात रवी, मंगळ, गुरू, राहू एकत्र असेपर्यंत अशाच परिस्थितीमधून उपक्रम सुरू ठेवावे लागतील. पराक्रमी शनी जिद्द कमी होऊ देत नाही आणि मीन-शुक्र उत्साह देतो. यामुळे शनिवारच्या चंद्र-हर्षल नवपंचम योगाच्या आसपास संकटातून सहज बाहेर येऊ शकाल. वाद, स्पर्धा, साहस यांपासून मात्र दूरच राहा.
दिनांक : २, ३, ६, ७ शुभकाळ.
महिलांना : संयम आणि कल्पकता समस्यांतून बाहेर काढतील.

संधी उपलब्ध होतील
सप्तमातील सूर्य, गुरू आधार देतील. मकर, मंगळाचे सहकार्य मिळेल. कर्क व्यक्तींना यामधून आपले उपक्रम साडेसाती असतानाही सुरू ठेवता येतील. परंतु प्रत्येक दिवस, प्रत्येक संधी महत्त्वाची ठरेल. त्यात निर्णय-कृतीत विलंब नको. शनी-हर्षल प्रतियोगाचे प्रतिसाद संयमाने पचवावे लागतील. वाहनांचा उपयोग कमी करावा. बढती-बदलीचे योग आहेत. कला साहित्यात चमकाल.
दिनांक : २ ते ६ प्रत्येक दिवस महत्त्वाचा.
महिलांना : वादापेक्षा सफलता महत्त्वाची आहे.

समस्यांची गर्दी होईल
साडेसाती आणि गुरू, राहूसारख्या समर्थ ग्रहांचा असहकार सुरू असताना सिंह व्यक्तींना शनी-हर्षल प्रतियोगाचे छोटे-मोठे धक्के बसणार असल्याने, समस्यांच्या होणाऱ्या गर्दीतून पुढे सरकणे एक दिव्यच ठरणार आहे. अशा वेळी देवावर भरवसा ठेवावा. मिळेल त्या पायवाटेने सरकत राहावे. तोंड बंद, काम सुरू हा मंत्र सतत उपयोगात आणावा. अशुभ पर्व संपताच योजना मार्गी लावता येतील.
दिनांक : २ ते ६ पायवाट सापडेल.
महिलांना : वाद टाळा, स्पर्धा नको.

अवघड गोष्टींवर विजय
पंचमात सूर्य, मंगळ, गुरू आहे. सप्तमात शुक्र यांच्यातील शुभ परिणाम अवघड गोष्टींवर विजय संपादण्यास सहकार्य करतील. शनिवारच्या चंद्र-हर्षल नवपंचम योगापर्यंत याची प्रचीती येत राहाणार आहे; परंतु शनी-हर्षल प्रतियोग आणि साडेसाती यांच्यामुळे अधिकारी मंडळींची नाराजी, अचानक वाढवणारे खर्च आणि आरोग्याच्या तक्रारी यांच्याशी सामना करावा लागणार आहे. अखेर यशही मिळेल.
दिनांक : ४ ते ७ याचा प्रत्यय येईल.
महिलांना : संयम आणि सूचकता ठेवा.

प्रत्येक आघाडीवर लक्ष ठेवा
चतुर्थात सूर्य, मंगळ, गुरू, राहू असल्याने प्रश्नांचा आरंभच स्वत:च्या निवासस्थानापासून होत असतो. त्याची बाहेरील व्याप्ती कधी कधी नजरेच्या आणि शक्तीच्या बाहेरही पोहोचू शकते. गुरुवारी शनी हर्षल प्रतियोग होत असल्याने प्रत्येक आघाडीवर स्वत:च लक्ष ठेवणं हाच मार्ग महत्त्वाचा ठरतो. व्यापारात साहस नको. घरातील असंतोष कल्पकतेनेच नियंत्रणात आणावा लागणार आहे. प्रकृतीची पथ्यं सांभाळा, भक्तिमार्ग आनंद देईल.
दिनांक : २, ३, ६, ७ आधार शोधता येतील.
महिलांना : शब्दांनी वाद वाढवू नका, कृतीने आपत्तीला निमंत्रण देऊ नये.

संधीचा उपयोग करा
पराक्रमी सूर्य मंगळ पंचमात, शुक्र दशमात शनी प्रकरण मार्गी लागतील. दडपण दूर होतील. आर्थिक समस्या सुटतील आणि व्यापारपेठेत बस्तान बसवता येईल. गुरुवारच्या शनी-हर्षल प्रतियोगाची अनिष्टता टाळण्यासाठी हुशारी आवश्यक आहे. वाहनांचा वेग, भागीदारांच्या कुरबुरी, कुटुंबीयांची नाराजी याकडे अधिक लक्ष ठेवा. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शनिवारी बुध राश्यांतर होत आहे, तोपर्यंत संधीचा झटपट उपयोग करून घ्यावा लागेल. बरीचशी कामे संपर्क आणि शब्दांनी होऊ शकतील.
दिनांक : १, ४, ५ शुभकाळ.
महिलांना : अवास्तव अपेक्षांना प्रतिसाद मिळणार नाही.

युक्ती-कृतीतून यश मिळेल
धनू व्यक्तींना रवी मंगळाचे सहकार्य मिळणार आहे. राशिस्थानचा बुध, भाग्यात शनी यामुळे युक्ती -कृतीच्या समन्वयातून यश उभे करता येणार आहे. शनिवारच्या चंद्र-हर्षल नवपंचम योगापर्यंत व्यवहारात नवे नवे प्रस्ताव येत राहतील. त्यातून प्रतिमा उजळत होईल. नवे शोध दृष्टिपथात येतील. शनी-हर्षल प्रतियोगामुळे अनपेक्षित निर्माण होणाऱ्या समस्यांनी विचलित होऊ नका.वाहनांचा उपयोग कमी करावा. कला, साहित्य, विज्ञानात धनू व्यक्तींचा प्रभाव वाढतच राहील.
दिनांक : २, ३, ६, ७ प्रसन्न घटनांचा काळ.
महिलांना : प्रयत्नाने यश व्यापक करता येईल.

जिद्द, हुशारीने यश मिळेल
राशिस्थानी सूर्य, मंगळ, गुरू, पराक्रमी शुक्र, घेतलेले निर्णय, केलेली कृती यशापर्यंत पोहोचण्यासाठी थोडी जिद्द, थोडी हुशारी उपयोगात आणा. शनिवारच्या चंद्र-हर्षल नवपंचम योगापर्यंत अनेक क्षेत्रांत बाजी मारून जाता येईल. शनी, हर्षल प्रतियोगातील वादळं त्रास देतील, पण धोका देऊ शकणार नाहीत. बलवान मंडळी मदत करतील. त्यातून आर्थिक, सामाजिक समस्या सोडवता येतील. प्रवास, स्पर्धा यामध्ये सतर्क राहणे योग्य ठरेल.
दिनांक : १, ४, ५ शुभकाळ.
महिलांना : समस्यांवर विजय मिळवता येईल. पुढे चला.

आव्हाने उभी राहतील
व्ययस्थानी सूर्य, मंगळ, गुरू, राहू असल्याने प्रपंचापासून तर आर्थिक व्यवहारातील कोणत्याही विभागापर्यंत या वेळी नवी नवी आव्हाने समोर उभी राहू शकतील. घाईगर्दीने कोणतेही निर्णय घेऊ नका. आपत्तीपेक्षा विलंब चांगला हाच मंत्र शनिवारच्या चंद्र, हर्षल नवपंचम योगापर्यंत उपयुक्त ठरणार आहे. अचूक शोध घेऊन मंगलकार्य ठरवा. मिळकतीचे व्यवहार करा. भागीदारीचे स्वरूप ठरवा. पुढच्याच सप्ताहात सूर्य राश्यांतर होईल. नवा प्रकाश दृष्टिपथात येईल. मीन, शुक्र निराश होऊ देत नाही.
दिनांक : २, ३, ६, ७ शुभकाळ.
महिलांना : विषाची परीक्षा बघू नका.

प्रत्येक दिवस महत्त्वाचा
राशिस्थानी शुक्र, लाभात गुरू, राहू यांच्या परिणामांनी डाव साधून यश मिळवायचे असेल तर शनिवारच्या चंद्र-हर्षल नवपंचम योगापर्यंत हा प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. गुरुवारच्या शनी-हर्षल प्रतियोगामुळे विचलित होऊन कार्यमार्गात बदल करू नका. आश्वासनांचा उपयोग झटपट करून घ्यायला हवा. मंगलकार्याच्या चर्चेत वेळ घालवू नका. प्रकृतीच्या विकारांची खात्री करून घ्या. मारुतीची उपासना आराधना सामना करणारी शक्ती देईल. यातून प्रतिष्ठा मजबूत करीत व्यवहाराची घडी बसवता येईल .
दिनांक : २ ते ५ घटना सहकार्य करतील.
महिलांना : अपेक्षित यशासाठी नवे तंत्र, नवे मार्ग उपयोगात आणावे लागतील.