Leading International Marathi News Daily                                रविवार, १ फेब्रुवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

क्रीडा

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांत


निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोलंबो , ३१ जानेवारी / वृत्तसंस्था
एका बाजूला श्रीलंकेचा डावखुरा फलंदाज कन्डाम्बी तर दुसरीकडे सलग दुसरा विजय मिळविण्यासाठी आसुसलेला भारतीय संघ असे भारताच्या बाजूने एकतर्फी चित्र दिसत असतानाही भारत आणि श्रीलंका यांच्यातील येथे झालेला एकदिवसीय सामन्यातील रोमांचकतेने टोक गाठले. अखेर भारताने १५ धावांनी विजय मिळवून सुटकेचा निश्वास सोडला. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आता भारत २-० असा आघाडीवर आहे. तिसरा सामना कोलंबोतच ३ फेब्रुवारीला खेळविला जाणार आहे.

मराठय़ांना राजकीय आरक्षण दिल्यास मोठे आंदोलन: ओबीसी नेत्यांचा सरकारला इशारा
मुंबई, ३१ जानेवारी/प्रतिनिधी

मराठा आरक्षण महामेळावा उद्या दुपारी शिवाजी पार्क येथे होणार आहे. या मेळाव्याचे कर्ते करविते राष्ट्रवादीतून निलंबित करण्यात आलेले माजी आमदार विनायक मेटे आहेत. मात्र या मेळाव्यासाठी राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या डझनभर शक्तीशाली मंत्र्यांनी रसद पुरविली आहे. या पाश्र्वभूमीवर आज सह्याद्री शासकीय विश्रामगृह येथे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे, गृहनिर्माण राज्यमंत्री प्रितमकुमार शेगावकर यांना भाजप नेते गोपीनाथ मुंडे, माजी आमदार सुधाकर गणगणे, शेकापचे नेते आ. जयंत पाटील आदींच्या नेतृत्वाखाली ओबीसी नेत्यांचे एक शिष्टमंडळ भेटले. या शिष्टमंडळाने मराठा समाजाला आरक्षणाच्या नावाखाली राजकीय आरक्षण दिल्यास त्यातून राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा मोठा आगडोंब उसळण्याचा इशारा दिला आहे.

युकी रॉक्स!
मेलबर्न,३१ जानेवारी/पीटीआय
विजेतेपद मिळविल्यानंतर भांब्री याने सांगितले, आज मला वर्चस्व राखण्याची खात्री होती. मी परतीचे फटके व सíव्हस यावर चांगले नियंत्रण ठेवू शकलो. या विजेतेपदामुळे मला खूप आनंद झाला आहे. आणखी ग्रॅन्ड स्लॅम मला जिंकायच्या आहेत. भारताच्या युकी भांब्री याने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील कुमार मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकावून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. त्याने एकतर्फी लढतीत जर्मनीच्या अ‍ॅलेक्झांद्रोस फर्निनादोसला ६-३,६-१ असे हरविले. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिलाच भारतीय ज्युनियर खेळाडू आहे.

मनविसेचे ‘स्टिंग ऑपरेशन’
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या अंदाधुंदी कारभाराचे वाभाडे

मुंबई, ३१ जानेवारी / प्रतिनिधी

लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य ठरविणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अंदाधुंद कारभाराची लक्तरे आज ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’ने एका स्टिंग ऑपरेशनद्वारे वेशीवर टांगली. या स्टिंग ऑपरेशनमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. मनविसेचा एक कार्यकर्ता प्राध्यापक बनून परीक्षा विभागात गेला व त्याने चक्क ‘एमसीए’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासल्या. एवढेच नव्हे तर त्यातील काही उत्तरपत्रिका तो बाहेरही घेऊन गेला.

भारत आणि पाकिस्तान यांचे संघराज्य होईल: डॉमिनिक लॅपियर यांचे भाकित
नवी दिल्ली, ३१ जानेवारी/पीटीआय

भारत आणि पाकिस्तान ही राष्ट्रे एकाच मातेची मुले असून हे दोन्ही देश आपल्यातील सर्व मतभेद दूर करून शेवटी एकत्र येतील आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अखंड भारताचे स्वप्न साकार होईल.. भारत आणि पाकिस्तान ही राष्ट्रे एकाच मातेची मुले असून हे दोन्ही देश आपल्यातील सर्व मतभेद दूर करून शेवटी एकत्र येतील आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अखंड भारताचे स्वप्न साकार होईलच असा ठाम विश्वास प्रसिध्द फ्रेंच लेखक डॉमिनिक लॅपिअर यांनी व्यक्त केला. या दोन्ही देशांचा इतिहास आणि संस्कृती समान आहे. त्यांचाच अखेर विजय होईल आणि दोन्ही देश पुन्हा एकत्र येतील असे मत त्यांनी व्यक्त केले.

निवडणूक आयुक्तालयाचा वाद चव्हाटय़ावर
मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांची नवीन चावलांना हटविण्याची शिफारस

नवी दिल्ली, ३१ जानेवारी/पी.टी.आय.

मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी आपले सहकारी आयुक्त नवीन चावला यांना पदावरून हटविण्याची मागणी केली असून यामुळे निवडणूक आयुक्तालयातील वाद ऐरणीवर आले आहेत. चावला हे आयुक्तालयात पक्षपातीपणा करतात अशी तक्रार भाजपाने केली होती. त्यानंतर एन. गोपालस्वामी यांनी ही मागणी केली आहे. चावला यांचे काँग्रेस पक्षाशी साटेलोटे असल्याचा आरोप करून भाजपाने ही मागणी केली होती. मुख्य निवडणूक आयुक्त गोपालस्वामी हे आपल्या पदावरून २० एप्रिलला निवृत्त होणार आहेत. त्याआधी तीन महिने त्यांनीच ही अशी मागणी करून एकच खळबळ उडवून दिली आहे. आपण आपले पद सोडण्याचा कोणताही विचार केलेला नाही. राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पुढील निवडणुका व्यवस्थित कशा घ्यावयाच्या याचा आपण सध्या विचार करीत असल्याचे चावला यांनी वृत्तसंस्थांशी बोलताना सांगितले.

उपनगर खो-खो संघटनेमुळे मुंबई महानगरपालिका अडचणीत
बरखास्त संघटनेला मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धेची खिरापत
प्रशांत केणी , मुंबई , ३१ जानेवारी

राज्य संघटनेकडून जिल्हा संघटनेची कार्यकारिणी बरखास्त झालेली असताना त्यावर नियुक्त करण्यात आलेल्या निमंत्रकाकडे स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सोपविल्यामुळे २००६-०७ची महापौर चषक खो-खो स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही जबाबदारी सोपविल्यामुळे मुंबई महानगरपालिका अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच यंदाच्या मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धेच्या घोषणेलाही विलंब होत आहे. २००६-०७मध्ये झालेली मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा क्रीडाविषयक नियम आणि घटनेला धाब्यावर बसवून आयोजित करण्यात आल्याचे निष्पन्न होत आहे. राज्य संघटनेने २००६-०७मध्ये मुंबई उपनगर जिल्हा खो-खो संघटनेची कार्यकारिणी बरखास्त केली होती आणि त्यावर प्रशांत पाटणकर यांची निमंत्रक म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर पाटणकर यांच्यावर त्या वर्षीच्या महापौर चषक स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सोपविली गेली. पण अडीच लाख रुपये अनुदानाची स्पर्धा प्रशांत पाटणकर या निमंत्रकाकडे देणे योग्य नाही , असे आक्षेप घेणारे पत्र मुंबई उपनगर खो-खो संघटनेचे तत्कालिन उपाध्यक्ष अनिल पाटणकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख लेखापाल (वित्त) यांच्याकडे दिले होते. पण महापालिकेकडून याबाबत कोणताही गांभीर्याने विचार झाला नाही आणि स्पर्धा विनासायास पार पडली. नुकतेच माहिती अधिकाराखाली शिवछत्रपती पुरस्कार विजेते संघटक साईनाथ देसाई यांनी विचारलेल्या प्रश्नांना बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे वरिष्ठ पर्यवेक्षक प्रकाश पुना चऱ्हाटे यांनी दिलेल्या उत्तरांमुळे मुंबई महानगरपालिका अडचणीत आली आहे. दरम्यान , गुरुवार २९ जानेवारी रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने प्रशांत पाटणकर आणि साईनाथ देसाई यांना चर्चेसाठी आमंत्रित केले होते. परंतु आंतरविद्यापीठ स्पध्रेसाठी मुंबई विद्यापीठाचे प्रशिक्षक म्हणून देसाई मुंबईबाहेर असल्यामुळे या चर्चेला हजर राहू शकले नाहीत.
( यंदाच्या महापौर चषक स्पध्रेला ‘ खो ’ ?.. )

पतियाळामध्ये रुग्णालयात लागलेल्या आगीत पाच अर्भके जिवंत जळाली
पतियाळा, ३१ जानेवारी/पीटीआय

येथे एका रुग्णालयामध्ये आज पहाटे लागलेल्या आगीत पाच अर्भके जिवंत जळाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असे सांगण्यात येते. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या अर्भकांचे वय अवघे तीन ते सात दिवसांचे होते. तसेच या दुर्घटनेत दोन अर्भके गंभीर जखमी झाली. पतियाळाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या राजेंद्र रुग्णालयामध्ये कावीळग्रस्त १० अर्भकांवर उपचार सुरू होते. या अभकांना फोटो थेरपी युनिटमध्ये उपचारांसाठी ठेवण्यात आले होते. आज पहाटे येथील इनक्युबेटर या वैद्यकीय उपकरणाच्या वायरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली व त्यामध्ये पाच अर्भके जिवंत जळाली. त्यामध्ये तीन मुले व दोन मुलींचा समावेश आहे. राजेंद्र रुग्णालयामधील या अग्निकांडाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याचे आदेश पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी आज दिले. ही चौकशी पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश के. सी. गुप्ता हे करणार आहेत. त्या आधी या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचेही प्रकाशसिंग बादल यांनी जाहीर केले होते. या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या जसविंदरपाल कौर शेरगील यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. पतियाळातील रुग्णालयात आज पहाटे घडलेल्या या दुर्घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर पंजाबमधील सर्व रुग्णालयांच्या कारभाराची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८