Leading International Marathi News Daily                                  रविवार , १ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

मनविसेचे ‘स्टिंग ऑपरेशन’
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या अंदाधुंदी कारभाराचे वाभाडे
मुंबई, ३१ जानेवारी / प्रतिनिधी

लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य ठरविणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अंदाधुंद

 

कारभाराची लक्तरे आज ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’ने एका स्टिंग ऑपरेशनद्वारे वेशीवर टांगली. या स्टिंग ऑपरेशनमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. मनविसेचा एक कार्यकर्ता प्राध्यापक बनून परीक्षा विभागात गेला व त्याने चक्क ‘एमसीए’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासल्या. एवढेच नव्हे तर त्यातील काही उत्तरपत्रिका तो बाहेरही घेऊन गेला.
मराठीची गळचेपी होत असल्याच्या मुद्दय़ावरून मंगळवारी कुलसचिवांच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर ‘मनविसे’ने आज ‘स्िंटग ऑपरेशन’चा गनिमी कावा केला. मुंबई विद्यापीठात विषयाशी संबंधित नसलेल्या शिक्षकांनाही उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामाला जुंपले जात असल्याचे आरोप यापूर्वी अनेकदा झाले आहेत. पण मनविसेने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे या आरोपात तथ्य असल्याचे सिद्ध झाले आहे. ज्या शिक्षकाला त्याच्या पदासाठी रितसर मान्यता मिळालेली आहे, अशा शिक्षकांचीच उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामावर नेमण्याची तरतूद विद्यापीठाच्या नियमावलीत आहे. परंतु, या नियमाचे पालन न करता विद्यापीठात कंत्राटी शिक्षकांकडेही उत्तरपत्रिका तपासण्याची जबाबदारी दिली जाते. एवढेच नव्हे तर, उत्तरपत्रिका तपासताना शिक्षकाचे ओळखपत्रही पाहिले जात नसल्याची माहिती मनविसेच्या मुंबई विद्यापीठ विभागाचे अध्यक्ष साईनाथ दुर्गे यांना मिळाली होती. त्यामुळे या प्रकाराचे स्टिंग ऑपरेशन करण्याचा निर्णय दुर्गे यांनी घेतला. त्यानुसार ते आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सहकारी चेतन पेडणेकर यांच्यासोबत कलिना संकुलातील महात्मा फुले भवनामध्ये (परीक्षा विभाग) गेले. आतमध्ये जाताना त्यांना कोणीही अडवले नाही. उत्तरपत्रिका तपासण्याची प्रक्रिया सुरू असलेल्या कक्षात जाऊन तेथे उपस्थित असलेल्या एका लिपीकाची त्यांनी भेट घेतली. आपण विवेकानंद महाविद्यालयातील एमसीए अभ्यासक्रमाचा प्राध्यापक असून विनोद शेळके हे माझे नाव असल्याची खोटी माहिती त्यांनी दिली. लिपीकाने ओळखपत्र न पाहता त्यांच्याकडून एक अर्ज भरून घेतला. त्यानंतर या लिपीकाने दुर्गे यांना ‘प्रथम वर्ष एमसीए’ अभ्यासक्रमाच्या ‘पर्सनल इकॉनॉमिक्स मॅनेजमेंट’ या महत्त्वपूर्ण विषयाच्या उत्तरपत्रिकांचा गठ्ठा तपासण्यासाठी दिला. दुर्गे यांनी हा गठ्ठा घेऊन एखाद्या निष्णात प्राध्यापकाच्या आवेशात पेनाने उत्तरपत्रिका तपासण्याची वरवरची कृती केली. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रत्यक्षात मात्र त्यांनी उत्तरपत्रिकांवर कोणतेही लिखाण केले नाही. वीस-पंचवीस मिनिटांनंतर त्या गठ्ठय़ातील पाच उत्तरपत्रिका पिशवीत टाकून ते बाहेर पडले. उत्तरपत्रिका बाहेर नेण्यास मनाई असतानाही त्यांना कोणीच अडवले नाही. हा सर्व प्रकार पेडणेकर यांनी मोबाईलद्वारे चित्रीत केला आहे. बाहेर आल्यानंतर उत्तरपत्रिका अन् मोबाईलमधील व्हिडीओ क्लिप्स प्रसिद्धीमाध्यमांसमोर सादर केल्या. काही वेळानंतर दुर्गे यांनी सर्व उत्तरपत्रिका परीक्षा विभागातील उपकुलसचिव ल. रा. माने यांच्याकडे सुपूर्द केल्या.