Leading International Marathi News Daily                                  रविवार , १ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

भारत आणि पाकिस्तान यांचे संघराज्य होईल: डॉमिनिक लॅपियर यांचे भाकित
नवी दिल्ली, ३१ जानेवारी/पीटीआय

भारत आणि पाकिस्तान ही राष्ट्रे एकाच मातेची मुले असून हे दोन्ही देश आपल्यातील सर्व मतभेद दूर

 

करून शेवटी एकत्र येतील आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अखंड भारताचे स्वप्न साकार होईल..
भारत आणि पाकिस्तान ही राष्ट्रे एकाच मातेची मुले असून हे दोन्ही देश आपल्यातील सर्व मतभेद दूर करून शेवटी एकत्र येतील आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अखंड भारताचे स्वप्न साकार होईलच असा ठाम विश्वास प्रसिध्द फ्रेंच लेखक डॉमिनिक लॅपिअर यांनी व्यक्त केला. या दोन्ही देशांचा इतिहास आणि संस्कृती समान आहे. त्यांचाच अखेर विजय होईल आणि दोन्ही देश पुन्हा एकत्र येतील असे मत त्यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधी यांच्या ६१ व्या पुण्यतिथीनिमित्त येथील फ्रान्सच्या दूतावासात लॅपियर यांच्या ‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट’ या गाजलेल्या कादंबरीच्या ताज्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. हे देश परस्परांमधील मतभेद केव्हा संपवतील असे विचारताक्षणीच लॅपियर यांनी आपल्या आयुष्याच्या कालमर्यादेत हे शक्य होऊ शकेल, असे ठाम मत मांडले. ओ जेरुसलेमसारख्या कादंबरीमधून दहशतवादाचा विषय हाताळणाऱ्या लॅपियर यांना मुंबईवर २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की या उपखंडाला दहशतवाद हा नवीन नाही. प्राचीन आणि अर्वाचीन भारताच्या इतिहासात वेळोवेळी त्याची झलक दिसतेच. फक्त त्याचा जोर कमी करता कसा येईल याचा विचार या देशांमध्ये सतत होत असतो. पण अशी आव्हाने पेलण्यासाठी महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांच्यासारखी व्यक्तिमत्वे काळाच्या ओघात येथे पुन्हा निर्माण होतील यांत शंका नाही, असेही ते म्हणाले. ‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट’ हे पुस्तकावर आणखी संशोधन करताना आपली लॉर्ड माऊंटबॅटन, गोपाळ गोडसे आणि मोहम्मद अली जीना यांच्या डॉक्टरांसमवेत झालेल्या भेटींच्या आठवणीही यावेळी लॅपियर यांनी सांगितल्या. मुस्लिम लीगचे नेते जीना यांच्या छातीच्या दम्याचा एक्स रे रिपोर्टच डॉक्टरने आपल्याला दाखविला होता व ते सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ जगू शकणार नाहीत, असे सांगितले. माऊंटबॅटन यांना हे सांगितल्यावर ‘अरे देवा, हे मला आधी कळले असते तर आपण ही फाळणी पुढे सहा महिने तरी लांबविली असती. मग हा देश एकच राहिला असता’ असे उद्गार त्यांनी काढल्याची आठवणही लॅपियर यांनी यावेळी सांगितली. फ्रीडम अ‍ॅट मिडनाइटची नवी आवृत्ती विकास पब्लिशिंग हाऊसने बाजारात आणली आहे.