Leading International Marathi News Daily                                  रविवार , १ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

भारताची श्रीलंकेवर १५ धावांनी मात
कोलंबो , ३१ जानेवारी / वृत्तसंस्था

एका बाजूला श्रीलंकेचा डावखुरा फलंदाज कन्डाम्बी तर दुसरीकडे सलग दुसरा विजय मिळविण्यासाठी आसुसलेला भारतीय संघ असे भारताच्या बाजूने एकतर्फी चित्र दिसत असतानाही भारत आणि श्रीलंका यांच्यातील येथे झालेला एकदिवसीय सामन्यातील रोमांचकतेने टोक गाठले. अखेर भारताने १५ धावांनी विजय मिळवून सुटकेचा निश्वास सोडला. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आता भारत २-० असा आघाडीवर आहे. तिसरा सामना कोलंबोतच ३ फेब्रुवारीला खेळविला जाणार आहे. हा सामनाही प्रकाशझोतात खेळविला जाईल.
भारतीय संघाने आजही नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारित ५० षटकांत भारताने २५६ धावांपर्यंत मजल मारली. त्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेचा डाव मात्र चार चेंडू राखून २४१ धावांत आटोपला. कन्डाम्बीच्या ९३ धावांच्या नाबाद खेळीने भारतीय खेळाडूंना आणि भारतीय चाहत्यांना घाम फोडला. पण इशांत शर्माने १० षटकांत ४ बळी घेतानाच आपल्या अखेरच्या षटकात डोके शांत ठेवून केलेल्या गोलंदाजीमुळे भारताने १५ धावांनी विजयाची नोंद केली. इशांतलाच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचे १५०० डॉलरचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
भारताने केलेल्या २५६ धावांना प्रत्युत्तर देताना श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली , त्यामुळे

 

भारत पहिल्या सामन्याप्रमाणे सहज विजय मिळविणार असे एका क्षणी वाटत होते. पहिल्या सामन्यातील शतकवीर जयसूर्या (१७) , सलामीवीर तिलकरत्ने दिलशान (८) , यष्टीरक्षक संगकारा (४) असे मोहरे झटपट माघारी परतल्यामुळे दडपणाखाली आलेल्या श्रीलंकेला सावरले कर्णधार जयवर्धने (५२) आणि कन्डाम्बी (नाबाद ९३) यांनी दोघांनी चौथ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी करून संघाला सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. पण त्याचदरम्यान जयवर्धनेला डावखुरा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझाने झेलचीत केले आणि श्रीलंकेला मोठा हादरा बसला. तरीही दुसऱ्या बाजूने कन्डाम्बीचा एकहाती लढा सुरूच होता. जयवर्धनेनंतर त्याने कपुगेदरासह ५१ धावांची भागीदारी केली , तेव्हाही यजमानांना आशेचा किरण दिसू लागला होता. पण ही जोडी इशांतने फोडली. इशांत शर्माने आज प्रमुख मोहरे टिपून आपल्या गोलंदाजीतील यशाला आणखी झळाळी दिली. त्याने प्रथम जयसूर्याचा अडसर दूर केला. त्याचबरोबर मोक्याच्या क्षणी तुषारालाही बाद केले. तसेच अखेरच्या षटकात संयमी गोलंदाजी करून श्रीलंकेच्या विजयाच्या अपेक्षांना सुरुंग लावला. या षटकांत पहिल्या तीन चेंडूंवर एकही धाव न दिल्यामुळे श्रीलंकेवरील दडपण वाढले. विशेष म्हणजे या सामन्यादरम्यान प्रेक्षकांकडून इशांतवर दगड फेकल्याची घटना घडली होती. त्यानंतरही त्याने आपल्या या कामगिरीद्वारे या घटनेला चोख प्रत्युत्तर दिले.
महेंद्रसिंग धोनीने आज गोलंदाजांचा विचारपूर्वक वापर केला. मुख्य म्हणजे अखेरच्या षटकांमध्ये प्रवीण कुमारला चांगली गोलंदाजी करीत असतानाही चेंडू न सोपविता त्याने झहीर खान व इशांतवर विश्वास दाखविला. दोघांनीही अपेक्षित गोलंदाजीही केली. प्रवीण कुमारला शेवटचे षटक टाकण्याची संधी मिळाली आणि त्या षटकात दुसऱ्या चेंडूवर मेंडिस धावचीत झाला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. तत्पूर्वी , भारताने प्रथम फलंदाजी करताना मोठय़ा धावसंख्येचे लक्ष्य समोर ठेवले होते. पण युवराजसिंग (६६) आणि सेहवाग (४४) यांचा अपवाद वगळता भारताकडून मोठी खेळी उभारली गेली नाही. तरीही इतर फलंदाजांच्या छोटय़ा छोटय़ा खेळीमुळे भारताला अडीचशेचा टप्पा ओलांडता आला. भारताला आजही पंचांच्या वादग्रस्त निर्णयाचा फटका बसला. पहिल्या सामन्यात पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे बाद झालेला सचिन यावेळीही कमनशिबी ठरला. युवराजनेही पायचीतच्या निर्णयावर नाराजी प्रकट केली.

संक्षिप्त धावफलक
भारत ५० षटकांत ९बाद २५६ (युवराज ६६ , सेहवाग ४४ , मेंडिस ४४-२ , कुलसेकरा ६१-२ , महारूफ ४०-२) विजयी वि. श्रीलंका ४९.२ षटकांत सर्व बाद २४१ (कन्डाम्बी नाबाद ९३ , इशांत शर्मा ५७-४).

स्टम्प्स-बेल्सचा ‘ मजबूत जोड ’
या सामन्यात स्टम्प्स आणि बेल्स जणू काही एकजीव झाल्याप्रमाणे वागल्याचे दिसले. श्रीलंकेच्या डावात कुलसेकराला गोलंदाजी करणाऱ्या झहीरचा चेंडू वेगाने स्टम्पवर स्पर्श करून गेला , पण बेल्स पडल्या नाहीत. उलट तो चेंडू धोनीच्या हातून निसटून सीमापार गेला. सर्वांना त्याचे आश्चर्य वाटले. अखेरच्या षटकांतही स्टम्प्स आणि बेल्सची ‘ एकजूट ’ पाहायला मिळाली. प्रवीण कुमारच्या या गोलंदाजीत पहिल्या चेंडूवर कन्डाम्बी दोन धावा घेत असताना धोनीने चेंडू स्टम्प्सवर फेकला , पण बेल्स पडल्या नाहीत. तेव्हा वैतागून धोनीने यष्टय़ा आणि बेल्स जोरात हलवून पाहिल्या. पुढच्या चेंडूवर मात्र कन्डाम्बीने धाव घेतली आणि दुसऱ्या टोकाकडून मेंडिस धावत आला. तेव्हा धोनीने चेंडू हातात धरून यष्टय़ा उद्ध्वस्त केल्या. तेव्हा कुठे ती ‘ एकजूट ’ मोडून पडली.